माणुसकीच्या संस्काराचे बळ ग्रंथातच – जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे ;  शालेय विद्यार्थ्यांच्या वक्तृत्त्व स्पर्धेने ग्रंथोत्सवाचा समारोप!

नांदेड  :- वाचनाची गोडी ही शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांच्या अंगी लावता आली पाहिजे. यासाठी पालक आणि शिक्षकांनी अधिक डोळसपणे मुलांना त्यांच्या आवडीची पुस्तके उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यासाठी पुस्तकाच्या दुकानासमवेत शाळेतील ग्रंथालय व गावातील ग्रंथालयांशी जेवढी जवळीकता साधून देता येईल त्यासाठी प्रयत्नरत राहण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले.

 

 

ग्रंथोत्सवानिमित्त आयोजित शालेय विद्यार्थ्यांच्या वक्तृत्त्व स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी मसापचे अध्यक्ष प्रभाकर कानडखेडकर, कवी देविदास फुलारी, डॉ. शेंदारकर, धर्मादाय उपायुक्त किशोर मसने, जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रताप सुर्यवंशी, परभणी येथील अप्पर कोषागार अधिकारी निळकंठ पाचंगे, प्रकाशक निर्मलकुमार सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेत 23 विद्यार्थी सहभागी झाले होते, यात 16 विद्यार्थींनी होत्या हे विशेष.

चांगली पुस्तके, ग्रंथ केवळ ज्ञानच देतात असे नाही तर माणुस म्हणून ज्या संवेदना आवश्यक असतात त्या संवेदनाचे पोषणभरणही ग्रंथ करतात. श्रीमान योगी सारखा ग्रंथ मुलांना वाचून दाखवला पाहिजे. जातीय सलोखा, सर्वधर्म समभाव ही भावना नव्या पिढीमध्ये वाचन चळवळीतूनच अधिक समृद्ध होईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगून स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धक व विजेत्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रभाकर कानडखेडकर, डॉ. शेंदारकर, किशोर मसने, निळकंठ पाचंगे यांची समयोचित भाषणे झाली. विद्यार्थ्यांशी त्यांनी सुसंवाद साधला. कार्यक्रमाचा समारोप व आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रताप सुर्यवंशी यांनी मानले.

हे विद्यार्थी आहेत स्पर्धेतील विजेते
या स्पर्धेत सहभागी स्पर्धकातून 3 उत्तेजनार्थ व 3 अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय असे विजेत निवडण्यात आले. प्रथम पारितोषिक कु. क्रांती पलेवाड, द्वितीय वालुताई कुडकेकर आणि तृतीय पठाण महेक अश्रफ यांना देण्यात आले. उत्तेजनार्थ पारितोषिक कु. श्रेया जाधव, कु. सुवर्णरेखा पांचाळ, निलोफर शेख यांना देण्यात आले. परिक्षक म्हणून दिगंबर कदम, निळकंठ पांचगे यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *