साधुसंताचे कार्य सदैव प्रेरणादायी

 ‘महाराष्ट्र ही साधुसंताची भूमी आहे’, ‘साधु संत येती घरा। तोचि दिवाळी दसरा।। असे आपण सर्व जण मोठ्या अभिमानाने म्हणत असतो. कारण त्यांनी संपूर्ण जीवन अशिक्षित लोकांना सुधारणा करण्यासाठी घालविले, कशाचाही मोह नाही, संपत्तीची आवश्यकता नाही. स्वतः च्या नावावर गुंठा भर जमीन असावी अशी अपेक्षा नाही, अशा संतानी समाजात चैतन्य व उल्हास निर्माण केले. समाजातील अज्ञानी लोकांना जागृत करण्याचे फार मोठे कार्य संतानी केले,
तर आज काही लोकांनी त्याच्या कार्यावर आक्षेप घेतला आहे,
त्यासाठी हा लेखन प्रपंच………

समाजाची जडणघडण करण्याचे काम साधुसंतानी आठशे ते नऊशे वर्षांपूर्वीच केले आहे, या संतांनी उपदेश करून समाज प्रगल्भ करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे समाजामध्ये एकोपा निर्माण झाला. महाराष्ट्र,कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यातून अनेक दिंड्या पंढरपूरला जातात.आपण सगळे एक आहोत म्हणून कोणत्याही धर्माला येथे दूर लोटले जात नाही. सर्व मानव एकच आहेत. हा मानवतावाद वारकरी संप्रदाय शिकवतो.’यारे यारे लहान थोर । करावा विचार। नलगे चिंता कोणाशी।।असे म्हटले जाते.तुम्ही मोठे आहोत का छोटे आहोत, पुरुष आहात का स्त्री आहात दिव्यांग, गरीब पीडित ,वृद्ध ज्ञानी, अज्ञानी सर्वजण या. याचा विचार वारकरी संप्रदाय करत नाही. सर्व बाजूने विचार केला तर महाराष्ट्रा मध्ये जे परकीय आले, त्यांनी अंदाधुंदी माजवली. ती कमी करण्यासाठी संतानी कमर कसली. वारीचा अर्थच आहे. वार करी म्हणून शैक्षणिक अभ्यासक्रमामधून विद्यार्थ्यांना वेगवेगळी माहिती अभंगाच्या रूपाने देण्याचं काम केलं जाते, एखाद्ये वाईट वक्तव्य करून समाजामध्ये अशांतता पसरविणे चांगलं नाही.

वारकरी संप्रदायाचा अभ्यास खोलवर केल्यानंतर आत्मिक शांती मिळते. काहीही बोलणे म्हणजे मी हुशार आहे, असं दाखवून देणे होय, परंतु एखादा अभंग आपण निरूपणासाठी घेतल्या नंतर त्याचा अर्थ काय होतो? हे अगोदर बोलणाऱ्याला समजला पाहिजे. जर अर्थ समजला नाही तर अनर्थ होतो.आज महाराष्ट्रामध्ये जिकडे तिकडे काही लोक साधु संताबद्दल वाटेल ते बरळत आहेत. टाळ्या मिळवत आहेत. टाळी वाजवणाऱ्या व्यक्तीलाही कळत नाही, की आपण कशासाठी टाळी वाजवली. येथे कोणत्या प्रकारचे अर्थ आपल्याला घ्यावयाचे आहेत ,जर असंच चालत राहिलं तर? समाज दुभंगला जाईल, राष्ट्रीय एकात्मता नाहीशी होईल, समाजात तेढ निर्माण होईल,
साधुसंतावरीला लोकांचा विश्वास कमी होईल, वेगवेगळ्या धर्मपीठातून, मठातून ,मंदिरातून मिळणाऱ्या आध्यात्मिक ज्ञान लोकांना मिळणार नाही, त्याचे दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागतील.असं न होऊ देता प्रत्येक जबाबदार नागरिकांनी आपले वक्तव्य उदाहरणे सहित पटवून द्यावे, तेव्हा समाज चांगल्या रीतीने चालेल.

