सहलींमुळे अनुभवाच्या कक्षा रुंदावतात – गंगाधर ढवळे

नांदेड – शालेय जीवनात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शालेय तथा सहशालेय उपक्रमांतर्गत ‘सहल’ या उपक्रमामुळे जिवंत अध्ययन अनुभव देता येतात. तसेच सहलीमुळे बालकांच्या अनुभवाच्या कक्षा रुंदावतात, असे प्रतिपादन येथील साहित्यिक तथा मुख्याध्यापक गंगाधर ढवळे यांनी केले. यासाठी बंदिस्त भिंतीच्या आतील अभ्यासक्रम एक दिवस टाळून सहलीचे आयोजन करण्यात येते. म्हणूनच जवळा (दे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची सहल नांदेडच्या गुरुद्वारा येथे आयोजित करण्यात आली होती. 
सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी सहशिक्षक संतोष घटकार, आनंद गोडबोले, सूरज गवळी, मिलिंद गोडबोले, संघरत्न गोडबोले, साईनाथ गोडबोले आदींची उपस्थिती होती. 
              सहलीच्या निमित्ताने परिसरातील भौगोलिक तथा ऐतिहासिक माहिती मिळवण्यासाठी जवळा येथील जि. प. शाळेच्या मुलांनी वडेपुरी येथील रत्नेश्वरी, अन्नपूर्णा देवी मंदिर, तसेच झरी येथील गुरुद्वारा, विष्णूपुरीचे काळेश्वर मंदिर, जलाशय, नांदेड येथील गुरुद्वारा, दाभडचे महाविहार, सत्यगणपती आदी ठिकाणांना भेट दिली. या ठिकाणांशी संबंधित माहिती मिळवली.
प्रत्येक ठिकाणचे वेगळे महत्त्व आहे. यामुळे निरीक्षणे तथा माहितीचे संकलन आणि सारणीकरण हे कौशल्य आत्मसात करता आले. यानिमित्ताने सहभोजनाचा आनंदही मुलांनी घेतला. तसेच शिक्षकांनी दिलेल्या सूचनांचे विद्यार्थ्यांनी कसे पालन केले पाहिजे याचे खरेखुरे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी घेतले. ज्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता अधिक असते त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जाण्यास सक्त केली गेली.
सहलीच्या स्थळांचे पावित्र्य टिकविणे, कुठलीही नासधूस करु नये, आपल्यासोबतचा कचरा कचराकुंडीतच टाकणे आदी सूचनांचे विद्यार्थ्यांनी तंतोतंत पालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *