मॉर्निंग वॉक करणाऱ्या ॲड दिलीप ठाकूर व अमरनाथ यात्रेकरुंच्या सतर्कतेमुळे  आत्महत्या करणाऱ्या महिलेचे प्राण वाचले ;नवरा बायकोच्या वादात संतापलेल्या पत्नीने श्रीराम सेतू पुलावरून गोदावरीत उडी मारण्याचा केला प्रयत्न

नांदेड ; प्रतिनिधी

नवरा बायकोच्या वादात संतापलेल्या  पत्नीने श्रीराम  सेतू पुलावरून गोदावरीत  उडी मारतांना धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर व  त्यांच्यासोबत  मॉर्निंग वॉक करणाऱ्या  अमरनाथ यात्री संघाच्या  सदस्यांनी खाली खेचल्यामुळे आत्महत्या करण्यास निघालेल्या महिलेचे प्राण वाचले.

एकविसावी अमरनाथ यात्रा ३० जूनला व बाविसावी अमरनाथ यात्रा १४ जुलैला दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली  नांदेडहून रवाना होणार आहे. अवघड असलेली अमरनाथ यात्रा सुलभ व्हावी या दृष्टीने दोन महिन्यापासून पायी चालण्याचा व प्राणायामचा सराव  दिलीप ठाकूर हे दरवर्षी घेतात.रविवारी नेहमीप्रमाणे सकाळी सहा ते सात  दरम्यान गोवर्धन घाटच्या पुलावरून  सर्व सदस्य पायी चालत होते.  तेवढ्यात एक जोडपे पुलावर भांडत असल्याचे दिसले. काही कळण्याच्या आतच महिला उडी मारण्यासाठी पुलाच्या कठड्यावर चढली. नवरा तिला पकडत असताना त्याचा ही तोल जाऊ लागला. त्यावेळेस विलास डक, शिवाजीराव येरकले,अरविंद चौधरी व इतर अमरनाथ यात्रेकरूंनी त्यांना वर खेचले. सगळ्यांनी समजावून सांगितल्यानंतर  ते दोघे नवरा बायको आपापल्या दुचाकीने  निघाले. पाच मिनिटानंतर  परत ती महिला  पुलाच्या दुसऱ्या बाजूला आली. तिने स्कुटी थांबवून परत एकदा उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दिलीप ठाकूर यांनी  तिला जोरात मागे खेचले. ती परत स्कुटी चालू करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना दिलीप ठाकूर यांनी किल्ली काढून घेतली.लगेच दिलीप ठाकूर यांनी ११२ क्रमांकावर कॉल करून पोलिसांना माहिती दिली.गीता परिवाराच्या अध्यक्षा नीता दागडिया, माजी नगरसेविका जयश्री ठाकूर यांनी महिलेला समजावून पुलाच्या खाली  आणले. डॉ. सविता बिरगे,संगीता पाठक, अंजली चौधरी, रूपाली कवानकर, सपना शेटकार या महिलांनी  तिच्याशी चर्चा करून आत्महत्या केल्याने होणाऱ्या परिणामाची जाणीव करून दिली.

दिलीप ठाकूर यांनी  महिलेच्या पतीला, भावाला  मोबाईल करून बोलावून घेतले. सुभाष देवकते, संजय पाठक, बालाजी कवानकर, सिद्धगोडा बिरगे, संतोष शेटकार, गजानन मामीडवार, राजू निरणे, संतोष चेनगे, माधव मस्‍कले, शिवप्रभू कामजळगे, संजय जाधव, शंकर वंगलवाड यांनी पतीला समजावून सांगितले.काही वेळातच  पोलिसांची गाडी आली. त्यांनी सर्व चौकशी करून दोघा नवरा बायकोंना वजीराबाद पोलीस स्टेशनला घेऊन गेले. त्या ठिकाणी दोघांना समज देऊन सोडून देण्यात आले.समाजात आपल्याला काय करायचे ही प्रवृत्ती वाढत असताना  दिलीप ठाकूर व  अमरनाथ यात्रेकरुंच्या सतर्कतेमुळे एका महिलेचा प्राण वाचल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *