नांदेड : नांदेड शहराला पुन्हा एकदा देशातील मेट्रोसिटीशी जोडण्यासाठी, व्यापार उद्योग, भाविक भक्तांच्या सेवेसाठी , नागरिकांचा प्रवास जलद गतीने आणि सुकर होण्याचे अनुषंगाने खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या यशस्वी प्रयत्नांमुळे नांदेड – गोवा आणि नांदेड – बेंगलोर या विमान सेवेला हिरवा कंदील मिळाला असून लवकरच ही विमानसेवा सुरू होणार आहे. त्यासाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून उडेगा देश का आम आदमी उड्डाण ही योजना सुरू केली. देशातील अन्य राज्य आणि शहरांसह नांदेड येथेही विमान सेवा सुरू करण्यात आली होती. नांदेड -, नांदेड- हैदराबाद ,नांदेड -, नांदेड- दिल्ली या मार्गावर सुरू झालेल्या विमानसेवेचा नांदेडकरांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला होता. शिवाय शीख समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हुजुर साहिब गुरुद्वारासाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठीही या विमानसेवेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती . दरम्यानच्या काळात काही तांत्रिक अडचणीमुळे हळूहळू या विमानसेवा बंद पडल्या . रिलायन्स कंपनीकडे विमानतळाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी होती. सदरील कंपनीने ही जबाबदारी योग्य रीतीने पार पाडली नसल्याने येथून रात्रीला उड्डाण करण्यासाठी असलेली यंत्रणा बंद पडली. त्यामुळे नांदेड विमानतळावर रात्रीचे वेळी उतरणाऱ्या आणि उडान करणाऱ्या विमान व्यवस्थेलाच बाधा पोहोचली .या बाबीचा प्रवाशांना,भाविक भक्तांना, रुग्णांना आणि प्रवाशांनाही मोठा फटका बसला होता . ही बाब लक्षात घेता नांदेड येथून पुन्हा विमानसेवा सुरू व्हावी यासाठी येथील व्यापारी, प्रवासी आणि शीख समाजातील भाविक भक्तांनी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडे मागणी केली होती . या मागणीच्या अनुषंगाने खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेऊन नांदेड येथून पूर्वत विमानसेवा सुरू करावी यासाठी पाठपुरावा केला . अखेर या पाठपुराव्याला यश आले असून केंद्रीय उड्डान मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नांदेड येथून नांदेड – गोवा आणि नांदेड – बेंगलोर या मार्गावरील विमान सेवेला हिरवा कंदील दाखवला आहे. एवढेच नाही तर नांदेड विमानतळाचे व्यवस्थापन रिलायन्स कंपनीकडून काढून घेऊन ते एमआयडीसी कडे हस्तांतरित करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे . विमान प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, त्यांचा विमान प्रवास अधिक सुकर आणि जलद गतीने व्हावा या अनुषंगाने खा. चिखलीकर यांचा शासन दरबारी पाठपुरावा सुरू होता या पाठपुराव्याला यश आले आहे . नांदेड – गोवा आणि नांदेड- बेंगलोर विमानतळ विमानसेवा सुरू झाल्यानंतर अल्पावधीतच नांदेड येथून मुंबई , हैदराबाद , दिल्ली आणि अमृतसर या मार्गावरील विमानसेवा सुरू करण्यासाठी आपला सकारात्मक प्रयत्न आहे . केंद्रीय उड्डाण मंत्री सिंधिया यांनीही या अनुषंगाने आपली सकारात्मक भूमिका व्यक्त केली आहे . त्यामुळे आगामी काळात नांदेड येथून देशभरातील मेट्रो शहरांना जोडण्यासाठी विमानसेवा सुरू होईल . त्याचा फायदा नांदेडच्या उद्योग व्यवसायाच्या भरभराटीसाठी आणि नांदेड येथे येणाऱ्या भाविक भक्तांसाठी निश्चितपणे होईल असा विश्वास खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला आहे.