निष्पृहपणे आणि निरपेक्षपणे काम करणारा निष्ठावंत कार्यकर्ता : भारत कलवले

जी माणसं स्वार्थाच्या पलीकडे जाऊन सर्वव्यापी आणि सर्वांगीण विचार करतात ती माणसं आणि कार्यकर्ते समाजासाठी कायम वंदनीय ठरत असतात. अशा कार्यकर्त्यांच्या बळावर,त्याच्या निस्सिम निष्ठेवर आणि निष्पृहपणे केलेल्या कामावर संघटना मोठी होत असते. आणि त्या संघटनेसोबत निष्ठापूर्वक काम करणारे कार्यकर्ते ही लोक मनाच्या मनात रुंजी घालत समाजात एक वेगळी ओळख निर्माण करत असतात. समाजाच्या उत्थानासाठी, उद्धारासाठी, परिवर्तनासाठी आणि प्रबोधनासाठी गेली अनेक वर्ष सामाजिक बांधिलकी जपत समाजातील सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्याच्या उन्नतीसाठी निष्ठापूर्वक काम करत क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ ‘लसाकम’या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्यागाच्या परिशिमा ओलांडत अत्यंत निष्पृहपणे काम करणारा एक ध्येयाने झपाटलेला ध्येयवेडा कार्यकर्ता म्हणून भारत कलवले यांची महाराष्ट्रभर ओळख आहे.
साधारणतः १९९१-९२ ची घटना असेल त्यादरम्यान भारत कलवले आणि माझा परिचय एका सार्वजनिक कार्यक्रमाच्या माध्यमातून झाला. त्या दिवसापासूनचा हा पायाला भिंगरी बांधून फिरणारा कार्यकर्ता ते आजपर्यंतचा भारत कलवले नावाचा कार्यकर्ता मी जवळून पाहिला आणि अनुभवला आहे. एखाद्या संघटनेवरची निष्ठा कशी असावी हे मी अनेकदा भारतजी कलवले यांच्याकडून अनुभवली आणि शिकली आहे. त्यावेळी क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ अर्थात ‘लसाकम’चे जाळे सर्वदूर पसरत होते. अनेक निष्ठावंत कार्यकर्ते या संघटनेच्या माध्यमातून जीवापाड प्रेम करत एकमेकांच्या सुखदुःखात सामील होत एकमेकांचे गुणगान गात या परिवारात नव्या नात्याने बांधले जात होते. पायाला भिंगरी बांधून फिरणारा कार्यकर्ता कसा असावा हे मी भारत जी कलवले यांच्या रूपाने अनुभवलेला आहे.
भारतजी कलवले नावाच्या एका ध्येयवेढ्या कार्यकर्त्यांनी समाजात निर्माण केलेली पत आणि ऐपत हेही आम्हाला जवळून पाहता आली. एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन असले की रात्रीचे एक-दोन वाजेपर्यंत आपणही न झोपता आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनाही झोपून देता अनेक कल्पना आमच्यासमोर मांडत तो कार्यक्रम कसा यशस्वी होईल याची आखणीत जणू ते करत असत. ठरलेला कार्यक्रम यशस्वी करून घेण्यासाठीची त्यांची धडपड मला या कार्यकर्त्याच्या रूपाने मला जवळून पाहता आली. आपण आपल्या लेकरावर जितके जीवापाड प्रेम करतो त्यापेक्षाही संघटनेवर ‘लसाकम’वर जास्त प्रेम करणारा हा अवलिया कार्यकर्ता इतरांना मोठं करत करत सातत्याने अनेक कार्यकर्ते कर्मचाऱ्यांना आधार देण्याचं काम कायमस्वरूपी करत राहिला आहे. दुसऱ्याचं मोठेपण मुक्तकंठाने कबूल करणार हा कार्यकर्ता निश्चितच मला आज वंदनीय वाटप आला आहे. दुसऱ्याला मोठे म्हणण्याचं मोठेपण ज्यांच्या अंतःकरणात असते त्यांचं अंतःकरण शुद्ध नितळ आणि निर्मळ असते. हे भारतजी कलवले नावाच्या कार्यकर्त्याला अनेक वर्षांपूर्वीच समजलेलं, अनुभवलेलं आणि उमजलेलं होतं. आपल्या सोबत असलेला निष्ठावंत कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे. ही त्यांची प्रामाणिक तळमळ अनेकदा आम्हाला प्रेरणेच्या वाटेवरून चालण्यासाठी बळ देणारी आहे.
क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ अर्थात ‘लसाकम’चे संस्थापक तुकाराम खानझोडे सरांच्या संपर्कात आम्ही आलो आणि आमच्या जीवनाला प्रकाशाची नवी झळाळी प्राप्त झाली. संघटनेवरचे प्रेम, आत्मीयता, स्नेहभाव, आपलेपणा आणि निष्पृहपणा हे सगळे गुण तुकाराम खानझोडे सरांनी आमच्या अंगी रुजविण्यासाठीची त्यांची तळमळ आम्हाला नेहमीच वंदनीय वाटत आली आहे. तो झपाटलेला काळ.. दिवसाचा विचार नाही, रात्रीचा विचार नाही किंवा पोटापाण्याची सोय काय आहे याचा विचार न करता एखादा कार्यक्रम कसा यशस्वी होईल यासाठीचे खानझोडे सरांचे नियोजन आणि त्यासोबतच प्रा. विठ्ठल भंडारे सर आणि भारत जी कलवले यांचे सूक्ष्म नियोजन यातून संघटनात्मक पातळीवरचे ऋणानुबंध अधिक घट्ट होत गेले. आम्ही एकमेकांच्या घरी गेलो की जीवाभावाचे आणि रक्ताचे नातेवाईक एकमेकांवर जितकं प्रेम करायचे त्यापेक्षाही जीवापाड प्रेम एकमेकांवर आम्ही करत असू. आज तो काळ आठवला की त्यावेळेसचा आपलेपणा आज कमी कसा होत गेला. याचे चिंतन करण्याची गरज वाटत राहते.
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती कार्यक्रमातली मोटार सायकल रॅली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने काढण्यात येणारी मोटरसायकल रॅली, त्या रॅलीचे सूक्ष्म नियोजन कोणत्या गाडीला कोणता झेंडा लावला पाहिजे झेंडे दाखवताना कोणते पाहुणे उपस्थित राहिले पाहिजेत यासाठीचे त्यांचे नियोजन आणि गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळे आणि जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय अधिवेशने या कार्यक्रमांच्या माध्यमातून संघटनात्मक पातळीवरील आपलेपणा, जिव्हाळा अधिक घट्ट होत गेला. रात्री बारा- एक वाजेपर्यंत एकमेकांच्या पाठीवर उभे राहून पोस्टर चिटकविणे, बॅनर लावणे यापासून तर सकाळी सतरंजी टाकण्यापर्यंत पुष्पहार आणण्याची धावपळ आणि पाहुण्याला कार्यक्रम स्थळापर्यंत घेऊन येत असतानाची धावपळ हे करत असताना कधी अंगातील कपड्याचा विचारही न करता भारत कलवले नावाचा कार्यकर्ता अगदी ध्येयाने झपाटल्यागत आणि मनाने बहारल्यागत राबत असलेला आम्ही जवळून पाहिला आहे. कधी वृत्तपत्रात नाव यावं किंवा फोटो छापून यावा किंवा आपण कार्यक्रमाचा अध्यक्ष व्हावा हे जणू या कार्यकर्त्याला माहीतच नव्हते. इतक्या निष्पृहपणे चळवळीत झोकून देऊन काम करणारा हा कर्मयोगी आज मला संघटनात्मक पातळीवर आभाळा एवढा मोठा वाटतो. इतकं झपाटल्यागत आणि बहारल्यागत काम करणारा कार्यकर्ता आज संघटनेच्या कोणत्या पदावर आहे. यापेक्षा आज महाराष्ट्रात इमानदार आणि निष्पृह, नितळ आणि निर्मळ मनाचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी जे नाव कमावलं आहे. ते मला लाख मोलाचं वाटते. या धडपड्या ध्येयवेढ्या आणि दुसऱ्याला मोठं करता करता स्वतः मोठे झालेल्या या कार्यकर्त्याचा आजचा हा सुवर्णकाळ पाहता त्यांनी आयुष्यभर केलेल्या कामाचे त्यांना फळ मिळाल्याचे समाधान आहे. आज ते नांदेड शहरातील नाईक नगर भागातील एका नामवंत महात्मा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून यशस्वी आणि उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावताना त्यांच्या कार्यकाळात शाळेने घेतलेली गुणवत्ता संवर्धनातील उंच भरारी आणि विद्यार्थी विकासासाठी आणि गुणवत्ता वाढीसाठी राबवीत असलेले विविधांगी उपक्रम यामुळे आज शहरात ही शाळा नावलौकिकाला पात्र ठरते आहे. यातूनच त्यांच्या कार्य आणि कर्तृत्वाची ओळख सर्व दूर पसरत चालली आहे. आज या कार्यकर्त्याचा जन्मदिवस, वाढदिवस…‌
या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतजी कलवले या मनस्वी मित्राला, चळवळीतील कार्यकर्त्याला आणि मार्गदर्शकाला मनापासून शुभेच्छा आणि शुभकामना….

शुभेच्छुक
• * *शिवा कांबळे*••
*{राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक, नांदेड.}

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *