लोहा ; प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडी आणि प्रहार जनशक्ती पक्ष लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक एकत्रित आणि मोठ्या ताकदीने लढविणार असून या निवडणुकीत प्रस्थापित पक्षांना हद्दपार करू असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष माऊली गीते यांनी लोहा येथे आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत केले आहे.
मागील अनेक दशकापासून लोहा कृषी बाजार समितीची सत्ता ही प्रस्थापित पक्षांच्या हातात राहिली आहे. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने दिले नाही. संचालक मंडळात कधीही शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न घेतले गेले नाहीत. किंबहुना अनेक प्रस्थपित उमेदवार एकदाही बाजार समितीत गेले नाही. असे सांगतानाच आगामी निवडणुकीत वंचित आणि प्रहार हे सामान्य उमेदवारांना प्रतिनिधित्व देऊन शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न हाताळेल असे यावेळी दोन्ही पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.
लोहा कृषी उत्पन्न बाजाराच्या आवारात शेतीमाल खरेदी विक्री व्यवसायासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविणे, शेतकऱ्यांच्या शेतीमाला विषयी हिताचे संरक्षण करणे, शेतीमालाची उघड लिलाव पद्धतीने विक्री करणे, बाजाराच्या आवारात विक्रीस आलेल्या शेतीमालाची अचूक वजनमाप करणे, शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीचे 24 तासात पैसे मिळवून देणे, शासनाने निश्चित केलेल्या शेतीमालाच्या आधारभूत किमतीपेक्षा कमी भावात शेतीमालाची खरेदी विक्री होणार नाही. याची दक्षता घेणे, शेतीमालाची प्रत व दर्जा वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना उत्तेजित करणे, आडत, व्यापारी, हमाल , मदतनीस, तोलणार,प्रक्रियाकर यांना परवाने देणे, परवान्यांची नूतनीकरण करणे, अशा काही ठळक मुद्द्यावर प्रहार जनशक्ती पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी काम करणार असून लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्ता आल्यास या सर्व सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून देणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीत कधीही गरीब शेतकऱ्याला संधी मिळाली नसून अनेक धनदांडगे मापाडी उमेदवारांच्या जागेवर निवडणूक लढवून मापाड्यावर अन्याय करत आले आहेत. पैशाच्या जोरावर निवडणुका लढवून नंतर कधीच शेतकऱ्यांच्या सुखदुःखात सामील न होणारे आणि निवडणुकीत शेतकऱ्यांच्या कामगारांच्या, मापड्यांच्या हिताची भाषणे देत फिरनारे यांना वंचित बहुजन आघाडी आणि प्रहार जनशक्ती पक्ष नक्कीच धडा शिकवेल. असेही दोन्ही पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले. लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही केवळ निवडणूक म्हणून लढत नसून या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कामगारांच्या मापाडयांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी व निवडणुकीत जिंकण्यासाठी ही लढाई लढत असल्याचेही यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष शिवा नरंगले आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे माऊली गीते यांनी सांगितले आहे. या तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची अनेक ग्रामपंचायतीवर पकड आहे. अनेक ग्रामपंचायती वंचित बहुजन आघाडीच्या ताब्यात आहेत. त्याचबरोबर सेवा सोसायटीही वंचित बहुजन आघाडीने काबीज केल्या असून त्याला प्रहार संघटनेच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायत आणि सेवा सोसायटीची साथ मिळाल्यास लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीवर नक्कीच वंचित आणि प्रहारचा झेंडा फडकेलं असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे महासचिव श्याम कांबळे , उपाध्यक्ष सुरेश गजभारे , युवा जिल्हाध्यक्ष धीरज भैय्या हाके, तालुकाध्यक्ष सतीश आणेराव, कंधार तालुका अध्यक्ष संतोष पाटील गवारे, वैभव पाटील हातने कौडगावकर, सिद्धार्थ ससाणे, सदानंद धूतमुल,छगन हटकर, सचिन आढाव, सौरभ पवार, त्याचबरोबर प्रहार जनशक्ती पक्षाचे चांद पाशा शेख, राहुल हांकरे,सचिन बल्लोरे ,भीमराव पवार, संजय भरकडे,गोकुळ केंद्रे, चांदू पूर्णपल्ली आदींची उपस्थिती होती.