नांदेड ; प्रतिनिधी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे २१ सप्टेंबर २०११ रोजी दहन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर दगडफेक करून मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या प्रकाश मारावार, धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्यासह १० तत्कालीन शिवसैनिकांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष सुटका झाली.
आयटीआय चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचा कार्यक्रम घेण्यात येत होता. ही बातमी समजताच तत्कालीन शिवसैनिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पुतळा जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर शिवसैनिकांनी दगदफेक करून मारहाण करत पिटाळून लावले . याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्थानक नांदेड येथे कलम १४३,१४७,१४९,३३६, ३२३ व ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये प्रकाश मारावार, धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर, गजानन सावंत,संदीप छापरवाल, श्रीकांत पाठक, कैलास ठाकूर, मारोती धुमाळ, सुरेश पावडे, गजानन देशमुख यांच्यासह इतरांचा समावेश होता.तब्बल बारा वर्षे चाललेल्या या खटल्यात आरोपीच्या वतीने ज्येष्ठ विविज्ञ ॲड. शिवराज पाटील यांनी सक्षमपणे बाजू मांडली. या प्रकरणात ॲड.भगवान कदम,ॲड. सुनील कंधारे,ॲड. सुशील लाठकर यांनी त्यांना सहकार्य केले. सोमवार दि.२६ जून रोजी नांदेड न्यायालयातील ८ वे न्यायाधीश मा.ए. बी. जाधव यांनी सबळ पुराव्या अभावी सर्वांची निर्दोष सुटका केली. त्याबद्दल ॲड. शिवराज पाटील यांचे अनेकांनी अभिनंदन केले.