इतिहासातील समृध्द वारसा हा आपल्या पूर्वजांचा ठेवा -डॉ. प्रभाकर देव …… • आपले सातवाहन साम्राज्य युरोपातल्या प्राचीन रोमन साम्राज्याच्या समकालीन

(जागतिक वारसा सप्ताह दि. 19 ते 25 नोव्हेंबर निमित्ताने विशेष मुलाखत)

नांदेड  :- कोणताही वर्तमान ही भूतकाळाची परिणीती असते. हा वर्तमान जागतिक असो अथवा स्थानिक तो तेवढाच महत्त्वाचा असतो. भूतकाळ पाऊलखुणाद्वारे जागविला जातो. इतिहासाच्या पाऊलखुणा म्हणजे जागतिक वारसा ! हा वारसा लेण्या, मंदिर, किल्ले, ताम्रपट या माध्यमातून शतकानुशतके प्रवाहित होत असतो. इतिहासातील आपल्याच पूर्वजांच्या ज्या काही पाऊलखुणा आहेत त्याबद्दल प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे. यासोबतच कृतज्ञतेने आपण आपल्या भोवताली असलेल्या समृद्ध वारसा स्थळांपर्यंत पोहचले पाहिजे अशी अपेक्षा ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. प्रभाकर देव यांनी व्यक्त केली.

जागतिक वारसा सप्ताहनिमित्त जिल्हा माहिती कार्यालयातर्फे त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. या संवादात त्यांनी इतिहास, इतिहासातील पाऊलखुणा, वारस, नागरिक म्हणून आपली कर्तव्ये याची जाणीव करून दिली.

वारसा सप्ताहाचे प्रयोजन हे एक प्रकारे इतिहासाचे जागरण असते. या अनुषंगाने जेंव्हा आपण आपल्या भूभागाकडे पाहतो तेंव्हा आपला समृद्ध वारसा लक्षात येईल, असे डॉ. देव यांनी सांगितले. नांदेड जिल्ह्याबाबत विचार करायचा झाला तर बावरी जातक कथेचे पूनर्रजागरण होत असलेल्या दाभड येथील बौद्धविहाराकडे पाहावे लागेल. याचबरोबर सातवाहन काळातील लोकस्मृतीने नंदिग्रामची आठवण नांदेड किल्ल्याच्या रुपात प्रवाहित केलेली आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. नंदिग्रामचा संबंध लोकस्मृतीद्वारे भरताच्या नंदिग्रामशी जोडला जातो तसाच वाकाटक काळातला प्रत्यक्ष पुरावाच शिवूर लेण्यांच्या रुपात प्रत्यक्ष उपलब्ध आहे.

थोडे अजून मागे गेल्यास सातवाहन साम्राज्य हे युरोपातल्या प्राचीन रोमण साम्राज्याच्या समकालीन असलेले साम्राज्य आहे, याकडे डॉ. प्रभाकर देव यांनी लक्ष वेधले. या दोन साम्राज्याच्या म्हणजेच सातवाहन व रोमण साम्राज्याच्या काळात (इ. स. पू. पहिल्या शतकापासून पाचव्या शतकापर्यंत) प्रचंड मोठा व्यापार होता. या व्यापारानेच भारताला सोने की चिडीया बनवले होते. या संपन्नतेच्या पाऊलखुणा म्हणजे बारा लेण्या व असंख्य मंदिरे आहेत. हा वारसा जागवणे व त्याचा सांभाळ करण्यासाठी नागरिक म्हणून कटिबद्ध होणे हे जागतिक वारसा दीनाच्या निमित्ताने प्रत्येकाचे कर्तव्य आहे. पाश्चात्य जगात अजूनही रोमण साम्राज्याच्या आठवणी युवा पिढीपर्यंत जागविल्या जात आहेत आणि आम्ही असे नतदृष्ट आहोत की, आम्हाला या सातवाहन साम्राज्याचे नाव ही माहित नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखविली.

वाकाटक नंतर नांदेडचा समृद्ध वारसा जो उपलब्ध आहे तो म्हणजे चालुक्य शिल्प स्थापत्य शैलीच्या रुपात ! जिल्ह्यात या शिल्पशैलीचे अनेक अवशेष उपलब्ध आहेत. त्यापैकी सर्वांत लक्षणिय आहे ते म्हणजे पोट्टुल नगरी. ही पोट्टुल नगरी चालुक्याची उपराजधानी होती. आज ती होट्टल नगरीच्या रुपात आहे. येथील पाषाणातल्या मूर्ती साकारणारे जे हात होते ते आपल्यातलेच पूर्वज होते हे आपण विसरता कामा नये. इथला समृद्ध वारसा जागविण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनामार्फत होत आहे. याला इन्टॅच संस्था म्हणून मिळून करत आहे. होट्टल महोत्सव यादृष्टीने महत्त्वाचा उत्सव म्हणून आपण समजून घेतले पाहिजे असे आवाहन डॉ. प्रभाकर देव यांनी सांगितले.

इ. स. पू. पहिल्या शतकापाासून पाचव्या शतकापर्यंत आपल्याकडे ही समृध्दता होती. होट्टल चालुक्या नंतर नांदेड परिसरात यादवांच्याही पाऊलखुणा उमटल्या आहेत. देवगिरीच्या यादवांचा एक शिलालेख आराध्यपुरात म्हणजेच नांदेड जवळच्या अर्धापूरला उपलब्ध आहे. राष्ट्रकुट कालखंड हा नांदेडच्या इतिहासात अत्यंत महत्वाचा असा काळ होता. जगप्रसिद्ध असलेल्या वेरुळचे कैलासलेणे निर्माण करणाऱ्या या राजवंशाचे सत्ताकेंद्र कंधार येथे होते. एक राजधानीचे शहर म्हणून कंधारला विकसित केले होते. दहाव्या शतकातील आदर्श नगररचनेचा मापदंड लावता येईल अशी शहराची उभारणी व याचे तपशील शिलालेखात उपलब्ध आहेत.

या सगळ्या ऐतिहासिक वाटचालीत सर्वात लक्षणीय ऐतिहासिक वारसा आहे तो श्री गुरुगोविंद सिंघजी यांच्या वास्तव्याचा. हा समृध्द वारसा साऱ्या जगभर नांदेड गुरुद्वाराच्या रुपात सांभाळला जात आहे. म्हणूनच नांदेडचा गुरुद्वारा जागतिक वारशातील महत्वाचे ठिकाण म्हणून गणले आहे असे डॉ. प्रभाकर देव यांनी सांगितले.

जागतिक वारसा सप्ताहनिमित्त इतिहासाचे पूनर्रजागरण आपण यासाठीच केले पाहिजे. हा सगळा आपला समृद्ध वारसा नव्यापिढी पर्यंत अशा सप्ताहाच्यानिमित्ताने पोहचविता येतो. जागतिक वारसा म्हणून मापदंड ठरणारे एक हजार वर्षापूर्वीचे विखरून पडलेल्या शिलालेखाबद्दल शारदा भवन शिक्षण संस्थेने 1968 ला इनस्क्रिप्शन फ्रॅाम नांदेड डिस्ट्रीक्ट हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. जागतिक वारसा दिनाचे निमित्त साधून आपला हा प्राचीन इतिहास प्रत्येकाने किमान समजून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *