सामाजिक भान जपणारी लावणीसम्राज्ञी” : सुलोचना चव्हाण

 महाराष्ट्राच्या प्रसिद्ध ज्येष्ठ लावणी पार्श्वगायिका,सुलोचना चव्हाण यांचा जन्म १३ मार्च १९३३ रोजी मुंबई मधील गिरगाव येथे झाला,लहानपणा पासूनच त्यांना गायनाची आवड होती, एकाहून एक मनाला वेड लावणाऱ्या लावण्या त्यांनी गायल्या,
आजही त्यांच्या गाण्यावर लोक थिरकल्याशिवाय राहत नाहीत,
त्यांच्या डोक्यावरचा पदर कधीही खाली सरकला नाही,कपाळावर भले मोठ कुंकू,उंच सडपातळ शरीरयष्टी, अंगात वेगवेगळ्या कला सादर करण्याच्या अदा,अन् मुखी लावणीचे ठसठशीत बोल, ज्या काळात तमाशा फड चालत होते,त्याकाळी त्यांनी गायन केलेल्या अस्सल ठसकेबाज मराठी लावण्या लोकांच्या मनात घर करू लागल्या होत्या,

लहानपणापणीच त्यांनी श्रीकृष्णाची भूमिका केल्या होत्या, उर्दू नाटकांमध्ये हे त्यांनी चांगल्या भूमिका साकारल्या, वयाच्या दहा वर्षापासूनच त्यांनी गायन करण्यास सुरुवात केले, त्यांचा विवाह होण्याअगोदर त्यांनी जवळपास ७० चित्रपटात पार्श्वगायन केले ,’हीच माझी लक्ष्मी’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता, १९५२ मध्ये त्यांनी श्याम चव्हाण यांच्या ‘कलगीतुरा’या चित्रपटा साठी लावणी गायन केली, आणि नंतर त्यांची ओळख वाढत गेली, व त्यातूनच त्यांच्यासोबत १२ ऑगस्ट १९५३ मध्ये ते विवाह बंधनात अडकले, त्या काळातील परिस्थितीला झगडून त्यांनी गायनाची कला आत्मसात केली, आणि त्यामुळेच त्यांची ही कला चिरकालीन टिकली, कृष्णा- सुदामा या चित्रपटांमध्ये त्यांनी पहिले गाणे गायले

वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी ‘मन्ना डे’ यांच्याबरोबर भोजपुरी रामायण गायल्या होत्या, त्यांनी हिंदी,गुजराती, तामिळ ,पंजाबी या भाषेमध्ये ही भजन, गझल असे विविध प्रकार देखील हाताळले होते, सुलोचना चव्हाण यांनी त्यांच्या आत्मचरित्राचे नाव’ माझं गाणं……माझं जगणं ‘असं होतं ,त्यांनी भावगीत व भक्ती गीते ही गायलेली आहेत. त्यामुळे आचार्य अत्रे यांनी त्यांना ‘लावणीसम्राज्ञी’असा किताब बहाल केला,
जगदीश खेबुडकर यांनी ‘रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटातील गाणी सुलोचना चव्हाण यांनीच गावावे असा आग्रह धरला, तेव्हापासूनच त्या अतिशय उत्तम गायला लागल्या,

त्यांनी गायलेल्या काही लावण्यापुढील प्रमाणे आपणाला सांगता येतील,त्या लावण्या आजही अनेकजण मनात गुणगुणतात, ‘नाव- गाव कशाला पुसता, अहो मी आहे कोल्हापूरची, मला म्हणत्यात लवंगी मिरची,हे गाणे गायल्यापासून त्यांचे आयुष्य बदलून गेले.अनेक ठिकाणी त्यांच्या गाण्यामुळे त्यांना ओळखल्या जाऊ लागल्या, त्यानंतर त्यांनी लावण्या पाठोपाठ लावण्या गायला सुरुवात केली, अक्षरशः पुढील गाण्यामुळे तरुणाई ताल धरून थिरकू लागली, ‘१)सोळावं वरीस धोक्याचं ‘२)फड सांभाळ तुऱ्याला ग आला,तुझ्या ऊसाला लागेल कोल्हा,३)खेळताना रंग बाई होळीचा, ‘४)कस काय पाटील बर आहे काय’?५) ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’६) मला म्हणतात पुण्याची मैना’,७) पाडाला पिकलाय आंबा, ८) स्वर्गाहून प्रिया आम्हाला आमचा सुंदर भारत देश,९) नाचतो डोंबारी ,ग नाचतो डोंबारी, १०)औंदा लगीन करायचं, ११)लय लय लबाड दिसतो ग, १२)घ्यावा नुसताच बघून मुखडा, अशा कितीतरी गाजलेल्या लावण्या त्यांच्या नावावर आहेत, वैशिष्ट्यपूर्ण आवाज व ठसकेबाज शब्दफेकी मुळे सुलोचनाताईंनी बऱ्याच लावण्या व अनेक गीते गायली, गाण्यातील सगळे भाव उलगडून दाखवण्याची किमया त्यांच्या आवाजात होती, ‘हीच माझी लक्ष्मी’ या चित्रपटातील’ मुंबईच्या कालेजात गेली पती, आले होऊन बी ए बीटी ‘ही लावणी त्या काळात तुफान गाजली,

हिंदी चित्रपटांमध्ये ही त्यांनी ‘चोरी चोरी आग सी दिल मैं लगाके’, मौसम आया है रंगीन,अशा गाण्याचा समावेश आहे, त्यांनी मोहम्मद रफी, शमशाद बेगम, गीता दत्त या दिग्गज गायकाबरोबर गायन केले . सुलोचनाबाई फक्त त्यांच्या ठसकेबाज आवाजासाठीच नव्हे, तर सामाजिक कार्यासाठी ही लोकप्रिय होत्या, वेळप्रसंगी अनेकांना स्वतः दागिने देऊन त्यांनी आर्थिक मदत केली, महाराष्ट्रातील खानदेश, विदर्भ तसेच मराठवाड्यातील शाळा महाविद्यालयांना त्यांनी भरभरून आर्थिक मदत केली. अनाथश्रमासाठी ही पैसे दिले, या काळात त्या आजारी पडल्या होत्या, परंतु जीवाची पर्वा न करता सामाजिक भान जपलेल्या
सुलोचना चव्हाण यांनी अनेकांना मदत केली, तसेच पुण्याच्या पानशेत धरण फुटी नंतर झालेल्या भीषण परिस्थितीला त्यांनी मदत करण्यासाठी कार्यक्रम केले,

नागालँड येथे झालेल्या अंतर्गत युद्धात लष्कराला मदत करण्यासाठी आणि कार्यक्रम सादर करून मदत केली,मराठवाड्यातील नांदेड येथे डॉ,.भुसारी यांनी बांधलेल्या कुष्ठधाम रुग्णालयासाठी मदतनिधी म्हणून 10 कार्यक्रम साजरे करून नऊ लाख रुपये एकत्रित करून सुपुर्द केले, दिलेला शब्द त्यांनी पाळला, सुलोचना चव्हाण यांनी सातासमुद्रापार लावणी पोहोचवली, खरोखर लावणी त्यांनीच अजरामर केलेली आहे, लावणी वर तिने आपला नम्रतेचा पदर ठेवला, उपजतच गायनाची नैसर्गिक देणगी त्यांना लाभलेली होती, त्यांनी कोणाकडून ही गायनाचे शिक्षण घेतले नाही, शब्द सूर आणि ताल यांचा अचूक संगम घडविला.त्यांच्या गाण्याने रसिकावर मोहिनी घातली, शब्दांचे अर्थ समजून लावणी गाण्याची कला पती शामराव महादेव कदम यांच्याकडूनच त्यांनी आत्मसात केली. त्यामुळे त्या पतीलाच गुरुस्थानी मानायच्या,१३ मार्च हा त्यांचा वाढदिवस,यामुळे सिलोन रेडिओवरून सकाळी ७:३० ते ९ या वेळेत हिंदी चित्रपटातील गाणी लावली जातात,

ही परंपरा आजही पाळली जाते, त्यांच्या सर्व कार्याचा आढावा घेऊन वेगवेगळ्या अनेक सेवाभावी संघटनांनी, संस्थानी त्यांना पुरस्कार दिले,१९६५ मध्ये महाराष्ट्र सरकारचा ‘मल्हारी मार्तंड ‘या चित्रपटाच्या पार्श्वगायना करीता पुरस्कार देण्यात आला,
महाराष्ट्र सरकारचा जीवनगौरव पुरस्कार,
पुणे महानगरपालिकेतर्फे सन २००९ चा राम कदम पुरस्कार ,महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार,
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा २००९चा राम कदम कला गौरव पुरस्कार, गंगा जमना पुरस्कार,तसेच काही दिवसापूर्वीच लावणीची सेवा केल्याबद्दल त्यांना भारत सरकारने’ पद्मश्री’ हा मानाचा किताब देऊन त्यांच्या संगीत क्षेत्रातील कलेचे जाहीरपणे कौतुक केले होते,

असे अनेक पुरस्कार त्यांच्या नावावर जमा आहेत, गायन करणे ही एक उपजत कला आहे, बैठकीची लावणी किती समृद्ध असावी याचा वस्तू पाठ सुलोचनाताईंनी घालून दिला, त्यामुळेच लावणीला राज मान्यता मिळाली, महाराष्ट्राच्या साहित्यातील लोकसंगीतातील दैदीप्यमान व्यक्तीमत्व म्हणजे सुलोचनाताई होय, त्या संगीत क्षेत्राच्या कोंदणातील तेजस्वी हिरा होत्या,लावणीमुळे मनात चैतन्य निर्माण होते, व्यक्ती वार्धक्य विसरून काही काळ तरुण होतो, मनात असलेले दुःख विसरून जातो व आनंदी होतो, त्यांच्या कुटुंबाने पद्मश्री मिळाल्यानंतर आनंद व्यक्त केला, हा पुरस्कार स्वीकारताना त्यांनी मराठी भाषा समृद्ध झाली पाहिजे,असे म्हटले,

तब्बल सहा दशकांवरून अधिक काळ आपल्या गायनाने रसिक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवून मोहिनी घालणाऱ्या ज्येष्ठ गायिका काही महिन्यापूर्वी घरात पाय घसरून पडल्यामुळे त्यांच्या कमरेचा हाड मोडलं होतं, त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली होती, अनेक शस्त्रक्रिया केल्या परंतु अखेर फणसवाडी येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने १० डिसेंबर २०२२ रोजी त्यांची प्राणज्योत ९२ व्या वर्षी मावळली, मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला, त्यांच्यावर मरीन लाईन्स येथील चंदनवाडी स्मशानभूमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले, म्हणून म्हणावे वाटते,

“समाजाला आपण इतके दिल्या की तुमचा समाजाला अभिमान वाटावा, जीवन असे जगलात आपण की जीवनालाही गौरव वाटावा,”
त्यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली,

शब्दांकन
विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी, ता, मुखेड जि. नांदेड
संस्थापक अध्यक्ष: प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *