महाराष्ट्राची आदरांजली….

भारतरत्न प्रणव मुखर्जी

देशाचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे दिग्गज नेते भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे निधन झाले. प्रणव मुखर्जी हे २०१२ ते २०१७ या काळात देशाचे राष्ट्रपती होते. त्यापूर्वी त्यांनी केंद्र सरकारमध्ये वित्त, संरक्षण, परराष्ट्र यासह विविध महत्त्वपूर्ण पदांवर काम केले होते. तसेच लोकसभा आणि राज्यसभा सदस्य म्हणून त्यांनी दीर्घकाळ प्रतिनिधित्व केले होते. त्याबरोबरच विविध संसदीय समित्यांमध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली होती. प्रणव मुखर्जी यांना त्यांच्या योगदानासाठी भारत सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. ते कुशल राजनीतीज्ञ होते यासोबतच विविध विषयांवरील त्यांचा व्यासंग दांडगा होता. आयुष्यातील कैक दशके सत्तेच्या वर्तुळात घालवूनही त्यांनी तिचा दर्प स्वत:ला लागू दिला नाही. राष्ट्रपतीपदाच्या काळात त्यांनी स्वतःला महामहिम म्हणवून घेणे टाळले. देशातील सर्वोच्च सन्मान भारतरत्न ने  त्यांचा गौरव करण्यात आला. प्रणबदांनी आयुष्यभर धर्मनिरपेक्षता व भारतीयत्वाची मूल्ये जपली. एका जबाबदार पालकाच्या रुपात त्यांनी आपला पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते व नेत्यांना सदैव मार्गदर्शन केले. संकटमोचक म्हणून ते कायम त्यांच्या मागे उभे राहिले.

प्रणव मुखर्जींचा जन्म बंगालमधील वीरभूम जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक कामदा किंकर मुखर्जी आणि राजलक्ष्मी मुखर्जी यांच्या घरी झाला होता. त्यांना बालपणापासूनच राजकारणाचे धडे मिळाले होते. १९६९ मध्ये ते प्रथम राज्यसभेवर नियुक्त झाले होते. १९६९ ते २००२ अशी तब्बल ३४ वर्षे त्यांनी राज्यसभा खासदार म्हणून प्रतिनिधित्त्व केले होते. तसेच २००४ ते २०१२ या काळात ते लोकसभा सदस्य होते. या काळात त्यांनी काँग्रेसचे लोकसभेतील नेते म्हणून काम पाहिले. आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत प्रणव मुखर्जींनी केंद्रीय वित्तमंत्री, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री म्हणून काम पाहिले. तसेच १९९१ ते १९९६ या काळात त्यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यादरम्यान, त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते.  दरम्यान, आज अखेर त्यांचा मृत्यूसोबत सुरू असलेला संघर्ष संपला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.  


      महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.‌ त्यांना जवळून ओळखणारे, अनुभवलेले तसेच त्यांच्या संपर्कातील लोकांनी आपल्या भावना शब्दबद्ध केल्या आहेत. देशाचे माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे निधन झाल्याची बातमी ऐकून अत्यंत दुःख वाटत आहे. खासदार म्हणून माझी नियुक्ती राष्ट्रपती कोट्यातून झाली,त्यावेळी प्रणव मुखर्जी राष्ट्रपती होते. त्यामुळे अनेक वेळा त्यांच्यासोबत भेटून चर्चा करण्याची संधी मिळाली. छत्रपती घरण्याविषयी त्यांच्या मनात अपूर्व आस्था होती, हे मला प्रत्येक वेळी जाणवायचं. त्यांनी माझ्या सामाजिक कार्याविषयी, विशेतः किल्ल्यांविषयी सुरू असलेल्या कामांचे नेहमीच कौतुक केले. अनेक बाबतीत मला त्यांचे अमूल्य मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या इतक्या विद्वान व्यक्तीशी माझी ओळख झाली होती हे मी माझे सद्भाग्य समजतो. त्यांच्या जाण्याने आपल्या देशाची न भरून येणारी हानी झाली आहे. आज आपल्या राष्ट्राने एक रत्न गमावला, अशा भावना युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केल्या आहेत. 

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना श्रध्दांजली.एकीकडे माझ्या आईचे निधन झाले असताना १९ जुलै २०१२ रोजी राष्ट्रपती निवडणुकीसाठी मी आमदार म्हणून मुंबईत आणि विजयभय्या यांनी खासदार म्हणून  दिल्लीत प्रणवदांना  मतदान करून आम्ही यवतमाळला अंत्यविधीसाठी पोहोचलो होतो. अत्यंत बुध्दीमान, काँग्रेसचे संकटमोचक राहिलेले प्रणवदा यांनी इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी या तिघांचे विश्वासू म्हणून काम केले असे लोकमतचे चीफ एडिटर राजेंद्र दर्डा म्हणाले आहेत. तर वर्षा गायकवाड शिक्षणमंत्री भारताचे माजी राष्ट्रपती ‘भारतरत्न’ प्रणव मुखर्जी यांच्या निधनाची दुःखद बातमी कळली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! देशाच्या राजकारणातील त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी निस्वार्थीपणे देशसेवा केली. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो! त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.          

भारतरत्न प्रणव मुखर्जी हे एक प्रिय सहकारी आणि प्रिय मित्र होते. दिलेल्या जबाबदारीवरून ते कधीच मागे हटले नाही. देशाच्या भल्यासाठी त्यांनी दृढतेने काम केलं, अशा शब्दात माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शोक व्यक्त केला. उच्चविद्याविभूषित अर्थमंत्री ते संरक्षणमंत्रीपद सांभाळणाऱ्या प्रणव मुखर्जींच्या चेहऱ्यावर ताणाचा किंवा अहंपणाचा लवलेश नसायचा आणि शालीन राष्ट्रपतींची परंपरा देखील त्यांनी तितकीच सहज पेलली. संसदीय लोकशाही मूल्यांवर प्रेम असणाऱ्या भारतरत्नाला राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली‌ वाहिली.  डॉ. प्रणव मुखर्जी यांच्या निधनानं भारतीय राजकारणातील सर्वमान्य, सर्वसमावेशक नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ, अनुभवी, विद्वान्, सुसंस्कृत, मार्गदर्शक नेतृत्वाचं निधन ही देशाची, भारतीय राजकारणाची मोठी हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त करुन डॉ. प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहिली.

प्रणव मुखर्जी हे भारताचे १३ वे राष्ट्रपती होते. राष्ट्रीय राजकारणात ते १९६९ पासून सक्रिय होते. भारतीय राजकारणातील अमूल्य सेवेसाठी त्यांना २००८ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तर ८ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात प्रणव मुखर्जी हे राजकारणात सक्रिय झाले होते. १९७३ मध्ये ते केंद्रीय मंत्रिमंडळात होते. १९८२ ते ८४ या काळात त्यांनी देशाचं अर्थमंत्रीपद भुषवलं. १९८० ते १९८५ या कालावाधीत राज्यसभेत ते लीडर ऑफ हाऊसही होते.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने देश एका महान मुत्सद्दी नेत्यास मुकला आहे. गेली किमान ६० वर्षे प्रणव मुखर्जी राजकारणात सक्रिय होते. त्यांचे राजकारण काँग्रेस धार्जिणे असले तरी सदैव राष्ट्रहिताचा विचार करून त्यांनी पावले टाकली. केंद्रीय मंत्रिमंडळातील संरक्षण, अर्थ यासह अनेक महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली पण अर्थमंत्री म्हणून त्यांची छाप सर्वाधिक राहिली. त्यांचे वाचन अफाट होते. त्यांची निरीक्षणशक्ती अचाट होती आणि ते कमालीचे हजरजबाबी होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना खुला पाठिंबा दिला. प्रणवबाबूंसारख्या विद्वान, अनुभवी व्यक्तीची राष्ट्रपती भवनात गरज आहे, असे शिवसेनाप्रमुखांचे मत होते आणि त्याबाबत प्रणवबाबू नेहमीच कृतज्ञता व्यक्त करत. प्रणवबाबू आपल्यातून निघून गेले. त्यांचा प्रभाव देशाच्या राजकारणावर प्रदीर्घ काळ राहील. महाराष्ट्राच्या जनतेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. 

माजी राष्ट्रपती श्री प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने भारतमातेचा सेवक हरपला आहे. अनेक जबाबदाऱ्यांच्या माध्यमातून त्यांनी देशाच्या विकासासाठी दिलेले योगदान अतुलनीय असेच आहे. 
प्रणवदा यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. त्यांना भारतरत्न जाहीर झाले तेव्हा अभिनंदनाचा प्रस्ताव महाराष्ट्र विधानसभेत मांडण्याची संधी मला मिळाली होती.‌ केंद्रात अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, वाणिज्य आणि परराष्ट्र व्यवहार अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. सुमारे ५० वर्षें विविध जबाबदाऱ्यांच्या माध्यमातून त्यांनी देशाची सेवा केली. गांधी विचारधारेचे खंदे समर्थक आणि अनुयायी होते.‌‌ अनेक लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी आणि आर्थिक सुधारणांच्या ते अग्रस्थानी होते. भारतीय राजकारणातून अशा महनीय व्यक्तिमत्वाचे निघून जाणे, हे मनाला व्यथित करणारे आहे. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकीयांच्या तसेच देशवासीयांच्या दु:खात आपण सहभागी आहोत असे माजी मुख्यमंत्री विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

दिवगंत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना राज्यातील विविध नेत्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने महान अजातशत्रू  नेतृत्व हरपले आहे. त्यांच्या निधनाने राष्ट्राची हानी झाली आहे. प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कधीही भरून निघणार नाही, अशी मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिवंगत भारतरत्न प्रणव मुखर्जी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

मुखर्जी हे प्रचंड अनुभवी अभ्यासू नेतृत्व होते. भारतीय राजकारणातील ते द्रष्टे महानायक ठरले होते. राष्ट्राच्या विकासासाठी त्यांची दृष्टी पक्षभेद भेदणारी निष्पक्ष होती. त्यांनी राष्ट्रपती पदाची गरिमा सांभाळताना राष्ट्रपती भवन जनसामान्यांना अधिक मोकळे करून दिले. राष्ट्रपती पदाची त्यांची कारकीर्द संस्मरणीय राहील. त्यांनी राष्ट्रपती पदापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळात विविध खांत्यांची जबाबदारी पार पाडताना आपल्या गुणवत्तेची छाप सोडली आहे. अत्यंत विद्वान बुद्धिमान विनयशील आणि अनुभवी तेव्हढेच चाणाक्ष आणि सम्यक मार्ग अनुसारणारे संकमोचक राजनेता म्हणून प्रणव मुखर्जी सदैव संस्मरणीय राहतील. त्यांना देशभरातील रिपाइं तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली, अशी शोकभावना रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.

लोकशाही व धर्मनिरपेक्ष मूल्यांसाठी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी फार मोठे योगदान दिले असून, त्यांचे जाणे मनाला चटके लावून जाते, अशी शोक संवेदना राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे. माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी हे भारतीय राजकारणातील एक उत्तुंग व्यक्तीमत्व होते. आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत त्यांनी विविध पदांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत त्या पदाचा मान आणि सन्मान वाढविला. प्रणवदांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एक पर्व संपले, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

        प्रणव मुखर्जी १९६९ मध्ये इंदिरा गांधींच्या मदतीने काँग्रेचे राज्यसभेचे खासदार झाले. लवकरच ते इंदिरा गांधींचे निकटवर्तीय झाले. यानंतर १९७३ मधील काँग्रेस सरकारमध्ये ते मंत्री होते. प्रणव मुखर्जी यांनी काँग्रेस सोडून नवीन पक्षा स्थापन केला. राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस पक्ष बनवला. पण नंतर १९८९ हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला. प्रणव मुखर्जी यांचे वडील किंकर मुखर्जी हे स्वातंत्र्य सैनिक होते. प्रणव मुखर्जी यांनी सूरी विद्यासागर कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. त्यांनी पॉलिटिकल सायन्स आणि इतिहास विषयात एमए केले होते. याशिवाय त्यांनी एलएलबीही केली होती. प्रणव मुखर्जींचे पुत्र अभिजीत हे काँग्रेसचे खासदार आहेत. तर मुली शर्मिष्ठा मुखर्जी या नृत्यांगना आहेत. तसंच त्या दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्याही आहेत.‌ 

             कलाक्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेता रितेश देशमुख आणि गानकोकिळा लता मंगेशकर यांनी आपले शोकसंदेश सोशल मीडियावर शेअर केले आहेत. प्रणव दा मुखर्जी यांचे निधन झाल्याचे ऐकून मनाला अत्यंत दु:ख झाले. ते आपले राष्ट्राध्यक्ष, एक भारतरत्न आणि  सद्गृहस्त म्हणूनही परिचित होते. आमचे एक अतिशय प्रेमळ आणि सौहार्दाचे नाते होते. मी त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे असे लता मंगेशकर म्हणाल्या आहेत.‌ प्रचंड दु:ख होतय, आज भारताचं खूप मोठं नुकसान झालं आहे. माजी राष्ट्रपती मा. श्री प्रणव मुखर्जी यांना आपण गमावलं आहे. देशाच्या विकासासाठी त्यांनी दिलेलं योगदान कायम स्मरणात राहिल.” अशा आशयाचं ट्विट करुन रितेश भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. रितेशसोबतच तापसी पन्नू, कमाल आर. खान, शिल्पा शेट्टी, वरुण धवन, फरहान अख्तर अशा अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे दु:ख व्यक्त केलं आहे.

देशाचे माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील पितामह आणि व्रतस्थ   व्यक्तिमत्व हरपले आहे. इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, कायदा या क्षेत्रात उच्चविद्याविभूषित प्रणव मुखर्जी यांनी पाच दशकांहून अधिक काळ राजकीय, सामाजिक तथा साहित्य क्षेत्रात संवेदनशीलपणे काम करत आपल्या कामाचा अमिट ठसा उमटविला. ते प्रचंड अभ्यासू असल्याने  त्यांनी देशाच्या परराष्ट्र, वाणिज्य, आणि अर्थमंत्री या विविध महत्त्वाच्या पदांची जबाबदारी अतिशय कुशल पद्धतीने सांभाळली. आपल्या संवेदनशील कार्यातून ते सिद्ध केले. देशाच्या राष्ट्रपती पदावर काम करण्याचा बहुमान त्यांना मिळाला. त्यांच्या निधनाने एक विद्वत्त राजनेता काळाच्याआड गेला आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असे राज्याचे पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
दिल्लीच्या राजकीय वर्तुळात वावरत असले तरी प्रणव मुखर्जींनी पश्चिम बंगालमधील  आपल्या गावाशी असलेले नाते कायम ठेवले होते. ते नियमितपणे आपल्या गावाला भेट देत असत. त्यांचे जीवन विविध क्षेत्रातील त्यांच्या चाहत्यांना, पक्षीय कार्यकर्त्यांना प्रेरणा देत राहील.

Gangadhar DHAVALE
Gangadhar DHAVALE


  गंगाधर ढवळे,नांदेड 


संपादकीय     ०१.०९.२०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *