म. फुलेच्या सुख – धर्म आणि स्वर्गाची संकल्पना- बहुजन समाज स्वीकारेल का?

 

“सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक” हा क्रांतिबा ज्योतिबा फुले यांचा तिसरा चिंतनशील ग्रंथ. हा ग्रंथ क्रांतीपित्याने वयाच्या 62 व्या वर्षी 1889 साली समाज हितार्थ दिलेला आहे. पृथ्वीतलावरील मानवी समूह अर्थात सर्व स्त्री-पुरुष धार्मिक गुलामगिरीतून मुक्त व्हावीत आणि समाज शोषणमुक्त व्हावा या ध्येयप्राप्तीसाठी समग्र मानवाच्या सर्वांगीण उन्नतीचा एक मार्ग म्हणून जीवन जगण्याच्या प्रक्रियेकडे पाहिले जाते. खरे तर, धर्म आणि धार्मिक कृती म्हणजे समाज जीवनात जगण्याची नीतीप्रिय वृत्ती असेही समजले जाते. मानवाचे धार्मिक आणि नैतिक जीवन उन्नत व्हावे . जगण्याची परिभाषा ही जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर नीतिमान व्हावी हीच प्रांजळ भूमिका क्रांतीपिता महात्मा फुले यांच्या “सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक” या लेखनामागे आहे. 1889 या वर्षात क्रांतीबा अर्धांगवायूच्या भयंकर आजारामध्ये असताना, शरीराची उजवी बाजू कार्यशील नसतानाही, समाज नीतिमान बनवणे. त्यासाठी समाजात नैतिकतेची प्रतिष्ठापना करणे गरजेचे वाटल्याने आणि पृथ्वीतरावरील सर्व धर्म हे धार्मिक कर्मकांडाच्या माध्यमातून मानवी समूहाचे शोषण करीत होते. हे क्रांतीबांना ज्ञान होतेच म्हणून त्यांनी डाव्या हाताने सार्वजनिक सत्य धर्म या ग्रंथाचे लेखन केले. ज्यातून मानवी समूहाचे धार्मिक जीवन सुखी आणि संपन्न होईल. माणूस भेद निर्माण होणार नाहीत. समाज नीतिमान बनेल.समाजात बैकी होण्याऐवजी एकी राहील. जगात सुख -संपन्नतेचे आणि सदाचाराचे मानवी जीवन असेल. यासाठीच आजारात असतानाही त्यांनी “सार्वजनिक सत्यधर्म” या ग्रंथाची निर्मिती केली.
“सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक” अर्थात हा ग्रंथ सुखमय जीवन जगण्याचा एक उत्कृष्ट जीवन मार्ग आहे. जो की, सत्य आणि न्यायावर अधिष्ठित आहे. जगातील सर्व मानव समूहासाठी तो सार्वजनिक नि तो सत्य शोधणारा सत्यधर्म. असत्याला जेथे वावस नाही म्हणून सत्यधर्म. धर्माच्या परिभाषेत सत्याची चाड असली पाहिजे. असा आग्रह धरणारा सत्यधर्म. त्यात जात,लिंग, पंथ, वेश, भाषा, गरीब, श्रीमंत,स्त्री, पुरुष असा कुठलाच माणूस भेद नाही नि समाज भेदही नाही म्हणून तो सार्वजनिक होय. सार्वजनिक सत्यधर्मात ईश्वर ही संकल्पना महात्मा फुले यांना मान्यच नाही म्हणून क्रांतीबाने निर्मिक म्हणजे जगाचा निर्माता अर्थात निसर्ग. निसर्ग या निर्मिकाकडे जाण्यासाठ कोण्या दलालाची किंवा मध्यस्थींची गरज नाही अर्थात पुरोहित, पुजारी, धर्मप्रमुख बडवे- भडवे यांची गरज नाही. त्यांच्या मंत्र-तंत्र, पूजा, अनुष्ठान कुठल्याच विधीची गरजच नव्हे तर स्थानही नाही. पुजारी आणि त्यांच्या विधीतून निर्माण होणारी उच्च – निच्च, श्रेष्ठ , कनिष्ठ, पवित्र- अपवित्र भाव पूर्णतः उध्वस्त करून माणूस म्हणून मानवी समूहासाठी विवेकी आणि विज्ञाननिष्ठ आचरण करण्याचा जीवनमार्ग म्हणजे “सार्वजनिक सत्यधर्म” हा होय.
सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक या सत्यशोधनाच्या आणि सत्यवर्तनाच्या धर्मग्रंथात क्रांतीबा फुले यांनी मानवी समूहाला सुखमय आणि आनंदमय जीवन जगण्यासाठी जीवन आवश्यक एकूण 27 संकल्पनेच्या संदर्भाने प्रश्न- उत्तराच्या माध्यमातून चिकित्सक मांडणी केली आहे. जसे की, 1.सुख, 2.धर्मपुस्तक, 3.निर्माणकर्ता, 4.पूजा, 5.नामस्मरण, 6.नैवेद्य, 7.अनुष्ठान, 8.स्वर्ग, 9.स्त्री -पुरुष, 10.पाप, 11.पुण्य, 12. जातीभेद, 13.पशुपक्षी आणि मानव यातील भेद, 14.धर्मनिती, 15.सत्य, 15.अवकाशातील 26.तर्क, 17.दैव, 18.आर्यभट ब्राह्मणांची वेद मी सार्वजनिक सत्याची तुलना 19.सत्य, 20.अवकाशातील 21.ग्रह, 22.जन्म, 22.कन्या, 23. लग्न , 24.दुष्टाचरण, 25.मृत्यु 26.प्रेताची गती 27.श्रद्धा अशा एकूण सत्तावीस मानवी समूहाच्या सुहीताच्या संदर्भाने क्रांतीपिता फुलेंनी तर्कसंगत, विवेकी आणि विज्ञानवादी मांडणी केलेली आहे. त्याचे आम्ही नीटपणे आकलन करण्याची आणि जीवनात कार्यान्वित करण्याचीही गरज आहे. ज्यातून कुठेही, केव्हाही सत्य वर्तनी समाज निर्माण होऊ शकतो. हे मात्र त्रीकालाबाधीत सत्य आहे.
या लेखात क्रांतीपिता महात्मा फुले लिखित “सार्वजनिक सत्यधर्म” या ग्रंथांतर्गत फक्त सुख- धर्म आणि स्वर्ग या तीन जीवनावश्यक विषयाच्या संबंधाने ही मांडणी आहे. तीही क्रांतीबाच्या शब्दात म्हणून बहुजन समाजाने तंतोतंत कृतिशील आचरणात आणावी या अपेक्षासह….
1.सुख:-
यशवंत ज्योतिराव फुले यांनी महात्मा फुले यांना विचारलेला प्रश्न – मानवप्राणी एकंदर सर्व जगात कशाने सुखी होईल?
वरील प्रश्नाच्या उत्तरादाखल क्रांतीपिता ज्योतिबा फुले उत्तर देतात,
उत्तर:- सत्य वर्तन केल्याशिवाय मानवप्राणी जगात सुखी होणार नाही. याविषयी अखंडाच्या माध्यमातून प्रमाणही देतात.
सत्य सर्वांचे आधी घर ||सर्वधर्माचे माहेर ||
जगांमाझी सुख सारे || खास सत्याची ती पोर ||
सत्य सुखाला आधार||
बाकी सर्व अंधकार ||…..
सत्य आहे ज्यांची मूळ||
करी धुर्ताची बा राळ ||
या खंडाच्या प्रमाणाच्या माध्यमातून लोक सुखाचा विचार क्रांतिबा करतात. सत्य वर्तन केल्याशिवाय मानवी प्राणी जगात सुखी होणार नाही . ही मूल्यनिष्ठता अधोरेखित होते. सत्याच्या आधाराशिवाय सुख निर्माण होत नाही म्हणून सुखाला सत्याचाच आधार आहे बाकी सर्व अंधकार. असे स्पष्टपणे सांगतात. जे जे दुर्जन आणि मतलबी ग्रंथाच्या आधारे समाजाला लुबाडणारे त्यांचा धूर्तपणा उघडा करणे. हे सत्यधर्माची मूळ आहे म्हणून सत्यवर्तनाने जगा. सत्याच्या सामर्थ्याने ढोंगी लोक मनातल्या मनात जळतात. इतकेच नाहीतर सत्यच्या अधिष्ठानावरच जीवन-आचरण केले पाहिजे. माणसा माणसात व्यर्थ डंभा अर्थात द्वेष -मस्सर पेटवू नका. असी सूचक सूचनाही करून,मानवी जीवन सुखी- संपन्न होण्यासाठी सत्तेवर्तनानेच जगले पाहिजे. हीच सुखाची संकल्पना सत्यवर्तनात आहे. ते बहुजन समाजाने स्वीकारण्याची नितांत गरज वाटते. त्याही पुढे जाता, यशवंत ज्योतिराव फुले हे दुसरा प्रश्न विचारतात की, तो असा,