प्राचीन काळातील संताला नाव ठेवणे, त्यांच्याविषयी आक्षेपार्हे बोलणे, तीन-तीन वेळेस तेच मुद्दे उकरून काढणे, माध्यमातून पुन्हा पुन्हा तेच विधान दिवसभर दाखवणे,समाजाची मन:स्थिती दोलायमान करणे, काही जणांना रूपक कथा कळत नाहीत, खरोखर त्या कथेतून काय बोध घ्यायचा आहे , छोटे-मोठे उदाहरण देऊन सांगतो,जीव भांड्यात पडणे. याचा अर्थ खरोखरच जीव जाऊन भांड्यात पडत नाही, अग ग ग विंचू चावला विंचू चावला …….तसे अनेक उदाहरणं आहेत की समाजामध्ये सरळ अर्थ त्यांना माहीत असतो, विंचू चावला म्हणजे काम, क्रोध,लोभ, मोह, मद,आणि मत्सर या विकाराने मला झपाटलेले आहे, मतितार्थ माहिती नसतो,मग उलट्या पद्धतीने त्याचे अर्थ घेतात.त्यासाठी आपली स्वतःची बुद्धी परिपक्व केली पाहिजे, तरच प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला कळतो, समाजाची जडणघडण करते वेळेस सर्वांनी मिळून शांतता राखून आपली संस्कृती सभ्यता टिकून ठेवली पाहिजे, विचार स्वातंत्र्य आहे म्हणून काही बोलू नये. आपण असे बोलावे की आपल्या बोलण्यावर इतरांनी विचारमंथन करावं.एवढं गोड आणि सत्य बोलावे.
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी शब्द हे शस्त्र आहेत ते जपून वापरा, असे कितीतरी उदाहरणे देऊन त्यांनी आपल्याला सांगितलेले आहे,

जर आपण चुकीचं बोलल्यानंतर समाजावर त्याचे विघातक परिणाम होतात, म्हणून बोलणाऱ्या व्यक्तीने काळजीपूर्वक वक्तव्य करणे अतिशय गरजेचे आहे, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीनी संत निवृत्तीनाथा कडे पसायदान मागितलेले आहे, पसायदानातून आपल्याला हे ‘विश्वचि माझे घर ‘असे सांगितलेले आहे,
याचा अर्थ प्रत्येक घर माझंच आहे. असा होत नाही ,घरातील प्रत्येक व्यक्ती आपलेच बहीण -भाऊ आहेत, सगळे मिळून आपण एक आहोत, असा त्याचा सरळ अर्थ घ्यावा लागतो, जो चांगलं कर्म करेल ,त्याला चांगले फळ मिळतील, वाईट कर्म करेल त्याला त्याची शिक्षा होईल, चांगल्या व्यक्तीची त्यामुळे समाजामध्ये प्रतिष्ठा निर्माण होईल, एखादा व्यक्ती वाईट आहे त्यांनी वाईट कर्म केले तर तो दुर्जनाच्या यादीत जाऊन बसेल ,आणि परमेश्वर त्याला त्या पद्धतीची शिक्षा देईल, असं वारकरी संप्रदाय सांगतो, संत कृपा झाली।इमारत फळा आली।।
ज्ञानदेवें रचिला पाया । उभारिले देवालया।।नामा तयाचा किंकर ।त्याने केला हा विस्तार।। जनार्धन एकनाथ। खांब दिला भागवत।। तुका झालासे कळस ।भजन करा सावकाश।।
संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पायाच घातला आहे ,

नामदेवांनी त्याला खांब बसवलेले आहेत, संत एकनाथ महाराजांनी भागवत धर्माच्या मंदिराला भक्कम आधार दिला, संत तुकाराम महाराजांनी त्यावर कळस बसवलेला आहे ,असे स्पष्ट संत बहिणाबाई अभंगातून निरूपण करतात,
वरील अभंगातून सर्व संतांनी या वारकरी संप्रदायाचा पाया मजबूत घालून कळस काढलेला आहे, त्यामुळे कोणीही काही ही ओरडत असले तरी तसभूर ही फरक पडणार नाही.

