नांदेड- राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण गुरूवारी २२ जून रोजी हिंगोली दौऱ्यावर जाणार असून या दरम्यान ते लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेणार आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगोली व कळमनुरी येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. २ व ३ जून रोजी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मुंबई येथे जिल्हानिहाय आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्याची लोकसभा निवडणुकीची जबाबदारी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आली. या पार्श्वभूमीवर ते हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
गुरुवारी सकाळी १०.३० वा.त्यांचे हिंगोली येथील विश्रामगृहावर आगमन होईल. त्यानंतर ११.३० वाजता येथील शिवलीला हॉटेलमध्ये काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीसंदर्भात स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांची भूमिका समजून घेतल्यानंतर ते उपस्थितांना संबोधित करणार आहेत.
हिंगोली येथून दुपारी २ वाजता त्यांचे कळनुरीकडे प्रस्थान होईल. दुपारी ३ वाजता आ.डॉ.प्रज्ञाताई सातव यांच्या संपर्क कार्यालयात ते कळमनुरी तालुक्यातील कार्यकर्त्यांची ते संवाद साधणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ४ च्या सुमारास त्यांचे नांदेडकडे प्रस्थान होईल. जिल्ह्यातील काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या महत्वपूर्ण बैठकांना उपस्थित राहावे, असे आवाहन हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिलीपराव देसाई यांनी केले आहे.