समतेची भावना जागविणारे :संत नामदेव , 15/7/2023 पुण्यतिथी विशेष , प्रासंगिक लेख

 मराठी भाषेमधील सर्वाधिक जुन्या काळातील संता पैकी एक,म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वराच्या संजीवन समाधीनंतर सुमारे 50 वर्ष भागवत धर्माचा प्रचार व प्रसार केला त्यावेळच्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी समतेची भावना लोकांमध्ये जागवून भावनिक एकात्मता निर्माण करण्याचे महान कार्य केले त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा शब्द प्रपंच…….

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. वारकरी संप्रदायातील हे एक सर्व श्रेष्ठ संत होते.त्यांना आद्य कीर्तनकार असेही म्हणतात,
कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व समाजाला व स्त्री-पुरुषांना एकत्रित आणून त्यांच्यात समतेची भावना रुजविली,
शीख समाजाच्या गुरुग्रंथ साहिबा मध्ये त्यांचे *६१* अभंग आहेत. पंजाब मध्ये त्यांना मानणारा आजही वर्ग आहे, पंजाबमध्ये आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तेथे संत नामदेवाला मानणारे भक्तगण शुद्ध शाकाहारी आहेत,
एवढा प्रभाव संत नामदेवांचा त्याकाळात पडलेला होता हे आपण जाणून घ्यावे, संत नामदेवाच्या अभंगाचे सुद्धा आज शेकडो लोक वाचन करतात, संत नामदेवाच्या भक्तीचे वैशिष्ट्य म्हणजे शीख संप्रदायातील लोकांना विठ्ठल भक्तीकडे वळविले आहे,

 

दरवर्षी आषाढी, कार्तिकी एकादशीला शीख समाजातील अनेक भक्त पंढरपूरला येतात, संत नामदेव महाराजांचे शिष्य म्हणून बाहोरदास ,विज्जू स्वामी,
जालो, केसो, लब्दा या पंजाबी परंपरा आजही चालू ठेवलेल्या आहेत, इ.स २०१५ मध्ये पंजाबमधील घुमान येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. त्यामुळे संत नामदेवाच्या विचारांची आज समाजाला किती आवश्यकता आहे हे संमेलनातून कळाले.
*नाचू कीर्तनाचे रंगी।।ज्ञानदीप लावू जगी*।ही त्यांची प्रतिज्ञा होती. एकदा संत नामदेवांना खूप गर्व झाला होता,
देव माझ्याशी बोलतो.मलाच दर्शन देतो. असे त्यांना सतत वाटत असे.
एके दिवशी सर्व संत मंडळी एकत्र जमली होती. त्यात संत ज्ञानेश्वर,संत निवृत्तीनाथ, संत सोपान, संत मुक्ताबाई ,संत गोरा कुंभार ,संत सावता माळी हे होते .मुक्ताबाई म्हणाली ‘गोरोबाकाका सर्वांची परीक्षा घ्या. गोरोबाकाकांनी त्यांच्या हातात मडके थापटणे आणले होते,

 

ते एकेकाच्या डोक्यात मारू लागले , शेवटी नामदेवाचा नंबर आला, नामदेवाच्या डोक्यावर गोरोबाकाकांनी थापटणे मारले आणि संत नामदेव ओरडले! काका काका ,तुम्ही माझे डोके फोडता काय? गोरोबा काका म्हणाले, नामदेवा तुझे मडके अजून कच्चे आहे, तेव्हा सर्व संत मंडळी खुदूखुदू हसू लागली, संत मुक्ताईला तर हसू आवरेना, ती हसत हसत म्हणाली ‘भाजून पक्क करा,?
संत मुक्ताबाईनी नामदेवच्या अंहकारा वर एक अभंग रचला,
*अखंड जयाला देवाचा शेजार* ।
का रे अंहकार नाही गेला।।
मानापमान वाढविशी देवा
दिवस असता दिप हाती घेसी।।
असे म्हणून मुक्ताईने संत नामदेवाला वाटेवर आणले ,तेव्हा संत नामदेवांनी मुक्ताईची क्षमा मागितली आणि विचारले, माझे गुरु कोण आहेत?
ते कोठे राहतात ? त्यांचे नाव काय? तेव्हा मुक्ताईने गुरुचे ठिकाण सांगितले. त्या ठिकाणी जाण्यासाठी संत नामदेव महाराज निघाले. मजल दर मजल करत गावच्या गाव मागे टाकत पाऊस आणि पशुपक्षी, वादळे यांचा काही विचार केला नाही त्यांना फक्त ध्यास लागला होता तो म्हणजे आपल्या गुरूचा,ते कसे असतील, आपल्याला भेटल्यानंतर काय बोलतील असे अनेक प्रश्‍न संत नामदेवाच्या मनात येऊ लागले.

