मोकळा श्वास कधी घेणार ?

 

लहानपणी आम्ही शेताकडे जायचे, शेतात गेल्यावर आई-बाबाचा हात धरून सर्व शेतच फिरून पहायचं, मग निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून सर्वच आम्हाला सुख मिळायचं, परंतु आज ग्रामीण भागातून जेंव्हा आम्ही शहरी भागामध्ये भटकंती करतोय त्यावेळी कुठेतरी ग्रामीण भागाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्याचं कारण पहिले घर पडके असायचे,

 

पत्राचे असायचे मग त्या घरावरील पत्रे सुसाट वाऱ्याने ते उडून सुद्धा जायचे. मग त्याच घरी राहून आम्ही आनंद साजरा करायचं. थोडा- थोडा बदल होत गेला, ग्रामीण भाग सुद्धा आज सुधारायला लागला. घरावरचे पत्रे निघून गेली, कारण वेगवेगळे वातावरण पाहून माणसात बदल होवू लागला आणि जीवन थोडं बदलूनच गेलं. पूर्वी प्रत्येकाच्या घरावर पत्रे असायचे आज पत्राचे घर कमी झाले आणि मोठा स्लॅबचा आणि काँक्रिट च्या इमारती उभ्या राहिल्या.

 

 

आता वाटतं की ती गरिबी बरी होती, कारण अगोदरच्या काळामध्ये घरामध्ये तेव्हा लाईट नसायची तेव्हा दिव्यामध्ये तेल टाकून घरामध्ये प्रकाश असायचे, आज तो प्रकार बंद झाला. त्याचं कारण हे जग तंत्रज्ञानाचे जग निर्माण झाले. आज लाईटचा जमाना आला परंतु, नवीनबांधलेल्या घरामध्ये अगोदरच्या सारखी खेळती हवा ही आता ती बंद झाली. कारण इथे मोकळा श्वास कधी मिळालाच नाही. चारी बाजूने बांधलेल्या भिंती आजूबाजूंच्या परिसरामध्ये त्या सुद्धा बांधलेल्या भिंती एकूण एकाची उंची त्याची उंची कमी तर मी त्याच्यापेक्षा मोठी उंची बांधील अशी म्हणणारी माणसं या जगामध्ये निर्माण झाली. मग मोकळी हवा कुठून मिळणार.

 

जसं जसं जग बदलत चाललंय तसा तसा माणूस सुद्धा बदलत चालला. प्रत्येक गोष्टीची माणसांना सवय लागली. घरामध्ये बसल्यानंतर जर लाईट गेली तर माणूस तडफडत असतात, कारण अगोदरच्या काळामध्ये सुद्धा लाईट नसायचे परंतु तो माणूस तडफडत नव्हता. त्याचं कारण त्याला निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून सवय लागलेली होती. आज माणसं निसर्गाच्या सानिध्यामध्ये कमी परंतु ज्या गोष्टी स्वतःला आळशी बनवायला लागतात त्या गोष्टीच्या सानिध्यामध्ये जाऊन माणसांनी त्यांना आपला मित्र बनवला. मग जेव्हा कधी आपल्या घरातील लाईट जाईल तो फॅन बंद होईल, तो एसी बंद होईल मग माणूस मात्र तेव्हा तडफड करायला लागतो. जर त्याच्याकडे लाईनमन यांचा नंबर असेल तर त्याला फोन लावून लाईट कधी येईल म्हणून विचारपूस करायला सुद्धा एवढा तळमळ करत असतो.

ही प्रत्येकाला सवय झाली जगण्याची अजून याच्यामध्ये भर टाकायचा म्हटलं तर माणसांनी आजच्या युगामध्ये स्वतःपेक्षा इतरांच्या वैयक्तिक जीवनामध्ये महत्त्व द्यायला लागले आहेत. त्याचं कारण माझ्यासोबत पटत नाही माझं त्याच्या सोबत पटत नाही असं म्हणू म्हणू स्वतःच्या जीवनाला एका पिंजऱ्यामध्ये कोंडून ठेवलं. मला हे जमत नाही मी ते करणार नाही तुला सुद्धा ते जमणार नाही तू सुद्धा करू नको अशा आळशी पणाच्या ज्या गोष्टी आहेत. स्वतःच्या मनामध्ये आणि आपल्या सोबत राहणाऱ्या त्या माणसांच्या मनामध्ये सुद्धा हे लक्षण पेरण्याचे काम जी माणसं करतात ती माणसं या जगाच्या पाठीमागे नेहमीच राहतात.

अनेकजण ताण-तणावात राहतात ज्या गोष्टी आपल्याशी निगडित नाहीत त्या गोष्टीचा सुद्धा विचार करत असतात आणि ज्या गोष्टी आपल्या ला साध्य होत नाहीत त्या गोष्टी आपण सोबत घेऊन राहणे या विचारसरणीमुळे आपली स्वतःची मानसिक संतुलन बिघडण्याची वेळ सुद्धा येऊ शकते कारण आपण जर ताण-तणावमुक्त रहिलोत्त तर आपल्याला आयुष्यामध्ये कधीच आपल्या वाटेला दुःख येत नाही आणि आपण आनंदाने जीवन जगण्यासाठी नवीन ऊर्जा प्राप्त होते.

जर का आपण योग्य वेळी आपल्या मनातल्या गोष्टी ज्या ज्या चांगल्या कामासाठी वापरता आल्या नाही, त्या-त्या वेळी आपल्यावर होणारे परिणाम आपल्यालाच धोकादायक ठरू शकतात. म्हणून बिनधास्त जीवन जगायचं असेल तर एकदम हसत खेळत जीवन जगता आलं पाहिजे. मन मोकळ्या गप्पागोष्टी त्यांच्याजवळ करा आपल्या शब्दातून त्यांना आनंद झाला पाहिजे आणि त्यांच्यासोबत आपलं सुद्धा दुःख हलकं झालं पाहिजे आणि आपल्याला जीवन जगताना एक गुंतलेलं जीवन न जगता कुठेतरी मोकळा श्वास घेऊन जीवन जगता आलं पाहिजे.

मुला बाळांना आई वडील शिक्षण शिकण्यासाठी बाहेर पाठवतात जीवाचं रान करून त्यांचे प्रत्येक हट्ट पूर्ण करतात, परंतु आजकालची पिढी खूप धोकादायक निघाली आई वडिलांच्या पैशाची उडवा उडव करून मित्रांसोबत नशा करून ते पैसे उडवले जातात आणि रोज कष्ट करणारा बाप…. आपल्या मुलांना कधीच कमी पडू नये याची दखल घेत असतो. पण आजकालची मुले कुठेतरी तडा देण्याचे काम करत असतात. कष्ट करून मुलांना शिकवणारा बाप तो कधीच स्वतः चा श्वास मोकळा घेत नाही त्याचे कारण तो आशेवर असतो की, माझी मुलं या जगामध्ये खूप विद्वान होऊन छोट्या मोठ्या नोकरीला लागून स्वतःच्या पायावर उभी राहवी. प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असतं, जर का आपण त्यांचे स्वप्न पूर्ण केलं तर खरंच आपल्याला आणि आपल्या आई-वडिलांना
मोकळा श्वास घेता येईल व आनंदाने जगता पण येईल…

लेखक:
-युवा साहित्यिक
सोनू दरेगावकर,
नांदेड.

संपर्क:
मो.7507161537

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *