लग्न समारंभ की, उधळपट्टी?

 

उन्हाळा सुरू झाला म्हणजेच लग्नाची रेलचेले सुरू होते. शहरी भागात व ग्रामीण भागात लग्नसराईला सुरुवात होते. लग्न म्हणजे खर्या अर्थाने एक संस्कार सोहळा असतो. पण आजकालच्या लग्न समारंभाच्या नावा खाली उधळपट्टी केली जात आहे का?असा प्रश्न पडतो आहे. कुठेतरी सांस्कृतिक चालीरीती, परंपरा मोडून प्री-वेडिंग शूट च्या नावाखाली बर्याच अनैतिक घटना घडताना दिसत आहेत.

परवाच मी आणि माझी छोटी मुलगी माझ्या मैत्रिणीकडे लग्नाला गेले होते. माझ्या मैत्रिणीच्या भावाच्या मुलाचे लग्न होते. लग्नात भरपूर थाटमाट होता. भलेमोठे मैदान, त्यात केलेली फुलांची आणि दिव्यांची रोषणाई, नवरानवरीच्या आणि दोन्ही घरच्या माणसांच्या अंगावर खूप महागाचे कपडे, त्याशिवाय दागदागिन्यांचा चमचमाट पाहून तर माझे बुवा डोळेच दिपले. नवरानवरीला शुभेच्छा देण्यासाठी भलीमोठी रांग लागली होती. तिथे आम्हीही रांगेत उभे राहिलो आणि अर्ध्या तासाने जेव्हा आमचा नंबर आला. तेव्हा ,नवरानवरीला शुभेच्छा देऊन मग जेवायला गेलो.
आजकाल काय पंगत नसतेच, त्याऐवजी बुफेची सोय केलेली असते. तसेच तिथेही होते. चायनीज, थाय, इटालियन, साऊथ इंडियन, पंजाबी, भेळपुरी सगळ्या त-हेच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल लावलेले होते. हि सर्व चटकदार पदार्थ काही लोकांच्या ताटा बाहेर येऊन लटकू लागली होती.

 

काहींनी तर अर्धेच खाऊन ती ताट तसेच ठेवून दिली होती.
त्याशिवाय वेलकम ड्रिंक म्हणून तीन चार प्रकारची मॉकटेल्स होतीच. सोबतीला हराभरा कबाब, पनीर टिक्का, आलू चाट अशा चमचमीत पदार्थांची रेलचेलही होतीच. एवढे स्टॉल बघून आणि त्यावरील पदार्थ बघूनच मला पोट भरल्यासारखे वाटू लागले. माझे काही ओळखीचे लोकं ही घरचे कार्य म्हणून लग्नाला आले होते.
ते तर हा डामडौल पाहून थक्कच झाले. त्यांच्याबरोबर गावचे दोन नातेवाईक आले होते ते तर गाणेच म्हणू लागले. त्या स्टॉल्सवरील वेगवेगळ्या पदार्थांची थोडी थोडी चव घेऊन झाल्यावर आम्ही आमचा मोर्चा गोड पदार्थांकडे किंवा हल्लीच्या भाषेत डेझर्ट्सकडे वळवला. त्या स्टॉलवर तर अगदी चंगळच होती. गुलाबजामून, गरम गरम जिलबी, कुल्फी फालुदा, चीझकेक, दोन चार प्रकारचे आईस्क्रिम असे वेगवेगळे गोड पदार्थ तिथे होते. त्यांचा आस्वाद घेण्याच्या नादात उरलेले ताटातील पदार्थ फेकण्यात जाऊ लागले. मग आम्ही विडा घ्यायला गेलो तर त्या स्टॉलवरही दोन पाच प्रकारचे विडे, वेगवेगळ्या सुपा-या आणि मुखशुद्धीचे प्रकार होते. सगळा थाटमाट पाहून मी तर अगदी गारच झाले.

 

माझ्या मैत्रीणीचे नातलग एवढे श्रीमंत लोक आहेत ह्याचा मला अभिमानच वाटला.
घरी गेल्यावर मी घरातील मंडळीना येथिल झगमगाटा बदल सांगितले व ह्या विषयावर बोलू लागले तेव्हा माझी छोटी चिमुकली म्हणाली की, एका दिवसासाठी त्यांनी किती पैसे खर्च केले असतील? एवढे पैसे त्यांच्याकडे येतात कुठून? उधळमाधळ करणे म्हणजे काय? ती कशी करतात ? अशी प्रश्न ती विचारत होती. ठीक आहे. माझ्या मैत्रीणचा भाऊ मोठा व्यापारी आहे. त्याच्यापाशी खूप पैसे आहेत. पण त्या संपत्तीचे असे प्रदर्शन बरे नव्हे. आपल्या देशातील कित्येक लोक खूप गरीबीत दिवस काढत आहेत. त्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत नसते. काही काही ठिकाणी तर अजून ही तान्ही तान्ही मुले कुपोषितपणाची शिकार होतायत.
अशा वेळेस जेवणावळींसाठी एवढा पैसा उधळणे आणि अन्नधान्याची नासाडी करणे चांगले नाही. माझा सल्ला त्याने घेतला असता तर मी त्याला चार चांगल्या सामाजिक संस्थांची नावे सांगितली असती. म्हणजे त्याचा पैसा खरा कारणी लागला असता. खरोखरच लग्न आणि इतर समारंभात अनावश्यक पैसा खर्च करून देखावा करणे म्हणजे नैतिक गुन्हा करत आहेत का? याचा विचार करायला हवा.

 

 

रूचिरा बेटकर, नांदेड.
9970774211

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *