काल मढे घाटात जायचा मित्रांचा प्लॅन झाला.. मला वाटाड्या म्हणुन न्यायचं ठरलं कारण गेली ६ वर्षे मी तिथे पावसाळ्यात जाते… वारजे पानशेत पाबे घाटातुन मढे घाट असा प्रवास असतो..
जाताना जाणवलं की गेली चारपाच दिवस पाऊस झाला नसल्याने रस्त्यात कुठेही लहान धबधबे नाहीत त्यामुळे मढे घाटात धबधबा असेल का ??.. माझ्या मित्रांना तिथल्या स्वर्गीय दृष्याबद्दल मी रंगवुन सांगितलं होतं त्यामुळे मी थोडी साशंक होते.. निघायला उशीर झाला होता त्यामुळे पोचायला उशीर झाला.. धबधब्याच्या जवळ १५ मीनीटावर एका होटेलमधे आम्ही पिठलं भाकरी खाल्ली आणि धबधब्याच्या दिशेने निघालो आणि जोराचा पाऊस सुरु झाला.. माझ्या पाऊस मित्राने माझं दमदार स्वागत केलं.. आम्ही डावीकडे कार घातली आणि ती चिखलात रुतली ..काही केल्या ती सुंदरी चिखलातुन बाहेर यायला तयार नाही.. लोकांच्या मदतीने रुसुबाई बाहेर निघाली आणि तिला पार्क करुन धबधब्याच्या दिशेने निघालो.. नुकताच पाऊस झाल्याने गढूळ पाणी दिसत होते..
डायरेक्ट पायऱ्या उतरुन आम्ही अविस्मरणीय दृष्य पहायला आणि कॅमेऱ्यात टिपायला सुरुवात केली.. त्याचं रौद्र रुप पाहुन दुरुनच आम्ही बाजूला झालो. फोटो काढत वर आलो.. वरती ढगांची रजइ पांघरुन एक कपल रोमान्स करताना दिसले.. त्या कपल ला कोणी पाहु नये म्हणुन ढग उतरले का ?? .. पण मला त्या ढगातुनही ते कपल स्पष्ट दिसत होते. त्याच्या उबदार मिठीत ती पहुडली होती आणि तिच्या मनात चाललेले विचार मी कागदावर उतरायला तिथेच सुरुवात केली होती.प्रेमाने त्यांच्या मनात घातलेले थैमान माझ्यातील लेखिकेला स्वस्त बसु देइना.त्यांना पाहून मला कोणाची आठवण आली हे मात्र सांगणार नाही पण ते खूपच सुखद होतं.. आम्ही तिथुन कॉफीसाठी खाली आलो.. कॉफी घेउन पाण्यात पाय सोडुन गप्पा मारत आम्ही धुक्यात हरवलेली माणसे न्याहाळत होतो..तितक्यात होटेल मालक फोनवर कोणाशी तरी बोलत होता ते माझ्या मित्राने ऐकले.. तो म्हणत होता ,पाऊस नसल्याने धबधबा चार दिवस बंद होता.. तासभर पाऊस झाला आणि धबधबा सुरु झाला..त्यावेळी वाटलं , देव माझी किती काळजी घेतो ना प्रत्येक गोष्ट हवी तेव्हा मला मिळतेआणि हवी तशी.. आम्ही गप्पा मारत तिथे इतका वेळ रमलो कि लोक निघुन गेले याचं भानच राहिलं नाही.. घड्याळात ७ वाजुन गेले आणि भानावरआलो.. पावसाची भुरभुर सुरुच होती.. कपडे बदलुन आम्ही पार्कींगमधुन बाहेर पडलो आणि पुण्याच्या विरूध्द दिशेने निघालो.. पाऊस , ढग यातुन रस्ता दिसेना.. कुठे चाललोय कळेना .. एक कारवाला म्हणाला ,कुठे जायचय ?? .. आम्ही पुणे म्हणालो , त्यावर तो म्हणाला ,, सरळ ५ किलोमीटर जा.. रस्त्यावर लाईट नाहीत… एकही गाडी नाही.. एकही माणूस नाही .. आम्ही 20 च्या स्पीडने जीव मुठीत धरुन एका चौकात दीढ तासाने पोचलो आणि समोर बंद पडलेल्या बसचा ड्रायव्हर म्हणाला , तुम्ही विरूध्द दिशेला आलाय.. परत मागे जा.. तेव्हा लक्षात आलं की आम्हाला चकवा लागला.. परत जाताना रस्ता क्लीअर झाला होता.. वाटेत लाइट होते.. घरे होती.. मग जाताना हे काहीच का दिसले नाही ??.. पुण्याकडे निघाल्यावर जीव भांड्यात पडला.. भीती , काळजी , उशीर , फोनला रेंज नाहीया सगळ्या विवंचनेत आम्ही कसं ड्राइव्ह केलं आमचं आम्हालाच माहीत.. उशीरापर्यत तिथे राहिल्याची ही शिक्षा होती की धडा होता ??..
रात्री १२ वाजता सुखरूप घरी पोचलो पण यावरुन तुम्हा सगळ्याना एकच सांगेन कि मोह आवरता यायलाच हवा.. कितीही काहीही आवडलं तरीही किती खावं याचं भान हवं..
थोडक्यात समाधान आम्हीही ठेवलं असतं तर कदाचित लवकर आणि काहीही त्रास न होता आम्ही घरी पोचु शकलो असतो.. निसर्ग हाच आपला गुरु असतो.. चुकल्यावर तो शिक्षा द्यायला मागेपुढे पहात नाही हेच खरे..आम्हालाही शिक्षा आणि धडा दोन्ही मिळालं.. पावसाळी पिकनीक करताना सांभाळून करा..
सोनल गोडबोले
.