नांदेड-
मानवी जीवन हे सुख दुःखांनी ओतप्रोत भरलेले असते. संघर्षमय जीवनात आलेल्या अनेक अनुभवांच्या आधारावर मोहनराव बुक्तरे यांनी काव्यनिर्मिती केली असून ती जीवनाचे सौंदर्य शोधणारी कविता आहे असे प्रतिपादन येथील साहित्यिक,समीक्षक गंगाधर ढवळे यांनी केले. येथील ज्येष्ठ कवी मोहनराव बुक्तरे लिखित काजवातुषार काव्यगंध या कवितासंग्रहाचे प्रकाशन काल ता.३० रोजी शहरात मान्यवर व्यक्तींच्या हस्ते झाले त्यावेळी बोलत ते होते.
शहरातील चैतन्य नगर परिसरात बी अँड सी काॅलनीतील पेरियार रामास्वामी वाचनालयात अक्षरोदय साहित्य मंडळाकडून कवी मोहनराव बुक्तरे लिखित काजवातुषार काव्य गंध या कवितासंग्रहाचे प्रकाशनाचा आॅनलाईन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी शिक्षण संचालक नंदन नागरे, लेखिका लताताई शिंदे, प्रकाशक सदानंद सपकाळे, कवी मोहनराव बुक्तरे, साहित्यिक गंगाधर ढवळे यांची प्रमुख भाष्यकार म्हणून उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष कादंबरीकार चंद्रकांत चव्हाण हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय संविधानाला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरती जोंधळे यांनी केले. इंदूप्रभा प्रकाशनाचे सदानंद सपकाळे यांनी मनोगत व्यक्त केले. कवी मोहनराव बुक्तरे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. याच कार्यक्रमात कवी मोहनराव बुक्तरे यांचा अक्षरोदय साहित्य मंडळ, मातोश्री भागाबाई डोंगरे प्रतिष्ठान उमरी, सप्तरंगी साहित्य मंडळ महाराष्ट्र, युगसाक्षी साहित्य सभा, पाथरड येथील गावकरी यांच्या वतीने यथोचित सत्कार केला. यावेळी सप्तरंगी साहित्य मंडळाचे अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, ग्रामीण कवी नागोराव डोंगरे, निवृत्ती लोणे, शरदचंद्र हयातनगरकर, थोरात बंधू, विठ्ठलकाका जोंधळे, शंकर गच्चे, कैलास धुतराज, जयवंत राव, मिलींद दिवेकर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षरोदय साहित्य मंडळाचे राज्य सचिव नरेंद्र धोंगडे यांनी केले, तर आभार प्रदिप बुक्तरे यांनी मानले. न्यायधिश म्हणून निवड झालेल्या आम्रपाली बुक्तरे यांचा अक्षरोदयच्यावतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अक्षरोदय साहित्य मंडळाचे उषाताई ठाकूर,नांदेड जिल्हाध्यक्ष मारोती मुंडे, कार्याध्यक्ष सुमेध चौदंते, अजित अटकोरे, प्रसिद्धी प्रमुख पंकज कांबळे, आविष्कार शिंदे व अक्षरोदय साहित्य मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रमात सुरक्षित वावराचे नियम पाळण्यात आले. तसेच मास्क, सॅनिटाईझर यांचा वापर करण्यात आला.