काँग्रेस म्हणू, काँग्रेसच आणू – माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केला निर्धार …. दोन दिवसाच्या आढावा बैठकीची सांगता

 

नांदेड : नांदेड जिल्हा हा पूर्वीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. या भागातील जनतेनी काँग्रेस पक्षावर भरभरून प्रेम केले आहे. राजकारणात कोणी कुठेही जावो, आपण मात्र काँग्रेस म्हणू आणि काँग्रेसच आणू या भूमिकेतून कामाला लागू, असा निर्धार व्यक्त करत जिल्ह्यामध्ये संघटनात्मक बांधणीकडे पूर्ण लक्ष असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आज येथे सांगितले.
नांदेड लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकीचे येथील भक्ती लॉन्समध्ये आयोजन करण्यात आले होते. समारोपाच्या कार्यक्रमास ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री नसीमखान, माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आ. अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री डी.पी. सावंत, आ. मोहनअण्णा हंबर्डे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण, माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, आ. जितेश अंतापूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख लहानकर, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभिजित सपकाळ, माजी महापौर अब्दुल सत्तार, सौ. जयश्रीताई पावडे, सौ. शैलजा स्वामी, माजी सभापती किशोर स्वामी, मसूदखान, जि.प.चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, माजी सभापती संजय बेळगे, प्रवक्ते संतोष पांडागळे, प्रा. मनोहर पवार, शिवाजीराव धर्माधिकारी, डॉ. मिनलताई खतगावकर, डॉ. श्रावण रॅपनवाड, डॉ. रेखा चव्हाण, अनिता हिंगोले, पप्पू पाटील कोंढेकर, विठ्ठल पावडे, निलेश पावडे, शशिकांत क्षीरसागर, दिपक पाटील, शरद पवार, बाळू गोमारे आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मागील दोन दिवसांपासून वेगवेगळ्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांनी काँग्रेस पक्षबांधणीकडे लक्ष देण्याचे सूचित केले आहे. यासोबतच प्रत्येक विधानसभा मतदारसंघावर नव्याने प्रभारीची नेमणूक करून त्यांच्यामार्फत सातत्यपूर्ण आढावा घेणार असल्याचे सांगितले.
बीआरएस यांचा रंग जरी गुलाबी असला तरी नियत मात्र काळी आहे. भारतीय जनता पक्षावर टीका करताना ते कधी दिसत नाहीत. उलट धर्मनिरपेक्ष विचाराच्या मताची विभागणी करून भारतीय जनता पक्षाला कसा फायदा होईल, याकडेच त्यांचे लक्ष असते.
राज्यामध्ये जे काही घडत आहे, ते फार चांगले नाही. राष्ट्रवादीत पडलेली फुट यामुळे काँग्रेस पक्षावर कुठलाच परिणाम होणार नाही, उलट काम करण्याची अधिक संधी मिळेल. कार्यकर्त्यांना वाव देता येईल. या संपूर्ण घटनाक्रम सुरू असताना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी माझे बोलणे झाले. काँग्रेस आणि शिवसेना दोघे मिळून महाविकास आघाडीमध्ये ताकदीने काम करू, याचा निर्धार व्यक्त करण्यात आला, असेही ते म्हणाले.
यावेळी माजी मंत्री नसिमखान यांनी भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाची दिशा सांगताना देशातील सामान्य जनतेची दशा करण्याचे काम हे सरकार करत असल्याचे सांगितले.
यावेळी भास्करराव पाटील खतगावकर, अमरनाथ राजूरकर यांची समयोचित भाषणे झाली. सूत्रसंचलन संतोष पांडागळे तर उपस्थितांचे आभार गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *