कवी – नारायण वामन टिळक (रेव्हरंड टिळक)
**कविता – केवढे हे क्रौर्य !*
कवी रे.ना.वा. टिळक हे *फुलामुलांचे कवी* म्हणून ओळखले जात. साधी सरळ रचना आणि प्रामाणिक भावोत्कट शब्द ही त्यांच्या काव्यरचनेची वैशिष्ट्ये होती.
त्यांचे “टिळकांच्या कविता भाग-१” आणि “अभंगांजली” हे दोन संग्रह विशेष लोकप्रिय झाले.
कवी रे.ना.वा.टिळक यांचा जन्म ६ जानेवारी १८६१ रोजी रत्नागिरी जिल्ह्यात करंजगाव येथे एका गरीब ब्राम्हण कुटुंबात झाला.
घरात अस्थैर्य, वडीलांचा रागीट तापट स्वभाव, आर्थिक चणचण यामुळे बालपणापासूनच त्यांना अनेक अडचणी आल्या.
सोवळे ओवळे पाळण्याचा रुढींचा पगडा असलेल्या चौकटी बाहेर पडून कविता करणे, ख्रिस्ती धर्म स्विकारणे आणि ख्रिस्ती धर्माचा प्रसार प्रचार करणे हे त्या काळात कोणत्याही क्रांती पेक्षा कमी नव्हते.
रे.ना.वा.टिळक यांची आयुष्याची बरीच वर्षे अनेक स्थळी वास्तव्याची ठिकाणे बदलत आणि सामानांची जमवाजमव करण्यात गेली.
या प्रतिभावंत कवीचा ९ मे १९१९ रोजी मृत्यू झाला.
—————–
“केवढे हे क्रौर्य” ही कविता शाळेपासूनच आपल्या सर्वांच्याच परिचयाची आणि आवडीची आहे ती यासाठी की तीची लय आणि आशय या दोन्ही गोष्टी आपल्या मनाचा ठाव घेतात आणि आपल्या मनावर गारूड करतात.
ही कविता पृथ्वी वृत्तामध्ये आहे आणि शेवटचे कडवे वसंततिलका या वृत्तामध्ये आहे.बाणाने जखमी होऊन घायाळ झालेली पक्षीण आपल्या पिल्लांना सांगत असते, की माणूस खूप कृतघ्न आणि दूष्ट आहे.
त्याच्याच बाणाने मी घायाळ झाले आहे. मी आपल्यासाठी शेवटचा घास आणलाय तो गोड मानून घ्या.
आणि आपण आता देवाची प्रार्थना करूयात, तोच तुम्हाला पुढील आयुष्यात जगण्याचं बळ देईल. त्यानंतर ती पक्षीण पिल्लांचं घरटं तिच्या जखमी रक्ताने ओले होऊ नये म्हणून झाडाच्या तळाशी जमिनीवर प्राण सोडते…
पृथ्वी वृत्ताची लय आणि भावनेला हात घालणारा आशय या दोन्ही गोष्टी या कवितेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात…
*केवढे हे क्रौर्य !*
क्षणोक्षणी पडे, उठे परि बळे, उडे बापडी,
चुके पथहि येउनी स्तिमित दृष्टिला झापडी;
किती घळघळा गळे रुधिर कोमलांगातुनी,
तशीच निजकोटरा परत पातली पक्षिणी.
म्हणे निजशिशूंप्रति “अधिक बोलवेना मला,
तुम्हांस अजि अंतिचा कवळ एक मी आणिला;
करा मधुर ! हा चला ! भरविते तुम्हा एकदा
करो जतन यापुढे प्रभु पिता अनाथा सदा!
अहा ! मधुर गाउनी रमविले सकाळी जना,
कृतघ्न मज मारितील नच ही मनी कल्पना !
तुम्हास्तव मुखी सुखे धरुनि घास झाडावरी
क्षणैक बसले न तो शिरत बाण माझ्या उरी !
निघून नरजातिला रमविण्यात गेले वय,
म्हणून वधिले मला किती दया ! कसा हा नय !
उदार बहु शूर हा नर खरोखरी जाहला
वधून मज पाखरा निरपराध की दुर्बला !
म्हणाल भुलली जगा, विसरली प्रिया लेकरा,
म्हणून अतिसंकटे उडत पातले मी घरा ;
नसे लवहि उष्णता, नच कुशीत माझ्या शिरा,
स्मरा मजबरोबरी परि दयाघना ईश्वरा !”
असो; रुधिर वाहुनी नच भिजो सुशय्या तरी
म्हणून तरुच्या तळी निजलि ती द्विजा भूवरी ;
जिवंत बहु बोलके किति सुरम्य ते उत्पल
नरे धरुनि नाशिले , खचित थोर बुद्धिबल !
मातीत ते पसरले अतिरम्य पंख,
केले वरी उदर पांडुर निष्कलंक !
चंचू तशीच उघडी, पद लांबवीले ,
निष्प्राण देह पडला , श्रमही निमाले !
◆◆◆◆◆- रे.ना.वा.टिळक◆◆◆◆◆(संदर्भ – इंटरनेट)
(विजो) विजय जोशी – डोंबिवली
९८९२७५२२४२