नको असलेला कोणताही आवाज म्हणजे गोंगाट अशी या राशीची व्याख्या करता येईल. सामान्यपणे जे आवाज अप्रिय वाटतात किंवा ज्यांनी कटकट होते अथवा हवा असलेला आवाज ऐकण्यामध्ये अडथळा आणतात त्यांनाच गोंगाट म्हणतात.
किती कलकलाट आहे आपल्या आजूबाजूला! किती आवाज, किती धांगडधिंगा.
शांततेचा अभाव हे आजच्या युगाचं महत्त्वाचं दुखणं झालंय, सध्या कोणताही आनंद शांत आणि साधेपणाने साजरा होत नाही त्यासाठी अचकट -उचकट नाच, डीजेचा दणदणात, फटाक्याचा कडकडाट लागतोच, समोर रहदारी दिसत असली तरी मागचा वाहन चालक हॉर्नवर हात ठेवूनच गाडी चालवत राहतो. सोसायटीतल्या बहुसंख्य घरांमध्ये टीव्हीचा आवाज पुढील इमारतीपर्यंत ऐकू येईल इतक्या मोठ्या आवाजात वाजतं असतो. साध्या उत्सवातही रस्त्यात स्पीकर्सच्या भिंती उभ्या राहतात. कशासाठी इतका आवाज .या कर्कश आवाजाच्या आड एखादी अस्वस्थता, उद्विघ्नता दडली आहे का? की सध्या आपल्यालाच आपला आवाज ऐकायचा नाहीये! डोळे बंद करता येतात तसे कान ही बंद करता आले असते तर कदाचित या गोंगाटापासून दूर राहता आलं असतं. शांतता ही किती बोलकी असते हे अनुभवता आलं असतं.
या गोंगाटामुळे निसर्गातील अवर्णनीय असं रूप आपल्याला पाहायला आणि अनुभवायला मिळत नाही. सर्वत्र पसरलेली हिरवळ, ओलंचिंब वातावरण, सुसाट वाहणारा वारा आणि खळखळत वाहणारे धबधबे मनाला आनंद देत असतात. तर दुसरीकडे शहरांमधल्या काँक्रिट जंगलामुळे असा आनंद अनुभवायला मिळत नाही. मग पर्याय म्हणून शहरी लोक पावसाळ्यात निसर्गरम्य वातावरण अनुभवण्यासाठी ग्रामीण, डोंगराळ भागात किंवा किल्ल्यांवर भटकंतीचे बेत आखतात. निसर्गाच्या सान्निध्यात जावून मनातल्या गर्दीचा गोंगाट कमी करण्यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे विचार करा की आपल्या आजूबाजूला गोंगाट हा हवाच असतो का? शांततेने एखादा सण ,उत्सव, आनंद साजरा करता येतो का? नाही तर यापुढे
मानवाला शांत आयुष्य जगण्यासाठी आणि व्यर्थ स्पर्धा न करण्यासाठी तशा स्वरूपाचे शिक्षण लहानपणापासून देण्याची गरज पुढे भासेल.
रूचिरा बेटकर,नांदेड.
9970774211