यामध्ये वास्तवता आहे, सत्यता आहे आणि ते चिरकाल टिकणार आहे, त्यासाठी शब्द जपून वापरावेत, शब्दांची किमया फार मोठी आहे,
ते तुकाराम महाराज आपल्या अभंगातून सकल समाजाला समजावून सांगतात ,
शब्द काय आहेत ?,शब्द तुम्ही कसे वापरावेत?,शब्दांमुळे काय प्रसंग घडतात,? त्याकरीता खालील अभंग दिला आहे,
‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने’। शब्दाचीच शस्त्रे यज्ञ करू।।१।।शब्दाचि आमुच्या ,जीवाचे जीवन ।
शब्द वाटून धन, जन लोंका।।२।।
तुका म्हणे पहा, शब्दाचि हा देव। शब्दाचि गौरव ,पूजा करू।। ३।।

या अभंगातून सर्व काही शब्दांची किमया, शब्दाचा मोठेपणा,शब्दाची श्रीमंती, शब्दाचा गौरव, शब्द हे शस्त्र, रत्न, सर्व काही आहेत, म्हणून वाचाळ वीर न होता कृतीवर व्हावेत,असे मला वाटते, तुम्ही जर चांगले वागले नाही तर संत ज्ञानेश्वर महाराज पसायदाना तून तुम्हाला सांगतात,
जे खळांची व्यंकटी सांडो।
तया सत्कर्मी रती वाढो।।
भूता परस्परे पडो।
मैत्र जीवांचे ।
दुरितांचे तिमिर जावो।
विश्व स्वधर्म सूर्य पाहो ।
जो जे वांछील।
तो ते लाहो प्राणिजात।।

समाजात काही दृष्ट लोक आहेत.त्यांच्यातील दुष्ट विचार नष्ट होण्यासाठी माऊली पसायदानातून मागतात, समाजामध्ये चांगले व्यक्ती असतात.तसे दुर्जन ही व्यक्ती असतात
दुर्जनामुळे समाजाला त्रास होतो, दुर्जन हे समाजात दुष्ट विचार पसरवितात, वाईट विचार सांगतात ते अल्पसंतुष्ट असतात, चांगल्या मंगलमांगल्य प्रसंगात विघ्नं आणतात, वारकरी संप्रदायामध्ये चिकित्सा केली आहे, वर्तनात परिवर्तन केले आहे, वाल्याचा वाल्मिकी झाला आणि त्यांनीच रामायण हा ग्रंथ रचला, काही विज्ञानावर आधारित गोष्टीला आधार आहे, म्हणून वारकरी संप्रदाय एवढा मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे, दररोज मंदिरातून लाखो भक्त चांगल्या गोष्टीचे गायन करतात,

हजारो कीर्तन कार दररोज कोणत्याही ठिकाणी कीर्तन करत असतात,भागवत गीता जयंती, अखंड हरिनाम सप्ताह, दत्त जयंती, गुरुपौर्णिमा, छोट्या मोठ्या सर्व एकादशी, पुण्यस्मरणच्या वेळी कीर्तन महोत्सव ठेवला जातो, आषाढीपासून -कार्तिकी पर्यंत मंदिरात काकडा,भजन, हरिपाठ गातात, यामुळे समाजात चैतन्य व उत्साह निर्माण होतो,आपल्याला काही येत नाही, तेव्हा काही लोक इतरांना नावे ठेवतात, कोणत्याही चुकीच्या वलग्ना करतात, साधू संतांनी प्राणीमात्रावर दया करायला शिकविले, शेजाऱ्यावर माया करायला ही शिकवले, परोपकार वृत्ती शिकविले, पसायदानातून सर्वांना आपण एकच आहोत ही भावना निर्माण करून दिली, आषाढी आणि कार्तिकीला आळंदी आणि देहू येथून जाणाऱ्या पंढरपूरला दिंड्या धर्मनिरपेक्षता शिकवतात,

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ ।। सर्व जाती धर्माला या ठिकाणी एकाच वाटेने दिंडीतून जाता येते, ही शिकवण इतर कुठे ही मिळत नाही हे सर्वांनी लक्षात घ्यावे,वारकरी संप्रदायामुळे आज जातीयता हद्दपार झालेली आहे,संत सावता माळी यांनी भाजीपाल्यात विठ्ठलाला पाहिले, कांदा मुळा भाजी ।अवघी विठाई माझी।। साक्षात पांडुरंगानी जनाबाईला दळण दळू लागले, संत चोखोबांना गुरे -ढोरे ओढू लागले, संत नामदेवाचे नैवेद्य पांडुरंगानी देवळात प्राशन केले,

गुरुग्रंथसाहिबां मध्ये अनेक अभंग संत नामदेवाचे आहेत, पंजाब राज्यातील घुमान येथे अखिल भारतीय साहित्य संमेलन भरले होते. भक्त प्रल्हादाला खांबातून नृसिंह प्रकट होऊन दर्शन दिले संत कान्होपात्राला पांडुरंगानी मंदिरात जागा दिली, कुर्मदासाला पायी वारीच्या वाटेमध्ये जाऊन भेटले.

