नवी दिल्ली:
महाराष्ट्राच्या राजकारणात शिरकाव करू पाहणाऱ्या भारत राष्ट्र समितीला तेलंगणातच मोठे खिंडार पडले असून, माजी मंत्री जे. कृष्ण राव, माजी खासदार पी. श्रीनिवास रेड्डी, आ. दामोदर रेड्डी यांच्यासह अनेक मातब्बर नेत्यांनी आज काँग्रेस प्रवेश केला.
काँग्रेस अध्यक्ष खा. मल्लिकार्जून खरगे व राहुल गांधी यांच्या उपस्थितीत आज दुपारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयात झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेले गुरूनाथ रेड्डी, पाच माजी आमदार तसेच तेलंगणाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनेक प्रमुख नेत्यांनी बीआरएसला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खा. के. सी. वेणुगोपाल, तेलंगणाचे काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष खा. रेवंत रेड्डी, माजी आमदार डॉ. संपत कुमार यांच्यासह अनेक काँग्रेस नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे भारत राष्ट्र समितीचे प्रमुख व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव मराठवाड्यात पक्षविस्तारासाठी आले असतानाच दुसरीकडे नवी दिल्लीत त्यांच्या पक्षाला गळती लागली.
तेलंगणात अपयशी बीआरएस महाराष्ट्राला काय देणार?- संपत कुमार
मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील तेलंगणातील भारत राष्ट्र समितीच्या राज्य सरकारने जनतेचा विश्वास गमावला असून, लोकांना सामोरे जाण्याचे धारिष्ट्य त्यांच्याकडे राहिलेले नाही. म्हणूनच त्यांनी मराठवाड्यात पक्षविस्ताराची धडपड सुरू केली आहे. पण गृहराज्य तेलंगणात सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलेली बीआरएस महाराष्ट्राला तरी काय देणार? के. चंद्रशेखर राव यांच्या पक्षाला तेलंगणात लागलेल्या गळतीची भरपाई ते महाराष्ट्रासह इतर राज्यातून करू इच्छितात. मात्र, त्यांच्या हाती काहीही लागणार नाही, अशी प्रतिक्रिया तेलंगणाचे माजी आमदार व महाराष्ट्राचे काँग्रेस सहप्रभारी डॉ. एस. ए. संपतकुमार यांनी दिली आहे.