मुखेड तालुक्यातील पाळा या खेडे गावी आजोबा केशवराव ढगे यांच्या घरी १९७२ च्या ७ नोव्हेंबर रोजी कुसुमबाई गोपाळराव एमेकर माऊलीच्या उदरी दत्तात्रय यांचा जन्म झाला. शालेय जीवन हालाखीत झाले विद्यार्थी दशेत असतांना त्यांना शनिदेव मंदिर गल्लीत त्यांच्या शेजारी राहणारे कलाध्यापक केशवराव डांगे, श्री शिवाजी हायस्कूल हतईपुरा यांच्याकडून कलेची आवड निर्माण झाली. ते चित्र काढत असतांना, रंगवत असतांना पहात असत, आपणही असेच कांहीतरी केले पाहिजे असे त्यांना वाटायचे. शिक्षण पदवी पर्यंत कसे बसे झाले. घरची परिस्थिती बेताची, एक वेळ जेवणाची वाणवा होती.
बहाद्दरपुरा, ता. कंधार या चळवळीच्या नगरीत एमेकर परिवारात महालक्ष्मीची सजावट अख्या गावात सुंदर करत असत. त्यावेळी परिवारातील ज्येष्ठ मंडळी सजावट करत असतांना ते पहायला जायचे, मदत करु लागायचे परंतु त्यांना कान धरून त्या सजावट खोलीतून हाकलून लावत असत. तेव्हा ते ५ वी/६ बीत असतील, त्या वेळी ते रडत-रडत एका कोप-यात बसले, दुस-याच क्षणी रडू थांबवून निश्चय केला. एक ना एक दिवस मी ही अशी सजावट करेल की पूर्ण गांव महालक्ष्मी सजावट पहाण्यासाठी येईला आणी तसेच झाले. ही आयुष्यातली पहिली जिद्द अक्टिव्ह झाली. दहाव्या वर्गात असतांना परीक्षा फिस भरण्याची ऐपत नव्हती. एका पाहुण्याकडे फिस भरण्यास पैसे मागितले त्यांनी पैसे नाही म्हटले त्या ठिकाणीच एक नातलग महिलेने त्यांच्या आई-वडीलास पैसे नसतील तर हाटेलात ठेवा, असा फुकटचा सल्ला दिला,
शालेय जीवनात एका वर्षी मांडीला मोठा गड्डा आला त्यावेळी जयक्रांति क्रिकेट टिमचे जिंकलेले पैसे जमले त्यातले पैसे सर्व मित्रांनी दिले आणी इलाज केला. त्यात मुक्तेश्वरभाऊ धोंडगे, अनिल कुरुडे, प्रशांत रुमाले आदी मित्रांनी पुढाकार घेतला होता. नंतर १९८६-८७ ला डॉ. अरुण कुरुडे यांचे कडे त्यांनी कंपाउंडर म्हणुन नोकरी केली. भाई दत्तात्रयराव कुरुडे यांनी स्थापन केलेल्या कै. उल्हास कुरुडे सार्वजनिक वाचनालयात 30 रुपये महिना या मानधनावर ग्रंथालयात ग्रंथपाल पदी १९८८ ते १९९९ पर्यंत काम केले. ग्रंथालयात सेवा देत असताना दररोज वर्तमानपत्र डॉ भाई केशवराव धोंडगे साहेब यांच्या धरून आणावे लागत असे.
कलेचा आरंभ गणेशोत्सव, महालक्ष्मी गौरीपूजन, नवरात्र महोत्सव यातून सुरु झाला. त्यांच्या जीवनातली पहिली सुबक आरास १९९१ च्या गणेशोत्सवात पहिल्यांदाच मुक्तेश्वरभाऊ धोंडगे यांच्या पुढाकाराने म. बसवेश्वर गणेश मंडळ टाॅवरच्या ईशान्य दिशेला मनोहर पेठकरच्या दुकानात नारळाच्या सालटा पासून श्रीफळाची निर्मिती केली. त्यात गणपती बसवला. त्या समोर नेहरु बालोद्यानाची प्रतिकृती तयार केली. त्या वेळी सजावट करतांना माझी या कलाकार मित्राची गट्टी जमली. येथे त्यांची व्दितीय जिद्द अक्टिव्ह करण्याची संधी मिळाली.
१९९३ साली साक्षरता अभियानात स्वयंसेवक म्हणून काम केले. त्याचे प्रशिस्ती पत्र मिळाले. हे काम करत पदवीचे शिक्षण पुर्ण केले.
पण हे सर्व करत असतांना त्यांच्या अंगी असलेल्या कलाकाराचा गुण थांबला नाही. १९९३ साली म. बसवेश्वर गणेश मंडळ बहाद्दरपुरा येथे देहू-आळंदी येथील नियोजित प्रवेशव्दाराची प्रतिकृती आरास साकार झाली. त्याच साली जयक्रांति बाल गणेश मंडळा पुढे हेमाडपंती मंदिर साकार. श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार यासंस्थेच्या वतीने म. उलिंग पेद्दी श्री सरस्वती-गणेश मंडळ व्दादशभुजा देवी मंदिर, सर्वलोकाश्रय मंडपात गेटवे ऑफ इंडियाची प्रतिकृती, शाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्य यांची विज्ञाननिष्ठ पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून श्रमिक कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरली आहे ही पृथ्विची आरास साकारली. पुढे त्यांची १६ जुन १९९४ साली श्री शिवाजी विद्यालय बारुळ या विद्यालयात ग्रंथपालपदी नेमणूक झाली. त्या शाखेत जवळपास २० वर्ष सेवा करत असतांना विद्यार्थ्यांना सृजनशीलता व वक्तृत्व कलेत पारंगत करत व्यक्तीमत्व विकासाचे शिक्षण दिले. विविध भितिपत्रके त्यात क्रांति मुक्ताई, सावित्रीदेवी, शब्दांमृत आत्मकथन, हस्तलिखित अशी अनेक हस्तलिखिते विदयार्थ्याच्या साहित्यिक कला गुणांना वाव मिळावा यासाठी विविध कार्यक्रमाच्या औचित्याने प्रकाशित केली.
१९९५ साली शारदा देवी क्रांति नवरात्र महोत्सवात हैद्राबाद मुक्ती संग्राम लढ्यावर सजावट तयार केली. भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ५० वर्ष पुर्ण झाले त्यावेळी सुवर्ण महोत्सवाच्या लोगोवर आरुढ श्रीगणेशा ही सजावट तयार केली. म.उर्लिंग पेद्दी श्री सरस्वती गणेश मंडळापुढे हुतात्मा स्मारकाची प्रतिकृती साकारून ज्यागावचा हुतात्मा त्या गावी हुतात्मा स्मारक उभारण्यात यावे ही मागणी डॉ. भाई केशवराव धोंडगे यांच्या संकल्पनेतून साकारली.
१९९७ रोजी आदर्श गणेश मंडळ कंधार व लोहा येथील राष्ट्रीय एड्स नियंत्रण या स्पर्धेत जिल्हास्तरीय प्रथम बक्षीस मिळाले. १९९८ साली कै. उल्हास मेमोरियल ट्रस्ट कंधार अंतर्गत आदर्श गणेश मंडळ कंधार येथे पाणी आडवा पाणी जिरवा देखावा सादर. याच वर्षी १५ ऑगस्ट १९९८ साली गावात रक्त तपासणी शिबीर घेण्यात आले. आदर्श गणेश मंडळ कंधार येथील गणेश मंडळा समोर व्यसन मुक्तीचा देखावा तयार केला. १९९९ साली बारदाण्या पासून किल्ला निर्माण करुन त्यात कालिया मर्दन करणारा श्री गणेश साकार करतांना भ्रष्टाचार, वर्णद्वेष, जातिभेद, अस्पृश्यता, व्यसनाधिनता, दहशतवाद याचे मर्दन करणारा गणेश साकारला, शारदा देवी क्रांति नवरात्र महोत्सवात १५० फुटी भुयारी मार्ग व रणचंडीका कमळाच्या फुलावर आरुढ हा देखावा सादर केला. याच वर्षी डॉ. भाई केशवराव धोंडगे यांच्या आलेल्या वर्तमानपत्रातल्या बातम्यांचे कात्रण जमा करून शिवजयंती, म. बसवेश्वर जयंती व व्दादशभुजा देवी यात्रा महोत्सवानिमित्य समाजमंदिरामधे ‘ मुक्ताई कला दालन’ प्रदर्शन साकारले . १९९९च्या भारत-पाकिस्तान कारगील युद्धात भारतीय शूर जवानांची कारगील युद्धात बजावलेल्या कामगिरीवर वर्तमानपत्र व मासिक साप्ताहिकात आलेल्या ९०० छायाचित्र कात्रणाचे’कारगिल विजय दिन हा प्रदर्शनी हॉल, बहाद्दरपुरा, फुलवळ गुराखीगड या ठिकाणी प्रदर्शन भरवून तरुणांना देशसेवेसाठी प्रवृत केले. २००० साली चंदन तस्कर विरप्पनने अभिनेता राजकुमार यांचे अपहरण केले होते, त्यावर देखाव्यात तामिळनाडू व आंध्रप्रदेश या दोन राज्यांना विरप्पन दरवेशी बनून आपल्या तालावर कसा नाचवतोय हा देखावा प्रेक्षकवर्गाना खुप भावला. २००१ या साली कै. उल्हास मेमोरियल ट्रस्ट अंतर्गत आदर्श गणेश मंडळ कंधार येथे प्रदुषणाचा भस्मासुर हा देखावा कंधार शहरात गाजला. २००२ साली गुजरात दंगलीवर कॅन्सरग्रस्त भारत माता हा . देखावा सादर करतांना भलामोठा खेकडा भारत मातेला चावतोय आणी त्यावेळी भारत मातेच्या डोळयातून अश्रू लाईव ओघळत आहेत हा देखावा सादर केला. २००३ साली आदर्श गणेश मंडळ कंधार या गणेशा समोर मगरमछ मुहं का प्रवेशव्दार आणि ४०० फुट बारदाण्याचे भुयारी मार्ग तयार करून वाहता धबधबा अन् खंडर तयार करून आरास साकार. २००४ साली मौजे गऊळ ता. कंधार येथे फुटका हनुमान होता, त्यास अक्षय तृतियाच्या शुभमुहूर्तावर भाई धोंडगे साहेब यांच्या संकल्पनेतून घड हनुमान शिळावर कोरून साकार. २००५ व २००६ या सलग दोन वर्षी आकाशवाणी नांदेड केंद्रावर मुलाखत प्रसारीत झाली. १९ व्या जागतिक गुराखी साहित्य संमेलनात शांतीघाट क्रांतिभुवन बहाद्दरपुरा येथील मन्याड नदीवर डॉ भाई केशवराव धोंडगे यांच्या संकल्पनेतील संत गुरु नानकदेवजी महाराज गुरुव्दारा हुजूर साहेब, संत नामदेव महाराज मंदिर आणि कालप्रियनाथ केशवेश्वर लिंग मंदिराची प्रतिकृती साकारून प्रदर्शन भरविले.
महाराष्ट्रात कधी न झालेला शालेय उपक्रम म्हणजे ज्ञानमाता मातोश्री मुक्ताई घोडगे यांच्या २०१० साली झालेल्या पुण्यतिथी कार्यक्रमात चक्क विद्यार्थ्यांनी १२ भारतीय भाषेत चरित्रात्मक भाषणे एका मराठी शाळेत करुन इतिहास घडविला. बहाद्दरपुरा ता. कंधार या नगरीत विविध सण-उत्सवाच्या माध्यमातून समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम करतांना विविध आरास कलापथकाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले. क्रांतिटाॅवर भोवती दिड क्विंटलची रांगोळी साकार, अण्णा हजारे यांची व्यक्तिरेखा साकारतांना सत्याग्रहाचा जिवंत देखावा. श्री शिवाजी विद्यालय बारुळ येथे बोधीवृक्षाखालीच त्यांच्या कवितेचा जन्म २०१० साली झाला. तेव्हा पासून त्यांच्या कविमनाचा वाढदिवस 6 सप्टेंबर रोजी साजरा होतो.
अशी कितीतरी लक्षवेधक आरास तयार करून कलेची छाप गावावर पडली. हस्तकलेतून निर्माण कलेल्या वस्तूंचे प्रदर्शन, अलंकारिक गणेशाचे चित्र प्रदर्शन या अशा विविध प्रदर्शनानी गुराखी साहित्य संमेलनाची शोभा वाढवून संत तुकाराम महाराज गोरक्षनाथ महाराज सेवालाल महाराज, शिवाजी महाराज. गाडगे महाराज, उर्लिंगपेट्टी महाराज, संत निवृती महाराज बसवेश्वर महाराज म.फुले जिजाऊ माँसाहेब छ. संभाजी महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीर नगोजी नाईक, संत रोहिदास महाराज यांच्या सहित अनेक जवळपास ३०-४o सिमेंट- रांगोळीचे माध्यम वापरून पुतळे निर्माण केले. आमचे प्रेरणास्त्रोत संयोजक डॉ भाई केशवराव धोंडगे साहेब यांच्या संकल्पनेतून योग्य त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा केली.
२०१३ श्री शिवाजी विद्यालय कुरुळा या ज्ञानालयात चार वर्ष सेवा केली. तेथे माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम साहेब यांची जयंती वाचन प्रेरणादिन म्हणून साजरी करण्याची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दित झाली. त्यावेळेस मुख्यमंत्री यांचे अभिनंदन करतांना १०१ पोस्टकार्ड विद्याथ्र्यांनी लिहून मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य विधानभुवन मुंबई या पत्यावर पाठवणारी पहिली शाळा ठरली. तेथेही भितिपत्रके आणि हस्तलिखिते विद्यार्थ्याकरवी करुन घेतले त्या कालखंडात खंदारी वात्रटिका २००० व “मन्याडी फणका १०० कंधारी आग्याबोंड ५०० “शब्दबिंब ३०० आणि बोलकं शल्य, आत्मकथन, संवाद या सारखे लेखन त्यांच्या लेखनीतून साकार झाले, दतात्रय एमेकर यांनी सुंदर अक्षर कार्यशाळा कंधारच्या माध्यमातून मन्याड खो-यातील स्फूर्तिदायक उपक्रमातून भारतीय शूर सैनिकांना ३३३३ राख्या व ३३३३ सदिच्छा पत्रे सोबत १५ फुटाची महाराखी हा उपक्रम देशपातळीवर गाजला. यंदा देशभक्तीमय उपक्रमाला सलग ९ वर्ष पुर्ण झाली. कोरोना काळात ही देशभक्तीचा जागर सुरुच राहिला त्यामुळे दरवर्षीच शालेय भगिनींसाठी शालेय रसद म्हणजे वही, पेन, पेन्सिल, रबर शापनर आदी साहित्य भेट स्वरुपात येतात, सुंदर अक्षर कार्यशाळेस आभार पोहचतात. यंदा तर सोळा हजार रुपयाचे आरो पाणी फिल्टर भेट स्वरुपात आली आहे प्रत्यक्ष जम्मु-काश्मिर येथून ऑन डयूटी भारतीय सैनिक यांनी येवून भेट दिली.
श्री शिवाजी हायस्कूल कंधार येथे २०१७ या वर्षी बदली झाली कंधार येथील हायस्कूल मध्ये मातोश्री मुक्ताई धोंडगे यांची आत्मकथनातून व्यक्तीरेखा साकारण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येकवर्षी मार्गदर्शन केले. व्हॅलेन्टाईन दिन प्रत्येक वृक्षांना गुलाबपुष्प देवून सत्काररूपी अनोखा दिवस साजरा केला तर रक्षाबंधना निमित्त शाळेतील वृक्षांना राख्या बांधुन पर्यावरण रक्षणाचे साकडे घालत रक्षाबंधन साजरा करण्यात आला. हस्तकलेतून मयुर, फुलदाणी, वाघाचे शिल्प, अनेक काष्ठशिल्प, चित्रे, कल्पक अक्षरालय चित्र प्रदर्शन!
म्हणजेच सुत्रसंचलन, हस्तकला, चित्रकला, शिल्पकला, भाषण कला, व्यक्तीमत्व विकास, रांगोळी, लेखन कला, विद्यार्थ्यात सृजनशीलतेत गोडी निर्माण करणे, सुंदर अक्षर सामाजिक कार्य, कवि, आत्मकथनकार शल्यकार, अशा विविध कलेत पारंगत आहेत. म्हणून त्यांना, हरहुन्नरी कलावंत दत्तात्रय एमेकर असे संबोधतात. अशा विविध कलेमुळे त्यांना आज पर्यत “समाजभूषण “दिव्यांग रत्न मन्याड़ भूषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले. कंधार येथील स्मशानभूमीत दिवाळी साजरी करतांना १०१ दीप लावून नवीन उपक्रम राबवण्यात आला. बोलकं शल्य, आत्मकथन, लेख सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार या टोपण नावाने लेखन सुरु आहे. विदयार्थ्याना सुत्रसंचलन ववृक्तत्वात निष्णात करण्याचा छंदच आहे. दिव्यांग पणाचा बाऊ न करता सदा उत्साहाने आनंदीत राहात मस्क्यूलर डिस्ट्रॉपी या जिवघेण्या आजारासोबत जीवन जगतांना कधीही अपंग असल्याची खंत त्यांना कधी जाणवली नाही. त्यांच्या वाटचालीचे प्रेरणास्त्रोत डॉ. भाई केशवराव धोंडगे साहेब, माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे, आई-कुसूमबाई, वडील गोपाळराव , मित्र मी (डॉ. डोम्पले) भाई दत्तात्रयराव कुरुडे. अॅड. मुक्तेश्वरराव धोंडगे , प्रा.डाॅ. पुरुषोत्तमराव धोंडगे,पत्नी सौ. संगीता, मुलगा दृष्टांत, मुलगी कु.दृष्टी बंधु संजय एमेकर व बालाजी एमेकर व बहिण सौ. अनिता गरुडकर या सर्वाचे वेळोवेळी सहकार्य लाभले. अशा हरहुन्नरी कलाकारास त्यांच्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्य कोटी-कोटी जयक्रांति!