संत नरहरी सोनारांनी केलेल्या शैव आणि वैष्णवा मधील भेद त्यांनी नाहीसा केला,संत गोराबा महाराजांनी चिखलात तुडविलेले बाळ जिवंत करून दिले,
संत एकनाथ महाराजांनी काशीवरून आणलेले पाणी तहानलेल्या गाढवाला पाजवले, वाळूतून आणवाणी पायाने चालणाऱ्या दलित मुलांना कडेवर उचलून घेऊन मानवतावादाचे आदर्श धडे घालून दिले , वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशी बहुजन समाजातील लोकांना भोजन करण्यास बोलाविले. ही त्याकाळातील फार मोठी सामाजिक क्रांती होती, म्हणूनच साधू संतांचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील.

संत मीराबाईंनी आपले संपूर्ण आयुष्य श्रीकृष्णाला अर्पण केले, महात्मा बसवेश्वरांनी एकेश्वरवाद निर्माण करून सामाजिक एकात्मता समाजामध्ये निर्माण केली, संत कबीरांनी आयुष्य भर राम -रहीम एकच आहेत असे सांगून सत्यालाच ईश्वर म्हटले आहे, जाती न पूछो साधु की, पुछी लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का,पडी रहने दो म्यान, अशा रोखठोक शब्दात बोलून त्यांनी त्या काळातील जातीभेद बाजूला केला,साधूची जात महत्त्वाची नसून ज्ञान महत्त्वाचे आहे, असा संदेश सकल समाजाला दिला,
संत गाडगेबाबांनी संपूर्ण जीवन साफसफाई मध्ये घालून मानवाला स्वच्छतेची आवड निर्माण केली. हजारो कीर्तन करून अंधश्रद्धेला पळून लावले,

संत मुक्ताबाईनी चुकलेल्या व अहंकारी लोकांना रोखठोक बोलून कान उघडणी केली,
अशा प्रकारे सर्व संतांनी फार मोठमोठे कार्य मानवासाठी केलेले आहेत.
सर्व धर्माचे साधुसंत एकाच विचारांनी चालणारे होते, या सर्व संताना प्रत्यक्ष विठ्ठलांनी जवळ घेतले,
विठु माझा लेकुरवाळा। संगे गोपाळांचा मेळा ।। त्यामुळेच आपण म्हणतो, सर्व जातीच्या साधूसंतांना त्यांनी अंगाखांद्यावर खेळविले, बोटाला धरून शिकविले.

त्यासाठी आपण नेहमी चांगले बोलावे, संतांनी त्यांची शिकवण त्यांनी मांडलेले वास्तववादी विचार आपण सर्वांनी निस्पृह पणे आत्मसात करावे, आजच्या घाईगडबडीच्या काळात आपल्या मनाची घालमेल न होता स्थिरता ठेवावी सर्वच संत मानवता वादी होते संतांच्या ठायी सर्वांचीच अपार श्रद्धा आहे,म्हणून संताबद्दल एक चुकीचं वाक्य सुद्धा तुम्हाला रसातळाला घेऊन जाते,याची जाणीव ठेवावी,म्हणून मी म्हणतो, ‘अहंकाराचा वारा न लागो राजसा। माझ्या विष्णू दासा भाविकाशी ।। जिथे अहंकार आडवा आला तिथे मानवी जीवन उध्वस्त झाले म्हणून समजावे, त्यासाठी संत तुकाराम महाराज आपल्याला उपदेश करतात।आता तरी पुढे हाचि उपदेश।
नको करू नाश आयुष्याचा।।
हे संत वचन सर्वांनीच सदैव लक्षात ठेवावे,नाही तर, संत निंदा ज्याचे घरी। नव्हे घर ते यम पुरी।। अशी अवस्था आपोआप आपलीच होते.
‘राम कृष्ण हरी’

शब्दांकन
विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी. संस्थापक अध्यक्ष: प्रा विठ्ठल बरसमवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *