गुरू म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य: गुरुपौर्णिमा विशेष 3 जुलै -2023

 प्रत्येक समस्येमध्ये मार्ग दाखवून योग्य मार्गदर्शन करणारे व जीवन जगण्याची योग्य कला शिकविणारे महानायक म्हणजेच गुरु होय, त्यासाठीच दरवर्षी गुरुच्या सन्मानार्थ गुरुपौर्णिमा संपूर्ण देशात साजरी केली जाते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुरुची आवश्यकता आहे. गुरुविण कोण दाखवील वाट…असे आपण म्हणतो. गुरु हे कोणत्याही जातीचे, धर्माचे ,कितीही वयाचे असू द्या त्यांना बंधन नसते. नेहमी गुरूचा आदर करावा. कारण त्यांना देवाच्या बरोबरीचा दर्जा दिला जातो म्हणूनच त्यांना आचार्य देवो भव असे म्हणतात. खरोखरच गुरु हा देवा समानच असतो. म्हणून
*गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात परब्रह्म। तस्मै श्री गुरवे नमः। ।* सर्वच धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला खूप महत्त्व आहे. आपल्या गुरुची पूजा करण्याचा, स्मरण करण्याचा हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे.
आषाढी एकादशी संपल्या की वेध लागतात. गुरुपौर्णिमेचे,त्याच दिवशी महर्षी वेद व्यास यांचा जन्म झाला होता.असे सांगितले जाते म्हणून या गुरुपौर्णिमेला *व्यासपौर्णिमा* असेही म्हणतात. गुरु शिष्यांच्या अनेक जोड्या जग प्रसिद्ध आहेत या जोड्या सूर्य-चंद्र असेपर्यंत टिकणा-या आहेत त्यांचे स्मरण केले जाणार आहे. त्यात १) गुरु वशिष्ठ -श्रीराम, २) महर्षी व्यास- शुक ३) भगवान परशुराम -भीष्म द्रोणाचार्य ४) गुरु द्रोणाचार्य- कौरव पांडव
५) सांदीपनी ऋषी -श्रीकृष्ण -बलराम ६) महर्षी विश्वमित्र -श्रीराम लक्ष्मण
७) आर्य चाणक्य -चंद्रगुप्त
८) सचिन तेंडुलकर-रमाकांत आचरेकर.
एकलव्य या शबरी पुत्रास गुरु द्रोणाचार्यांनी विद्या शिकविली नाही, म्हणून त्यांनी त्यांचा मातीचा पुतळा तयार करून विद्या संपादन केली व तो त्या विद्येत अर्जुनापेक्षाही सराईत निघाला व पारंगत झाला म्हणून आपण आज सुद्धा त्याचे स्मरण करतो, गुरूमुळेच आपण घडतो गुरूकडूनच आपल्याला या देशाची या वनस्पतीची, निसर्गाची माहिती मिळते, संत दत्तात्रयांनी 24 गुरू केले असे आपण ऐकतो, कारण आपल्याला एखादी गोष्ट येत नसेल ती आपण दुसऱ्यां कडून माहिती करून घेतली तर तो सुद्धा आपला गुरु होऊ शकतो असे म्हटले जाते *अरे मुक्ताई मुक्ताई दहा वर्षाचे लेकरू। चांगदेव योगीयाने मानले रे तिला गुरु* यावरील वाक्यातून वयाचे बंधन नाही हा दाखला मिळतो कारण ती कितीतरी लहान आहे, परंतु ज्ञानाने मोठी आहे, म्हणून तिलाच आपले गुरु मानलेले आहे म्हणून गुरु हा वयावर नाही तर बुद्धीवर अवलंबून आहे असे एका बाजूने आपणाला म्हणता येते. गुरु हा शिष्याला घेऊन चालणारा असावा, गुरू हा बोललेली वाक्य न परतणारा असावा ।।गुरुने केलेली कृती मानवतावादी असावी. गुरुने एक वेळेस बोललेले शब्द नंतर फिरू नयेत तेव्हाच या ग्रुरू पौर्णिमेला महत्त्व प्राप्त होईल आणि आतापर्यंत गुरु बद्दल ऐकले आहेत काळ बदलतो तसे गुरु सुद्धा बदलत चालत आहेत सर्वत्र आपण हे पाहतच आहोत खरोखर आता गुरु कोणाला म्हणावे अशी एक मनाची अवस्था निर्माण झाली. राष्ट्रपिता महात्मा गांधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,स्वामी विवेकानंद, आचार्य विनोबा भावे डॉ. ए, पी, जे अब्दुल कलाम या सर्वांनीच गुरूला जीवनात अतिशय मानाचे स्थान दिले आहे ,गुरुमुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत असे त्यांच्या बोलण्यातून सतत येत होते छत्रपती शिवाजी महाराज यांनी गुरुला अतिशय मानाचे स्थान दिलेलं आहे त्यांच्या प्रती मनात आदर निर्माण केला आहे, बाबा याकूब हे त्यांचे गुरु होते तसेच त्यांनी त्यांच्या जीवनात आईला आपले गुरु मानले आहे. म्हणूनच गुरुशिवाय आपण पुढील वाट मार्गक्रमण करू शकत नाही असे ते म्हणत असत, *गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहता झरा* आहे, गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य आहे गुरु म्हणजे निस्सिम श्रद्धा आणि भक्ती आहे. स्वप्नांना बघायला वास्तवाचे डोळे लागतात, स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागते,
यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात म्हणूनच गुरुचे आशीर्वाद नेहमी पाठीशी असावेत ज्या शिष्यांनी गुरुला त्यांनी यशाची शिखरे पादाकांत केली आहेत, पंखात बळ देण्याचे कार्य गुरुजन करतात, संत कबीर एका ठिकाणी म्हणतात *गुरु बिना कोण बताये बाट* गुरु शिवाय आपणाला कोण वाट दाखवणार आहे म्हणून जीवनात गुरूला अतिशय महत्त्व आहे. संत नामदेवांनी विसोबा खेचर यांना आपले गुरु म्हटले आहे .त्यावेळेस नामदेवाचा अहंकार नाहीसा झाला असे आपण त्यांच्याविषयी वाचन करतो. *आदी गुरुशी वंदावे। मग साधन साधावे*।।१।। *गुरु म्हणजे मायबाप। नाम घेता हरतील पाप*।।२।। *गुरू म्हणजे आहे काशी। साती तीर्थ तया पासी।। ३।। तुका म्हणे ऐसे गुरु। चरण त्याचे हृदय धरू।।४* ।अशाप्रकारे आपण गुरूला वंदन केल्यानंतर गुरु हे आपले मायबाप आहेत त्यांचा आपण सदैव नाव घेतल्यानंतर आपण केलेली पापे आपोआप धुऊन जातील म्हणून गुरूला जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे खरोखर गुरु म्हणजे काशी आहे साती तीर्थ गुरुपाशी आहेत. म्हणून अशा गुरुचे चरण आपण नेहमी हृदयापाशी धरावे असे वरून अभंगातून आपल्याला सांगता येते. त्यासाठी गुरु विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. साधकाने कोणत्याही गुरुची निंदा करू नये. आपल्या देशात शाळा महाविद्यालयात अनेक स्वयंसेवी संस्थेत गुरुपौर्णिमा अतिशय थाटामाटाने साजरी करून गुरूप्रती कृतज्ञता पाळली जाते. शेगाव, शिर्डी येथे गुरु महोत्सव साजरा केला जातो. मात्र आता गुरु व शिष्य परंपरा थोडी थोडी कमी होताना दिसत आहे. पूर्वी शिष्य हा गुरुच्या गुरुकुल आश्रमामध्ये जाऊन शिक्षण घेत होता. तिथेच तो राहायचा आणि सर्व गोष्टी तो शिकायचा परंतु आता हे आश्रम पद्धती बंद होऊन शाळा – विद्यालय, रात्रशाळा,निघालेल्या आहेत, तिथून गुरु आणि शिष्य एकमेकांपासून थोडे दूर गेले,असे मला वाटते, त्यामध्येच प्रसार माध्यमाचा उगम झाला आणि शिष्याला ज्ञान अनेक ठिकाणी मिळू लागले ,त्यामुळे गुरूपर्यंत जाण्याची त्यांना आवश्यकता राहिली नाही. त्यामुळे शिष्याला परिपूर्ण ज्ञान मिळत नाही. त्यामुळेच आज समाजामध्ये हिंसाचार वाढत आहे. खून होत आहेत दरोडे पडत आहेत,मार्गदर्शन चांगले न मिळाल्यामुळे संस्कार न झाल्यामुळे त्याचा समाजावर विघातक परिणाम होत आहे. त्यामधूनच व्यसनाधीनता वाढलेली आहे. जर गुरु चांगला मिळाला तर संस्कार सुद्धा चांगले होतात हाच हा लेख लिहिण्यामागचा खरा उद्देश आहे म्हणूनच गुरु चांगला असावा जीवनात तरच जीवनाला महत्त्व आहे. हे मात्र काल सत्य होते आजही आहे आणि उद्या सुद्धा राहणार आहे. म्हणूनच अध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील सर्व माझ्या गुरूंना मानाचा मुजरा, गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

*शब्दांकन*
प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपत
संस्थापक अध्यक्ष : विठू माऊली प्रतिष्ठान गोकुळवाडी
ता. मुखेड जि. नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *