जुलै महिन्यातील शेवटच्या आठवड्याची एक सायंकाळ. चार वाजताची शाळा सुटल्यावर दफ्तर बाहेरुनच घरात फेकून वहादवाटेच्या शिवपरिसरात खुरपणासाठी गेलेल्या मायकडं वेगानं चाललो होतो. गुरुवारी घेतलेल्या नव्याकोऱ्या चप्पलेमुळे पाय झपाझप चालत होते. आकाशात ढग जमायला लागले होते. थंडगार वारा अंगाला झोंबत होता. पेरणी झाल्यानंतर बरेच दिवस पाऊस नव्हता. त्यामुळे वातावरणात झालेला बदल सगळ्यांनाच दिलासादायक होता. पीक छान तासोट्या लागलं होतं. काही ठिकाणी तणही भरपूर माजलं होतं. तासाभरातच मी पोहोचलो. माय अजूनही निंदतच होती. तिची पाचवी पात लागायला अवधी होता. तेव्हा मी खैराच्या झाडावर कुठे सोनकिडे दिसतात का ते पाहात तिथल्या तिथे भटकू लागलो. सोनकिड्यांचा लहानपणापासून प्रचंड नाद. त्याच्या मानेला पांढरा दोरा बांधून त्याला उडायला लावणं, त्याला कोवळी बारीक पानं खायला देणं, चावी नावाच्या काडीपेटीत घालून ठेवणे, त्याने एकदोन अंडे दिले का ते पहाणे, तपकिरी रंगाचा किंवा काळ्या रंगाचा सोनकिडा पकडायला फारच मजा वाटायची. आमच्या वाड्यातले बाबूदादा, कुसुमाक्का, सुनील तात्या, सिध्या, संजू तात्या आणि गल्लीतले पोरं गोतम्या, काळं गोतम्या, कुर्ब्या, जिवन्या अजून एक दोन रोजच रानातून सोनकिडे धरुन आणायचे. कुणाकडे किती आहेत हे पहायला आणि नर सोनकिडे किंवा तो काळ्या रंगाचा सोनकिडा कुणाच्या घरी आला तर ते पहायला धूम ठोकायची. शाळा सुटल्यावर घरीच राहिलो तर संध्याकाळी पोरं पोरं मिळून नागू महाराजाचे समदे शेरडं बिरडे फोडू-फोडू बांधायची. महाराजानं आम्हाला घोटरं फोडून खायची सवय लावली होती. आम्हाला हंगामानुसार चारंही मिळायचे. आखरावर राहायला आल्यावर हे सगळं सुटलं होतं. आज मी मायकडं आलो होतो. एकही सोनकिडा मला उडतांनासुद्धा दिसला नाही.
मायची पात लागल्याबरोबर ती काहीतरी शोधू लागली. तेवढ्यात मला तिने फार प्रेमाने हाक मारली. मी पळतच गेलो. मायनं काही लाकडं गोळा केले होते. काही गोवऱ्याही होत्या. सोनकिडे हुडकतांना मीही थोड्या गोळा केल्या होत्या. मायनं टोपल्यात गोवऱ्या टाकल्या, त्यात एक ईळा, दोन खुरपे, वाळलेले बिब्बे, जरमलचा तांब्या, एक डेचकी होती. मोठ्या युवकीनं ते व्यवस्थित रचून त्यावर गोळा केलेल्या वाळल्याकरड लाकडांचा हलकासा भारा ठेवला. सोबत नेलेल्या पटकराची चिंबळ केली. दिवसभर राबल्यानंतर घरी न्यायची ती दौलत डोक्यावर घेतली आणि दोघं मायलेकरं झपाझप पावलं टाकीत घराकडं निघालो. एव्हाना सगळंच अंधारुन आलं होतं. पावसाची चिन्हे होतीच. विजा आभाळात वाकुल्या दाखवित होत्या. मी मनातल्या मनात घाबरत होतो. माय बिलकूल घाबरत नव्हती. माय एक झाल बाई होती. जीवनसंघर्षाच्या वाटेवरची योद्धा होती. न घाबरता हातात शस्त्र धरुन कसं लढायचं ते मला शिकवित होती. पाऊस वाऱ्यावावदानासह आला. लाकडाचा भारा तिनदा हेलकावे खाऊ लागला. आम्ही दोघेही भिजून चेकोळ झालो. चालता चालता ती मध्येच थबकली. ती सडकंच्या बाजूला काहीतरी रोखून पाहू लागली. पाऊस जोराचा सुरु होता. माझ्या डोक्यावर तिने टोपलं दिलं आणि ती जवळच्या बराशीत उतरली. मी म्हणालो, ‘माय कुठं चाललीस?’ तेव्हा ती म्हणाली, ‘नीट सडक धरुन पुढे चालत राहा!’ मी पुढेच चालत राहिलो. अंधारात काहीच दिसत नव्हते. भित- भित पाऊल टाकू लागलो. माझ्या डोक्यावर असलेला मायचा संसार पुर्णपणे भिजून गेला. मी अधून मधून चमकणाऱ्या विजांच्या उजेडाचे बोट धरून चालत होतो. माय काहीतरी वस्तू छातीला धरुन ताडताड माझ्या जवळून पुढे गेली. तिने चढ पार केला. मी तिच्यापासून हातभर अंतरावर होतो. अजूनही पाऊस धारदारच होता. चढावर माय गेल्याबरोबर वीज कडाडली. त्याआधी क्षणभर आसमंत प्रकाशाने उजळून निघाला. पुर्वेकडून लख्खकन प्रकाशलेल्या उजेडात दिसलेली पाठमोरी माय मला अत्यंत ऐतिहासिक वाटली.
