पाऊस किती लहरी ! जूनची पावसाची तारीख सरली, तरी पावसाचा पत्ता नव्हता. एवढेच काय! पावसाची दूरवर देखील कुठे चिन्हेही दिसत नव्हती. उकाड्याने माणसे बेजार झाली होती. पावसाचे नक्षत्र कुठे दडी मारून बसले होते? काय माहीत जमिनीला भेगा पडल्या होत्या. उन्हाच्या गरम झळा आपले अस्तित्व जाणवून देत होत्या. उकाड्याने लोक अतिशय हैराण झाले होते पावसाचे आगमन जसजसे लांबत होते, तसतसे लोकांच्या तोंडचे पाणी पळत होते. जमीन नांगरून शेतकरी खिन्नतेने आकाशाकडे डोळे लावून बसला होता.
जूनच्या महिण्याची तारीख आता मध्यावर आली होती ! संध्याकाळची वेळ! आळसटलेली मी, काही वाचत लोळत पडली होते. सहज खिडकीतून नजर बाहेर गेली…आकाश काळ्याकुट्ट ढगांनी गच्च भरले होते.
वातावरणात वारा भरलेला होता. संध्याराणी दुर्मुखलेली होती. रोज प्रमाणेच रस्त्यावर माणसांनी दुथडी भरून वाहत होते. ढगांचा गडगडाट झाला. पाठोपाठ वीज चमकली. टपोरे, थेंबांचे मोती खाली झेपावले. लोकांची पळापळ करत धांदल उडाली. ‘आता मोटा पाऊस येणार’ (पहिला पाऊस) ही खात्री पटून रस्ते उधळले गेले. छत्री, रेनकोट नसलेल्या लोकांची निःशस्त्र सेनेप्रमाणे पळापळ झाली.
फेरीवाले, पथारीवाले आपापले दुकान गुंडाळू लागले. बाहेर लावलेला माल दुकानात सुरक्षित ठिकाणी हलवताना दुकानदारांच्या नाकी नऊ येऊ लागले. वाहनांचे वेग बाचव करण्यासाठी वाढले. नाक्यावरच्या सुस्तावलेल्या रिक्षा अधीर प्रवासी पोटी धरून धावू लागल्या…..
पुन्हा एकदा वीज लकाकली, ढग गरजले आणि मुसळधार पाऊस कोसळू लागला. पाहता पाहता रस्ते मोकळे झाले. मेघांच्या गर्जनेला प्रत्युत्तर देणारा कोणी धैर्यधर उरला नाही…. मी पळत पळत वर गच्चीवर गेले – पहिला पाऊस डोळे भरून पाहण्यासाठी, अंगावर घेण्यासाठी !
डोक्यावरचं आकाश अंधारून आलं होतं. मातीचा अत्तर वातावरणात उधळलं गेलं होतं. पक्ष्यांनी झाडांचा आश्रय घेतला होता. अंगे भिजून चिंबावस्था झाली होती. काया रोमांचित होत होती. संध्याराणीच्या दरबारात मेघमल्हार मस्त रंगला होता. साठल्या पाण्याच्या मंचावर थेंबांचा नाच चालला होता. घरांचे पत्रे ताल देत होते. वेलींवरची फुले त्या तालावर डोलत होती. झाडे मधूनच पानांचे पंख फडफडवून दाद देत होती….
आता प्रत्येकाचे मन प्रसन्नतेचा पिसारा फुलवून मोराप्रमाणे थुईथुई नाचत होते.
पावसाचा जोर वाढला तशी मी पण आडोशाला गेले. मेघराजाचा पाऊसाशी चाललेल्या नाजूक शृंगारातील कोवळेपण संपून धसमुसळेपणा सुरू झाला होता.
थेंबांच्या तडतडाटात बेभान नाच चांगलाच रंगला होता, मेघांनी आपले पखवाज वाजवत ठेवले होते,
भाजलेल्या धरतीला भिजताना काय सुख वाटत असेल ! वाट पाहणाऱ्या बळीराजाला किती हलकं वाटलं असेल. पहिला थेंब चोचीत पडताना चातकाला किती समाधान वाटलं असेल, पहिला थेंब मिठीत घेताना सागराच्या शिंपल्याला किती आनंद झाला असेल, पहिला पाऊस अंगावर घेताना ! काही अवधी नंतर बाहेरचा पाऊस थांबला तरी मनातला पाऊस कोसळरणारच होता, किती वेळ कोण जाणे ! आणि जाताना चिखलमय आठवणी देऊन जाणार होता.
रूचिरा बेटकर,नांदेड
9970774211