नांदेड- येथील आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू, तथा नांदेड जिल्ह्याची भूमिकन्या, महाराष्ट्र भूषण भाग्यश्री माधवराव जाधव यांची पोर्तुगाल येथे होणाऱ्या आयवॉज 2022 या जागतिक स्तरावरील दिव्यांग खेळाडूंच्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून निवड झालेली ती एकमेव महिला खेळाडू आहे.
नांदेड जिल्हयातील मुखेड तालुक्यातील होनवडज येथील रहिवासी असलेली व कंधार येथील श्री शिवाजी विधी महाविघालयाची विद्यार्थिनी भाग्यश्री जाधव हिने दिव्यांगांच्या जिल्हा राज्य व राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेत पदकांची लयलूट केलेली आहे.
दुबई येथे झालेल्या फाजा चॅम्पियनशिप व चीन येथे झालेल्या ओपन चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.त्यानंतर गतवर्षी टोकियो येथे झालेल्या पॅरा ऑलिंम्पिक क्रीडा स्पर्धेत भारतीय संघात भाग्यश्री जाधव हिची निवड झाली होती. या स्पर्धेत सहभागी होणारी ती महाराष्ट्रातील एकमेव महिला खेळाडू होती. तिने या स्पर्धेत जागतिक पातळीवर सातवे स्थान प्राप्त केले आहे.
गेल्या ऑगस्टमध्ये बेंगलोर येथे झालेल्या चौथ्या इंडियन नॅशनल ओपन पॅरा स्पर्धेत गोळाफेक या क्रीडा प्रकारात तिने सुवर्ण पदक पटकावले होते.
येत्या दि.२३ ते २९ नोव्हेंबर दरम्यान पोर्तुगाल येथे जागतिक स्तरावर आयवॉज २०२२ ही दिव्यांग खेळाडू यांची स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी भाग्यश्री जाधव यांची निवड झाली असून या स्पर्धेत ती भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे.या स्पर्धेसाठी निवड झालेली महाराष्ट्रातील एकमेव महिला दिव्यांग खेळाडू आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर दिव्यांग खेळाडूंच्या होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भाग्यश्री जाधव यांनी नेहमीच महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करून महाराष्ट्राची शान राखली आहे.