त्या दिवशी गावात आमच्या बाजूने शेवटी येणारे दोघेच होतो. जेवणयेळ झालीच होती. घरी अण्णा (वडील) आणि लहानुला भैय्या दोघेजण होते. अण्णानं दार काढलं आणि माय काहीच न बोलता तडक मधल्या घरात गेली. अण्णानं विचारलं, ‘हे कुठं सापडलंय?’ मायनं उत्तर दिलं नाही. ‘या घरात’, एवढेच ती म्हणाली. मधल्या घरात एक चिमणी टिमटिमत होती. मी घरात आलो आणि कोपऱ्यात टोपलं ठेवून मळक्या टायेलानं अंगं पुसून काढलं. त्याचा कुबट वास येत होता. पण पर्याय नव्हता. आमच्या वाड्यात डावीकडून राहत होते ते केरबाबाबा- मरुमाय, लक्षीममाय- शेसुबाबा. रामाआज्या आणि त्याचे कुटुंब गावात राहात नव्हते. पऱ्याग आजी आधीच कधीतरी निवर्तली होती. जांबची माय आमच्या घरी बरेच दिवस राहून मेली होती. माडीवर मोठे बाबा- मोठीमाय, उजव्या बाजूला हिरकणआजी – मोत्याआजाचं भलं मोठं कुटुंब होतं. आम्ही सगळेच आमच्या प्रश्नांना पर्याय शोधत होतो. रोजच नव्या संकटांचा सामना करीत होतो. जीवनसंघर्षाची मजबूत हत्यारं हातात होतीच. ती सतत परजून घेत होतो. आम्हीच आमच्या जळत्या प्रश्नांना निकालात काढीत होतो. चिमणीच्या उजेडात पावसानं झपाटलेलं शेळीचं लहानसं मादीपिल्लू मला एक नवं हत्यारच गवसलंय, असं भासलं. अण्णा आणि माय दबक्या आवाजात काहीतरी पुटपुटत होते. त्या पिल्ल्याला कोरडं करुन उर्जा देत होते. पावसाच्या तडाख्यात ते मेलं असतं. मायनं त्याला जीवदान दिलं आणि त्याला ढाल बनविण्याचं स्वप्न तिच्या डोळ्यात तरळू लागलं. तेवढ्या उशिरा मायनं खिचडी केली. मी मटामटा खाऊन झोपी गेलो . भैय्या आधीच झोपला होता. मायनं ते लाकडं मोकळे केले. गोवऱ्याही पूर्ण भिजल्यानं त्याना वाळवणं आवश्यक होतं. परंतु त्यांचा आकार विकार आणि आधार बदलला होता. याचं काहीच वाईट तिला वाटत नव्हतं. एक नवं स्वप्नं डोळ्यात साठवून ती झोपी गेली.
दुसऱ्या दिवशी मी दुपारच्या सुट्टीत घरी आलो. घरी अत्यंत सुतकी वातावरण होतं. अण्णा घरी नव्हते. भैय्या कुसुमाक्काकडे होता. घरात माय रडत बसली होती. मी काहीच बोललो नाही. इकडे तिकडे पाहिलं. शेळीचं पिल्लू गायब होतं. म्हणूनच माय रडत होती की काय? मी मायला भूक लागली! असं म्हणालो. मायनं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं! मीही दुःखी झालो. माय काहीच बोलत नव्हती. मी कालचीच शिळी भाकर आणि फक्की मिरचू घेतलं आणि खात बसलो. खाणं झाल्यावर मी हासहुस करीत कुसुमाक्काकडं गेलो. कुसुमाक्का म्हणजे केरबाबाबा आणि मरुमाय ची शेवटची मुलगी. किसनआना आणि हरीआना दोन भाऊ. सरसअक्का आणि कुसुमाक्का ह्या दोन बहिणी. सरस अक्काला व्हंडाळ्यात दिलं होतं. कुसुमाक्का आम्हाला लई जीव लावायची. काय घडलं ते अक्कानं सांगितलं! सकाळीच नागूमहाराजाची बायको किसनाई घरी आली होती.
‘अगय इस्ने आमचं शेळीचं पिल्लू आनलीस मनं?
‘नाही माय, तुमाला कोन मनलं?’
‘भान्यानं मनला! चोर रांडं, घरात लपवून ठिवलीस काय?’
‘किसना आत्या तोंड संबाळून बोला!’
‘चोर ते चोर आन वर शिरजोर?’, ‘काय न्याय हाय!’
बायांचा गलका ऐकून भानूतात्या आला, आणि म्हणाला,
‘घरातच हाय पिल्लू, किसनाभाभी बघं घरात जाऊन!’
किसनाई तडक घरात गेली. कनगीच्या बाजूला बांधलेल्या पिल्याला दाव्यासकट बाहेर घेऊन आली. तिचा पारा चढला.
‘हे पिल्लू आमच्या खांडातलं हाय, तू वडाळून आणलीस…चल चार मानसात.’
मायबी चेतली होती. ती ढालीसारखी उभी राहिली. तावातावाने बोलू लागली. ते शेळीचं पिल्लू कुठं सापडलं, त्याला घरी कसं आणलं, त्याला रातोरात वाचवून घेतलं याची गोष्ट सांगितली. मायचा आवाज चढला होता. गर्दा ऐकून तिच्या भावकीचे काही आणि आमच्या वाड्यातले समदेच गोळा झाले. तप्स्या मिटविला. ते नागू महाराजाच्या खांडातलंच पिल्लू आहे, हे सिद्ध झालं. अण्णानं ते मान्य केलं. किसनाई विजयी मुद्रेने ते करडू तिच्या घरी घेऊन गेली. आलेले माणसं पांगले. मायनं त्या लहानशा कोकराचा जीव वाचविला, ह्या बाबत कुणी काहीही बोललं नाही. शेवटी मायला ‘चोर’ हा शब्द जिव्हारी लागला होता.
ती पाट होती. तिला पोसून त्यापासून काही वाडवादिडवा करायच्या मायच्या दूरदृष्टीच्या मनसुब्यावर पाणी फिरलं होतं. त्यातून वाड्यातल्याच माणसानं फितूर होऊन सांगितल्यावर ती हतबल झाली होती. आगतिक झालेली माय एकदा अण्णाकडं आणि एकदा त्या पिल्ल्याकडं पाहत होती. शेळी खरेदी करणं काही फार मोठी गोष्ट नव्हती. ते आताही करता येणार होतं. झालं गेलं माय विसरून गेली. पण शब्दांची दुखरी जखम मनात चिघळत होती. शारीरिक किंवा मानसिक वेदनांना कवटाळून बसण्याचे दिवस नव्हते ते. अण्णा बांधकाम मिस्री होते. माय मजूरी करायची. गावाच्या उत्तरेला चार एकर गायरान होतं. माझ्या जन्मापासून बरचसं पिकत होतं. मी शेताकडं गेल्यावर सोनकिडे पकडण्याचाच कार्यक्रम करीत असे. आता बोधवाड्यात आणि मांगोड्यात शेळीच्या पिल्ल्याची व्हायना झाली. मायला आयाबाया विचारु लागल्या. काही टोमणे मारु लागल्या. नमंनमं करता पंचीम आली. मायला न्ह्यायला मामा आला. तेव्हा एकच कंधार लातूर एसटी बस होती. ती अकरा वाजता गावात यायची. साडेबारा वाजता तर शिरुर ताजबंद टच! दुपारी एक वाजता चापोलीला उतरुन गाडी असली हिंप्पळनेर तर बरं नाही तर पायीच जावं लागायचं. मीबी गेलो नायगावला. पायी चालता चालता सडकंच्या कडंचे कवळ्यालस पानांचे झाडं निरखून पहायचा मला नादच होता. कमरेएवढ्या गवतावर असलेले ते लांबुळगे पोपटी-निळसर-पारवे किडे सोनकिडे म्हणूनच हौस भागवून घ्यायची. दुसरेही धामुक्यासारखे काळे ठिपके असलेले वाळक्या गवती रंगाचे किडे उडतांना मजा यायची. या उडणाऱ्या किड्यांच्या पंखातून जो आवाज येत होता. तो मला फार आवडायचा.सोनकिड्यांना वेगवेगळ्या रंगांचे पंख असत. कधी कधी डोक्याचा भाग हिरवट पोपटी किंवा चमकदार निळसर किंवा काळ्यावर पांढरे ठिपके असायचे. पोटाकडूनही आकर्षक रंगसंगती असायची. कोणत्याही रंगांचे असले तरी सोन्यासारख्या चमकणाऱ्या सोनकिड्याला अंगावरुन चालवायला लावण्यात अनामिक आनंद होता. बोलत चालत आम्ही नायगावच्या शिवारात पोहोचलो. इथून तिथून भैय्याला मामानं घेतलं होतं. आता थोड्याच वेळात गावात शिरणार तेवढ्यात मला काड्याची डब्बी सापडली. तीव्र उत्सुकतेने मी ती डब्बी खोलली. त्यात एक रुबाबदार मोठा सोनकिडा होता. जिवंत होता. मी ती डब्बी कुडत्याच्या खिशात टाकली.
नायगावात घरी आल्याबरोबर धुरामायला बघून माय व्हां s s म्हणून रडू लागली. धुरामाय म्हणजे मायची माय. मामा हातपाय धुऊन बाहेर निघून गेला. विष्णूबाई कुरुळ्याहून आल्या म्हणून शेजारच्या मायच्या चुलतबहिणी, भावजया गोळा व्हायच्या. आत्ताबी त्या आल्या. सजामावशीलाही कुणीतरी सांगितलं. मग ती पण आली. ते सगळे रडत पडत बसले. त्यांच्याकडं हे असं गनगोत खूपच दिवसांत भेटल्यावर मायाबहिणींचा रडापडीचा एक कार्यक्रम उरकत असे. त्यानंतर सुखादुखाच्या गोष्टी व्हायच्या. शेतीभाती, पिकपाण्याच्या गोष्टी. मग चर्चा…कुणाला लेकरं किती, लुगडं चोळी, कोण गरोदर, कितवा महिना, कुणाचं जमलं, नाही जमलं, काय झालं, काय काय झालं…वगैरे वगैरे. या चर्चा रंगल्या होत्या. ‘त्या’ शेळीच्या पिल्याची गोष्ट मायनं सांगितली. मी दोरा हुडकून, सोनकिडा बांधून त्याला हवेत उडवित होतो. तो उडायचा आणि हातावर, खांद्यावर बसायचा. येतांना मी जुना पाला काढून टाकून डब्बीत बाभळीचा ताजा पाला घातला होता. मी पुन्हा सोनकिडा हवेत उडवायचो आणि तो जरासा उडाला की बसायचा. अंगावरुन चालायचा. हे मायनं बघितलं. ती चिडली. त्वरेने माझ्याकडे आली. माझ्या हातातील दोरा हिसकावून घेत म्हणाली, ‘सोनकिड्यानं पोट भरना माय! आन इकडं.’ माय चांगलीच माझ्यावर खेकसली. तिनं सोनकिडा दोऱ्यासकट हवेत दूरवर उडविला. ‘माय पाट घेऊन देणाराय, आन ती तुलाच वळायच्याय, कळ्ळं का?’ मी प्रचंड उदास झालो. सोनकिडा दूरवर निघून गेला. माझ्या जवळ रिकामी, जरासा बाभळीचा पाला भरलेली काडीपेटीच राहिली. तिला सापडलेलं पिल्लू किसनाईनं नेल्यावर जेवढं दुःख मायला झालं होतं, त्याहीपेक्षा मी जास्त दुःखी झालो होतो.
– प्रज्ञाधर ढवळे, नांदेड.