 

 

शेवटी औंढा नागनाथच्या मंदिरात संत शिरोमणी नामदेव महाराज पोहोचले, तेथे एक वार्धक्याकडे झुकलेली व्यक्ती नागनाथाच्या मंदिरात सेवा करीत असताना आपले दोन्ही चरण महादेवाच्या पिंडीवर ठेवले होते.
तेव्हा संत नामदेवांना त्यांचा फार राग आला.त्या गृहस्थाचे पाय पिंडी वरून काढून जमिनीवर ठेवले तर काय आश्चर्य! जमिनीवर ही पिंड दिसू लागली,जिथे पाय ठेवले तेथे पिंडीच दिसत होत्या. तेव्हा संत नामदेवांनी त्यांची दोन्ही पाय हृदयाशी धरून त्यांना विचारले .

 

आपण माझे गुरु तर नाही ना ! त्या गृहस्थाने मान हलवून उत्तर दिले. नामदेवा मी विसोबा खेचर आहे आणि तुझा गुरूही आहे.नामदेवा पिंड दगडाची आहे फरक एवढाच की दगडाला पिंडीचा आकार दिला आहे. आकार हे निराकाराचे प्रतीक आहे जिथे माझे पाय ठेवलास तेथे पिंड आहे असा तुझा भास झाला आहे तर पिंड एकच आहे, हे सर्व ऐकल्यावर संत नामदेवाचे डोळे खाडकन उघडले, आणि त्यांचे गर्वहरण झाले ,कारण त्यांना गुरुची आवश्यकता होती, संत नामदेव आणि जनाबाई यांच्या विषयी आपल्याला माहिती आहे.वारकरी संप्रदायात ‘नाम्याची जनी’ म्हणून संत जनाबाईला ओळखले जाते,
ती शूद्र असूनही तिचा उद्धार झाला. पांडुरंगावर एवढी तिची निस्सीम भक्ती होती ,
*येग येग विठाबाई। माझी पंढरीची आई* भीमा आणि चंद्रभागा ।
तुझ्या चरणाची गंगा*
असे वर्णन जनाबाईनी अभंगाची रचना करून पंढरीचे महात्मे सांगितले आहे. संत नामदेवाची अभंग वाणी अमृताची खाणी आहे. अस्पृश्य उद्धारक म्हणून त्यांचा गौरव केला जातो, आषाढ वद्य महिन्यात इ ,स १३५० मध्ये पंढरपूर येथील चंद्रभागा नदीत स्नान करून पांडुरंगाच्या मंदिरात आले. त्यावेळी असंख्य भक्तगण मंदिराच्या दरवाजा जवळ येऊन थांबले होते तेथेच ते समाधीस्थ होणार होते.नामदेवांनी पांडुरंगाची पूजा करून भक्तांना वंदन केले आणि कीर्तनातून उपदेश केला ,

 

*आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा।* *माझिया सकळा हरीच्या दासा* *अहंकाराचा वारा न लागो राजसा* *माझ्या विष्णूदासी भावीकासी*।
*नामा म्हणे तया असावे कल्याण*।
*ज्या मुखी विधान पांडुरंगा*।।*
हा अभंग म्हणून संत नामदेवांनी वयाच्या ऐंशीव्या वर्षी शांतपणे समाधी
घेतली, त्या अगोदर त्यांनी शिष्यांना सांगितले होते, माझ्या अस्थी गोळा करा ,त्या एका कलशात ठेवा आणि पंढरपूरला लोक दर्शनाला येतात,
तिथे पहिली पायरी आहे त्या पायरीच्या खाली तो अस्थीकलश ठेवा,
भागवत धर्माची पताका उंच फडकत ठेवण्याचे कार्य संत नामदेवांनी केले. तसेच संत जनाबाईचा उद्धार केला.

 

विसोबा खेचर यांना गुरु मानून त्यांचे चरण हृदयाशी लावले.संसारात राहून परमार्थ सार्थक केला,
पंढरपूर येथे विठ्ठलाच्या
महाद्वारासमोर संत चोखामेळाचीं त्यांनी समाधी बांधली हे त्यांचे कार्य अजरामर झाले आहे,कोणताही भक्त पांडुरंगाच्या दर्शनाच्या अगोदर संत नामदेव पायरीचे दर्शन घेऊनच पुढे जातो, म्हणून सर्व जाती धर्मातील लोकांना दीन दलितांना घेऊन चालणारे असे संतश्रेष्ठ संत नामदेव महाराजाच्या चरणी विलीन होऊन त्यांच्या स्मृतीला वंदन करूया….

शब्दांकन
*प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपत*
अध्यक्ष: विठू माऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता. मुखेड जि. नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *