मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्ष आणि महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून 1 मे रोजी बोलतो मराठी, गर्जतो मराठी कार्यक्रमाचे आयोजन

 

नांदेड दि. 28 :- मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव समितीच्यावतीने सोमवार दि. 1 मे रोजी महाराष्ट्राची लोकसंस्कृती व लोकधारा यावर आधारित परंपरागत गीत-संगीत, नृत्य, मराठी परंपरा आणि कलागुणांचा अनोखा अविष्कार असलेला बोलतो मराठी, गर्जतो मराठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम सायं 6 वाजता कुसूम सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

 

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव समितीच्यावतीने नांदेड जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. त्याअनुषंगाने येत्या सोमवारी 1 मे रोजी सायंकाळी संवाद बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था नांदेड, आरती क्रिएशन छत्रपती संभाजीनगर आणि सोहमनाद-आळंदी-पुणे यांच्यावतीने जवळपास 45 कलावंतांचा संच असलेला “बोलतो मराठी, गर्जतो मराठी” हा कार्यक्रम सादर होणार आहे. या मराठी लोककला व लोकपरंपरेला उजाळा देत असतानाच त्यातील ठराविक काही गाणी, नृत्य, संगीत, बतावणी आदी या कार्यक्रमात कलावंत सादर करणार आहेत. महाराष्ट्रातील गाजलेल्या कलावंतांसोबत हा कार्यक्रम सादर होणार आहे. गीत-संगीत, नृत्य व परंपरेची ही अनोखी मेजवाणी असेल. यात गण, गवळण, भजन, जोगवा, भारुड, लावणी, शेतकरी गीत, मल्हार गीत आदी लोककला प्रकारांचा समावेश आहे. नांदेडच्या काही स्थानिक कलावंतांना देखील या कार्यक्रमात संधी देण्यात आली आहे.

नांदेडच्या रसिकांनी 1 मे रोजी सायंकाळी 6 वाजता कुसूम सभागृहात होणाऱ्या या दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *