नांदेड (जिमाका) दि. 29 :-
कोविड-19 च्या आव्हानात्मक काळातही नांदेड जिल्ह्यातील जनतेने अतिशय जबाबदार वर्तन करुन सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत अत्यंत मोलाची समजदारी दाखविली आहे. जनतेच्या या सहकार्यामुळेच कोविड-19 सारख्या संसर्गजन्य आजाराला आपण गणेशोत्सव काळात नियंत्रीत ठेवू शकलो. आजवर दाखवलेली समजदारी व समंजस भुमिका जिल्ह्यातील जनता गणपती विसर्जनाच्या दिवशीही दाखवेल असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला.
येत्या एक सप्टेंबर रोजी होणाऱ्या गणेश विसर्जनाबाबत त्यांनी आढावा घेऊन संबंधितांना योग्य त्या सुचना दिल्या आहेत. गोदावरी ही लोकांच्या श्रद्धेची नदी असून या नदीचे पावित्र्य राखण्याची सर्वांची जबाबदारी आहे. हे पावित्र्य अधिक समृद्ध व्हावे, गोदावरी नदीच्या पर्यावरण दृष्टिने गणेश विसर्जनाची मूर्ती इतर नैसर्गिक ठिकाणी विसर्जीत करता याव्यात यासाठी जिल्हा प्रशासनाने इतर जागा शोधून ठेवल्या आहेत.
अनेक खाणींमध्ये स्वच्छ पाणी उपलब्ध असून त्याठिकाणी या मुर्तींचे विसर्जन करुन कमीत-कमी प्रमाणात पर्यावरणाला हानी पोहोचावी याची नियोजन केले आहे. या सर्व ठिकाणी लोकांनी गर्दी करुन जाण्यापेक्षा आपण शहरात विविध ठिकाणी मुर्ती संकलन केंद्र स्थापन करीत आहोत. या केंद्रांवर सर्व नागरिकांनी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपली मुर्ती सुपूर्द करुन नांदेड जिल्ह्यातील पर्यावरण रक्षणाच्या संकल्पनेला हातभार लावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
महानगरपालिकेतर्फे विविध ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र स्थापित केले जात आहे. या केंद्रांवर विविध सेवाभावी व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधींना सहभागी करुन घेतले जाणार आहे.