प्रिय अनुराग,
तुला माझा अनेक उत्तम आशीर्वाद !खरं पाहिलं तर माझ्या काळात मला वाढदिवस हा आठवतच नव्हता .पण काळ बदलला वेळ बदलली आणि माझे जीवनही बदलले. मी कधी न करणारा वाढदिवस मीही साजरा करायला सुरुवात केली. हे सगळं काही अनपेक्षितच. पण माझा वाढदिवस ज्यावेळेस साजरा होत होता. तेवढा आनंद मला मिळत नव्हता. पण काय देवाची लीला , तुझा जो वाढदिवस मी साजरा करतो .तोही अगदी साधेपणाने पण मनाला मात्र खूप आनंद होतो.
वडील आणि मुलाचे जे नाते असते ना ते शब्दात कधीच व्यक्त करू शकत नाही.
आज तुझा वाढदिवस, मला जेवढं जमेल तेवढे मी तुला देण्याचा प्रयत्न करत आलो आणि आजही देत आहे. पण मी दिलेले सगळे सुख आणि देवाने दिलेले तुझ्या पदरात जो काही संघर्ष आणि भविष्यात येणारे सुख हे आता तुला तुझ्या खांद्यावर घ्यावे लागणार आहे. कारण 50 च्या नंतर वडिलांचे मनोबल आणि धैर्य हे फक्त मुलाकडे पाहूनच वाढत असते.
त्यामुळे तू स्वतः असा कर्तृत्ववान हो की मला स्वाभिमान वाटला पाहिजे. या जीवनामध्ये आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही .हे मात्र अटळ सत्य आहे.
अरे ,वाढदिवसाच्या मी तुला लागेल ते गिफ्ट देऊ शकतो. ही देवानं दिलेली माझ्यात ताकद आहे. पण ,तू तुझ्या कष्टाने तुझ्या मेहनतीने तुझ्या यशाने जी काही कर्तव्य करणार आहेस. तोच तुझा सर्वात चांगला वाढदिवस असेल. असे मला वैयक्तिक वाटते.
खरं पाहिलं तर तू सध्या सज्ञान झालास. मी तुला सांगायची जास्त गरज मला भासत नाही. तू शांत आणि संस्कारक्षम आहेस व निर्व्यसनी आहेस कष्टाळू आहेस आणि व्यवहारिक सुद्धा हे सगळं काही तुझ्या आईने तुला बाळकडू दिले आहे.
बेटा! वडील तुला सर्व देऊ शकतात .पण तुझ्या पायाने तुला तुलाच चालावे लागणार आहे. मी या शुभ दिनी जास्त काय देऊ जे काही द्यायचे होते .ते मी या पत्रात देत आहे. तू कसाही हो! पण कर्तबगार व चार माणसात माझी मान उंचावणारा एक चांगला नागरिक हो! हीच माझी माता जगदंबे चरणी प्रार्थना!
यश ,सरस्वती, लक्ष्मी तुझ्या आयुष्यात वास करो . व तुला निरोगी व दीर्घायुष्य लाभो !यशस्वी भव!
तुझेच बाबा
ओंकार लव्हेकर,
फरांदे नगर ,नांदेड.