नांदेड :-जिल्ह्यातील येता खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या अधिक हिताचा व्हावा, त्यांना बियाणे, खते व इतर साहित्य वेळेत उपलब्ध व्हावे यादृष्टिने कृषि विभागाने गावपातळीवर नियोजन करून अधिकाधिक दक्षता घेणे गरजेचे आहे. हवामानातील बदल आणि पर्जन्यमानाबाबत शास्त्रज्ञांनी व्यक्त केलेले अंदाज लक्षात घेता कोणत्याही स्थितीत पाण्याची उपलब्धता व पेरणीसाठी अत्यावश्यक असलेला पाऊस झाल्याशिवाय पेरणी केली जाऊ नये, याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कृषि विभागाला दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरीप हंगाम-2023 पूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, आत्माचे प्रकल्प संचालक अनिल गवळी, विविध बियाणे उत्पादक व विक्रेत्या संघटनांचे प्रतिनिधी आणि जिल्ह्यातील कृषि विभागाचे तालुका पातळीवरील सर्व अधिकारी उपस्थित होते.
कृषि विभागाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचल्या पाहिजेत. यात विशेषत: मुख्यमंत्री सिंचन योजनेअंतर्गत शेततळे योजना महत्त्वाची आहे. वैयक्तिक शेततळे योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देण्याच्यादृष्टिने त्यांचे विहित नमून्यातील अर्ज महत्त्वाची आहेत. यासाठी कृषि विभागाने शेतकऱ्यांसाठी आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या. सोयाबीन बियाणांच्या बाबतीत जिल्ह्यातील स्वयंपूर्णता महत्त्वाची आहे. या बियाण्यांची 70 टक्क्यांपेक्षा अधिक उगवण क्षमता असेल तरच त्याची लागवड शेतकऱ्यांच्या हिताची राहिल. यादृष्टीने कृषि विभागामार्फत गावपातळीवर सोयाबीनच्या उगवण क्षमतेची चाचणी व प्रात्यक्षिक कसे करून दाखविता येईल याचे नियोजन झाले पाहिजे, असे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले. घरचे बियाणे असेल तर बीज प्रक्रियाही आवश्यक आहे. बाजारात इतर बियाणांबाबत कृत्रीम टंचाई कोणी निर्माण करत असेल तर संबंधितांविरुद्ध कारवाईसाठी तालुकापातळीवरील कृषि अधिकाऱ्यांनी दक्षता घेतली पाहिजे. याचबरोबर बियाणे व खतांच्या ठरवून दिलेल्या मूल्यापेक्षा अधिक दराने जर कोणी विक्री करत असेल तर त्यांच्याविरुद्धही कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी बैठकीत स्पष्ट केले.
जिल्ह्यात खरीप ज्वारीची गतवर्षी 18 हजार 959 हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली होती. यावर्षी सुमारे 30 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप ज्वारीची पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. मका पिकाची गतवर्षी 537 हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली होती. यावर्षी 500 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. तूर यावर्षी 70 हजार हेक्टर क्षेत्र, मुग 27 हजार हेक्टर क्षेत्र, उडीद 27 हजार हेक्टर क्षेत्र, सोयाबीन 4 लाख 40 हजार हेक्टर क्षेत्र, कापूस 1 लाख 80 हजार हेक्टर क्षेत्र असे एकुण 7 लाख 74 हजार 519 हेक्टर क्षेत्र खरीपासाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. यासमवेत ऊस 32 हजार हेक्टर क्षेत्र, हळद 20 हजार हेक्टर, केळी 6 हजार हेक्टर, इतर भाजीपाला व फळपिके 6 हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले असून 2023 मध्ये हे एकुण क्षेत्र 8 लाख 38 हजार 519 हेक्टर एवढे राहिल. यावर्षी सर्वाधिक प्रस्तावित क्षेत्र हे सोयाबीनचे असून याची टक्केवारी 126.63 एवढी आहे.