देशस्थ आर्य रामदास भटजीबुवाचा श्लोक असा आहे की, जगी सर्व सुखी असा कोण आहे. विचारी मना तूच शोधूनी पाहे, या विषयी तुमचे काय म्हणणे आहे? या प्रश्नाच्या उत्तरादाखल महात्मा फुले म्हणतात, आर्य रामदास भटजीबुवानी या श्लोकावरून निर्मिकांने निर्माण केलेल्या पवित्र जगाविषयी व संसाराविषयी अज्ञानी शुद्ध -अतिशुद्रांच्या मनात वीट( वाईट भावना ) भरून तो सर्व व्यर्थ आहे असे सांगायचे आहे. कारण आर्य रामदासास सत्य कशाला म्हणावे हे केवळ आपल्या जातीमतलबासाठीच कळाले नव्हते असे मला वाटते. याविषयी मी तुम्हाला एक प्रश्न करतो, त्याचे उत्तर देताना आर्य रामदासाचा श्लोक कितपत खरा आहे, याविषयी तुम्हास सहज निर्णय करता येईल.असे स्पष्ट करून ते प्रश्न विचारतात की, असी कोणती शुल्लक सार्वजनिक सत्य आहे की, त्याचे आचरण केल्याने मानवप्राणी दुःखी होतो? या प्रश्नाला ज्योतिबा फुलेच उत्तरही देतात, शूद्र -अतिशुद्रांचे अज्ञान व त्याचा ( भट- ब्राह्मणांचा ) मतलबीपणा व धूर्तपणा होय. याविषयी धूर्त आर्य रामदासाने आपले ग्रंथात जे काही लिहिले आहे, त्यावर निपक्षपाताने विचार करावा, या वास्तव ते पुढे देतो.
देव झाले उदंड || देवाचे मांडीले भंड ||
भुता देवाचे थोतांड || एकची जाहले || मुख्य देव तो कळेना||
कशाचं काहीच मिळेना|| एकास एक कळेना अनावर ||
…. कैंचा लहान कैंचा थोर|| कळेचिना ||
शस्त्राचा बाजार भरला ||देवाचा गलबला झाला ||
लोक कमनेच्या व्रताला,||झोंबून पडती||
ऐसे अवघे नासले||
सत्य सत्य हरपले ||….
असत्याचा अभिमान देणे पाहिजे पतन||
म्हणोनिया ज्ञाते जन|| सत्यशोधती ||
वरील संदर्भीय रामदासाच्या श्लोकाचा हवाला देऊन महात्मा फुले म्हणतात, रामदास हा अस्सल आर्य ब्राह्मण कुळातील असता, त्याने आपल्यास रामशर्मा पद न जोडता अतिशूद्र सुरदासाचे पद आपल्या नावाने का जोडून घेतले? याची इंगित काय असावे, तेव्हा महात्मा फुले सांगतात, रामदास अट्टल धूर्त आर्य जातीतील साधू बनल्यामुळे, त्यांनी आपल्या नावास शर्मा असे पद जोडून न घेता अतिशूद्र सुरदासासारखा आपल्यास रामदास म्हणवून घेऊ लागला. यातील मुख्य इंगीत शूर शिवाजी महाराजास खुश करणे होय. त्याही पुढे ते सांगतात, निर्मिकांच्या नावावर धर्मसंबंधी दरोडे घातल्याने मात्र सुख होते व बंडखोरा पासून अज्ञानी व पंगु मानवास सोडवल्यापासून अथवा निराश्रीत, अंध व पंगु व पोरक्या मुलामुलीच व इतर सर्व प्रकारच्या संकटात पडलेल्या मानव बांधवास साह्या देण्यापासून मात्र सुख होत नाही. म्हणून तसे म्हणणे केवळ एखाद्या धूर्तपणाचे लक्षण आहे. म्हणजे एखाद्याने जग निर्माणकर्त्याचे अस्तित्व नष्ट करण्याप्रमाणे होय. यातून धर्माच्या ठेकेदारांचा धूर्तपणा, पूजापाठ करून सुखाच्या भुलतापा मांडणाऱ्या अध्यात्मिक आणि धार्मिक थोतांडांना महात्मा फुलेंची ही चपराक, सत्यवर्तनाची दीक्षा देते.
पृथ्वीतलावरील प्रत्येक धर्माचा मानवी समूहाला जीवन मार्गाची दिशादर्शन करणारा धर्मग्रंथ असतो. त्या त्या धर्म ग्रंथात त्या त्या धर्माच्या चालीरीती असतात. त्या त्या धर्मातील उपासक ते पवित्र मानतात.पण महात्मा फुलेंना
धर्म
धर्म पुस्तकाच्या संबंधाने बळवंत हरी साकवळकर यांच्या प्रश्नाला अर्थात कोणत्याच धर्म पुस्तकात सर्वथैव प्राणीमात्रास सुख देण्यापुरते सत्य नाही काय?
या प्रश्नाच्या उत्तरात, क्रांतीबा फुलेनी स्पष्टपणे सांगितले की, या पृथ्वीच्या पृष्ठभागावर जेवढे म्हणून मानवाने धर्म पुस्तक निर्माण केलेली आहेत. त्यापैकी एकाही धर्मग्रंथात आरंभापासून शेवटपर्यंत सारखे सार्वजनिक सत्य नाही. कारण प्रत्येक धर्म पुस्तकांमध्ये काहीएक व्यक्तीने त्या वेळेच्या प्रसंगास अनुसरून हेकडपणा केल्यामुळे, ते धर्म एकंदर सर्व मानवी प्राण्यास सारखे हितकारक न होता सहजच त्यामध्ये अनेक फळ्या होऊन त्या एकमेकाचा मनापासून हेवा व द्वेष करू लागतात.
दुसरी असे की, निर्माणकर्ता जर आपण सर्व मानवाचा निर्मिक आहे. तर एकंदर सर्व मानवी प्राण्यांमध्ये प्रत्येक व्यक्तीस त्याने कृपाळू होऊन एकंदर सर्व उत्पन्न केलेल्या मानवी अधिकाराचा यथायोग्य उपयोग घेता यावा.असे घडून येत नसल्यामुळे त्यास अनेक प्रकारच्या दुःसह अडचणी सोसाव्या लागतात. एकंदरीत क्रांतीबा, फुले सारांश रूपात सांगतात आपल्या सर्व सूर्यमंडळासह आपण वस्ती करणाऱ्या पृथ्वीचा निर्माणकर्ता जर एक आहे, तर तीजवरील अनेक देशातील लोकांचा एकमेकांशी वैरभाव माजून प्रत्येकामध्ये देशभिमान व धर्मभिमान खुळ व्यर्थ का माजले आहे? त्याचप्रमाणे या पृथ्वीवरील अनेक देशातील सर्व नद्या महासागरास मिसळत असता, त्यापैकी एका देशातील नदी पवित्र कशी होऊ शकेल?कारण ती महापवित्र नदी श्वानाचें मलमूत्र पोटात घेऊन समुद्रात वाहून नेण्यास कधी मागेपुढे घेत नाही. त्याही पुढे जावून क्रांतीबा विज्ञानवादी अधिष्ठानातून स्पष्टपणे सांगतात, या पृथ्वीच्या पृष्ठभागावर एकंदर सर्व मानवप्राणी अवयवाने व बुद्धी कौशल्याने एकसारखे असून त्यापैकी काही लोक पिढीजादा पवित्र बनवून श्रेष्ठ कशी होऊ शकतील? सर्वांसारखे त्यास जन्म -मरण असून ते सर्व प्रमाणे सदगुणात व दुर्गुणास निपुण नाहीत काय?
विज्ञानाच्या नियमाप्रमाणे वेगवेगळे गुणधर्म असणाऱ्या गुणसूत्राच्या संयोगातून मुले आणि मुली जन्मतात आणि ते अवयवाने आणि निसर्गत बुद्धी कौशल्याने सारखेच असतात. त्यांच्यात पवित्र, श्रेष्ठ अशी काही गुणधर्म निर्माण होत नाहीत? असे स्पष्टपणे क्रांतिबाने विचारले . इतकेच नव्हे तर त्यांचे जन्म -मरण सुद्धा सारखेच असताना, धर्मपुस्तकाच्या आधारे माणसा-माणसात माणूस भेद कोणी केला?तो असता कामा नये. माणूस एकसंघ समाज. एकजिन्सी असला पाहिजे. यासाठी अशा चित्कीसक धर्मग्रथांची क्रांतीबानी सार्वजनिक मानवीसमूहाच्या हितार्थ मांडणी केलेली आहे.
स्वर्ग:-
मनाजी बोलूजी मगर यांनी केलेला प्रश्न –
एकंदरीत जगातील सर्व अज्ञानी लोक स्वर्ग आहे म्हणून मानतात, त्या स्वर्गात पुण्यवान माणसांना यावत्काल, अद्यावत सुख मिळते, तसेच पातकी मनुष्यास त्याच्या पातकाप्रमाणे नर्कात यावतत्काल नाना प्रकारच्या यातना भोगाव्या लागतात. याविषयी तुमचे कसे काय म्हणणे आहे?
या प्रश्नाच्या उत्तर दाखल जोतिबा फुले स्पष्ट सांगतात. अतिप्राचीन काळी म्हणजे त्यावेळेस जिकडे -तिकडे सुधारणूक हा पदार्थ काय आहे? हे ज्यांना माहीत नव्हते. अशा लोकांनी स्वर्ग हा कोणी एक पशुपक्षादिकास भेडविण्याकरिता माळाच्या जितरापांतील हडकाला शेंदूर लावून थेट भावल्यासारखा बागुलबुवा अथवा बुजगावणे करून ठेवला होता. बहुजन समाजात देवाची भीती निर्माण करण्यासाठी केलेले धार्मिक षडयंत्र होते . असे क्रांतीबा स्पष्टपणे सांगतात. आणि स्वर्गाविषयी कोणीच विचार करून त्याचा खरा थांग पत्ता लावला नाही. असेही स्पष्टपणे बजावतात. त्याही पुढे जाता, स्वर्ग नाही म्हणून तुम्हास वाटते काय? या मानाजीच्या प्रश्नाला ज्योतिबा फुले उत्तर देतात, “त्यात काय संशय” ? असे स्पष्ट विधान स्वर्गासंबंधी करतात. स्वर्ग हेच पूर्णतः नाकारतात आणि पुढे जाऊन सांगतात, सर्व धर्मपुस्तकात स्वर्ग आहे म्हणून लिहितात परंतु पृथ्वीच्या पृष्ठभागावरील एकातरी ग्रस्ताने स्वतः स्वर्ग पाहिला म्हणून सांगता येईल का? कल्पिक्त पुराण शब्दाच्या अर्थाकडे लक्ष देऊन पौराणिक कथेवर विश्वास न ठेवता एखाद्या मनुष्य स्वर्ग पाहायला गेला व तो परत आला. अशी कधीतरी गोष्ट घडून आली आहे काय? व अशा प्रकारचे मनुष्य तरी एखाद्या भूभागावर सापडेल काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे नाही अशीच आहेत. निष्कर्ष स्वर्ग नाही. हेच सत्य- वास्तव नि विज्ञाननिष्ठ हे निर्विवादपणे क्रांतीबा सांगतात. नव्हे तर पटवूनही देतात. या देशातील तथाकथी धर्मग्रंथ, त्यांचे देव आणि धर्माच्या ठेकेदाराने सर्वसामान्य अज्ञानी लोकांकडून दाण -दक्षिणेच्या” नावाखाली लुबाडण्याचा मार्ग म्हणजे “स्वर्ग”होय. भट- ब्राह्मण – पुरोहितशाहीने सुखाचा मार्ग म्हणजे “स्वर्ग” या मोहात मानवी समूहाला गुंतवून कर्मकांडाची निर्मिती केली अर्थात स्वर्ग -नरक, पाप -पुण्याची निर्मिती आणि त्यातून मानवी समूहावर भयावह भीती निर्माण केली कारण इतरांनी, घाम गाळून, कष्ट करून निर्माण केलेली संपत्ती स्वर्ग -नरकाच्या नि पाप पुण्याच्या नावाखाली लाटणे आणि पिढीजात कष्ट न करता आयते बसून खाणे, यासाठीच पाप-पुण्य स्वर्ग- नरक. अवैज्ञानिक आणि खोट्या कल्पनेच्या आधारे शूद्र- अतिशूद्र बहुजन समाजात भय निर्माण करण्याकरिता निर्माण केलेले थोतांड म्हणजे स्वर्ग क्रांतीपिता ज्योतिबांनी स्पष्टपणे स्वर्ग आणि “नर्क” ( नरक ) नाही. हे जगजाहीर ऊजागर केले म्हणून भारतीय समाजातील मानवी समूहाने या कर्मकांडाच्या भीतीला न जुमानता प्रयत्नावर आढळ विश्वास ठेवून वैज्ञानिक तत्वप्रणाली समाज जीवनात अंगीकारावी आणि सुख- संपन्नतेने जगावे. धर्माच्या नावाखाली निर्माण केलेल्या कट -कारस्थानाला बळी न पडता सत्यशोधनाच्या मार्गाने सुखी -संपन्न व्हावे . असे आव्हानच नव्हेतर “स्वर्ग” या थोतांडाच्या निमित्ताने बहुजन समाज बांधवांना दिशादर्शनही क्रांतीबानी केले.
क्रांती पिता महात्मा फुले यांच्या जयंतीला क्रांतिकारी अभिवादन!
जय लहुजी- जय फुले -जय भीम -जय क्रांती- सत्य की जय हो!

 

 

 

प्रा. डॉ. भगवान वाघमारे, निलंगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *