टिवटिवाट :चालती हो !

                अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड स्टार कंगना राणौतने आत्तापर्यंत बॉलिवूडमधील घराणेशाहीचा मुद्दा लावून धरला होता. राजपूत प्रकरणावर कंगना रणौत सातत्याने काहीना काही भाष्य करतच आहे.  पण आता ती बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनबद्दलही उघडपणे बोलताना दिसत आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर सुरु असणाऱ्या चौकशीत ड्रग्स कनेक्शनही उघड झालं होतं. त्यामुळे बॉलिवूड आणि ड्रग्स यांचा संबंध पुन्हा ऐरणीवर आला. बॉलिवूड स्टार कंगना राणवतनं ड्रग्सबाबत उघडपणे बोलताना थेट बॉलिवूडच्या चार स्टार्सची नावे घेतली होती. कंगनाने तिच्या नव्या ट्विटमध्ये बॉलिवूडच्या चार स्टार्सवर हल्लाबोल केला. रणवीर सिंग, रणबीर कपूर, अयान मुखर्जी आणि विकी कौशल यांना मी रक्ताची चाचणी करण्याची विनंती करते, असे तिने म्हटले. अगदी या चारही स्टार्सची नावे घेत, कंगनाने त्यांना खुले आव्हान दिले. तुम्ही कोकेन घेता, अशी अफवा आहे. या अफवांना पूर्णविराम देण्यासाठी रणबीर, रणवीर, अयान व विकी यांना ब्लड टेस्ट करावी, असे मला वाटते. टेस्टमध्ये काहीही मिळाले नाही तर हे लोक कोट्यवधी लोकांसाठी प्रेरणा ठरू शकतात, असे ट्विट कंगनाने केले आहे.
               कोणत्याही फिल्मी कलाकाराला राष्ट्रीय पुरस्कार देण्यापूर्वी त्याची रक्तचाचणी बंधनकारक करा, अशी मागणी यापूर्वी कंगनाने केली होती. बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये सर्रास ड्रग्ज घेतले जाते. पाण्यासारखे ड्रग्ज वाहते, असे कंगना अलीकडे एका मुलाखतीत म्हणाली होती. काही माझ्या वयाचे युवा  वैयक्तिकरित्या ड्रग्ज घेतात आणि शो करतात. या कलाकारांबद्दल ब्लाइंड आयटमदेखील लिहिले गेले होते. डीलर सारखे असतात. सर्व काही एक प्रकारे हाताळले जाते. त्यांच्या पत्नीदेखील अशा पार्टी आयोजित करतात़ तिथे पूर्णपणे वेगळे वातावरण असते. तिथे असे लोक भेटतात जे फक्त ड्रग्स घेतात आणि दुस-यांसोबत दुर्व्यवहार करतात. काही सरकारांनी या बॉलिवूडच्या ड्रग्ज माफियांना पुढे जाण्यासाठी सहकार्य केले. बॉलिवूड आणि ड्रग्ज माफियांमध्ये रिलेशन आहे. ते एकमेकांना ओळखतात. बॉलिवूडचे अनेक कलाकार बालपणापासून ड्रग्जच्या आहारी गेलेले आहेत. तूर्तास कंगनाने घेतलेल्या बोल्ड भूमिकेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कंगनाच्या ट्विटवर कमेंट करताना अनेकांनी तिच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे.

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. कंगनाचा गेल्या दोन महिन्यांपासून सारखा ट्विटरवर टिवटिवाट सुरु आहे. तिने आरक्षणाच्या मुद्द्यावरही कोणताच अभ्यास नसतांना बडबड केली होती. कंगना ट्विटरवर म्हणाली की, आधुनिक भारतीयांच्या वतीने या देशातील जातीव्यवस्था अस्विकृत करण्यात आली आहे. छोट्या शहरांतसुद्धा कायद्याने ही व्यवस्था अमान्य केली आहे. परंतु काही लोकांना दुसऱ्यांना दुःख देऊन स्वत: खुश राहण्यापेक्षा ही बाब फार मोठी नाही. फक्त आपल्या संविधानानेच आरक्षणाच्या मुद्द्याला पकडून ठेवले आहे. हे संपले पाहिजे. या विषयावर चर्चा झाली पाहिजे. यावर कंगनाला देशद्रोही ठरवत अखिल भारतीय भीमसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतपाल तंवर यांनी गुरुग्राम सेक्टर ३७ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. 

             कंगना राणौत गेल्या शंभर तासांहून अधिक काळापासून ड्रग माफियांची पोलखोल करण्यास तयार आहे. मात्र, तिला पोलीस सुरक्षेची गरज असल्याचे सांगत महाराष्ट्र सरकार ते पुरवत नसल्याचे ट्विट राम कदम यांनी केले होते. यावर कंगनाने मुव्ही माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटत आहे. मुंबईमध्ये मला हिमाचल प्रदेश सरकार किंवा केंद्र सरकारची सुरक्षा हवी, मुंबई पोलिसांची नको, असे उत्तर दिले आहे. महत्वाचे म्हणजे एखाद्या मुलानं एखाद्या मुलीला प्रपोज केलं असेल, मात्र तिचा नकार असेल, तर त्यानं त्याच्या आई-वडिलांना घेऊन माझ्याकडे यावं. त्या मुलाच्या पालकांना मुलगी पसंत असल्यास त्या मुलीला पळवून आणण्यात मी मदत करेन. हे चुकीचं असेल तरी मी तुम्हाला शंभर टक्के मदत करेन असं वादग्रस्त विधान करणाऱ्या आणि मागाहून तमाम महिलांची,  मुलींची माफी मागणाऱ्या राम कदमांनी  याचे समर्थनही केले आहे. मात्र तिच्या या वादग्रस्त ट्विटवर नेटकऱ्यानी खरपूस समाचार घेतला आहे. फुकटच्या प्रसिद्धीसाठी काहीही बरगळू नकोस, मुंबई पोलिसांवर विश्वास नसेल तर मुंबईत महाराष्ट्रात राहू नकोस, येथून निघून जा, चालती हो! असा सल्ला देत तिचा निषेध केला आहे.

बॉलीवूड माफिया, ड्रग्ज आणि सुरक्षेच्या मुद्यावरून अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्यात सध्या चांगलीच जुंपली आहे. राऊत यांनी आपणास धमकी दिल्याचा आरोप करून कंगनाने खळबळ उडवून दिली. तर, तुझ्याकडे पुरावे असतील तर पोलिसांकडे जा, उगीच टिवटिव करू नकोस, अशा शब्दांत खा. राऊत यांनी कंगनाला फटकारले. मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटत असल्याचे सांगत केंद्र सरकार अथवा हिमाचल प्रदेशच्या पोलिसांची सुरक्षा हवी असल्याचे कंगनाने म्हटले होते. कंगनाच्या या ट्विटनंतर राऊतांनी तिला धारेवर धरले होते. मुंबईत राहून मुंबई पोलिसांवर आरोप करणे लाजिरवाणे आहे, असे सांगतानाच कंगनाला भीती वाटत असेल तर तिने मुंबईत परत येऊ नये, असा सल्ला राऊत यांनी दिला होता. संजय राऊत यांनी आपल्याला धमकी दिल्याचा दावादेखील तिनं केला आहे. ‘मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्यास पुन्हा शहरात येऊ नकोस, असं म्हणत मला राऊत यांनी धमकी दिली. आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यामुळे मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?,’ असा सवाल कंगनानं ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला होता.  
मुंबई पोलिसांवर अविश्वास तुम्ही दाखवताय. कोणाला इतर राज्याची सुरक्षा हवी असेल तर त्यांनी आपलं चंबू गबाळ आवरावे आपल्या राज्यात जावं. हा काय तमाशा चाललंय, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. राज्याच्या गृहमंत्र्यांनी यावर तातडीने उत्तर दिलं पाहिजे, मग ते कोणीही असेल. या राज्यावर, पोलिसांवर विश्वास नाही. तुम्ही इकडे मीठ खाताय, ही तर बेईमानी आहे. अशा व्यक्तींच्या मागे राजकीय पक्ष उभे राहत असतील तर हीसुद्धा मोठी बेईमानी आहे, असं संजय राऊत यांनी सांगितले होते.

”मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?” बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिच्या विधानावरून सोशल मीडियावर #आमचीमुंबई हा ट्रेंड सुरू झाला आहे. या विधानावरून कंगनाला ट्रोल केले जाऊ लागले असून मराठी चित्रपट सृष्टीतील काही स्टार्सनी प्रत्यक्ष, तर काहींनी अप्रत्यक्षपणे कंगनाला खडेबोल सुनावले आहे. बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिनंही त्या विधानाचा जाहीर निषेध करताना कंगनाला कृतघ्न म्हटले. उर्मिला मातोंडकरनं ट्विट केलं की,”महाराष्ट्र हा भारताचा सांस्कृतिक आणि बौद्धिक चेहरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी आहे. मुंबईनं कोट्यवधी भारतीयांना नाव, प्रसिद्धी मिळवून दिली. केवळ कृतघ्न लोकंच मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करू शकतात… हे धक्कादायक आहे. याच विषयावर सुप्रसिद्ध मराठी अभिनेते सुबोध भावे यांनी कंगनाला फटकारले आहे. ताई आपल्याला जे राजकारण करायचं असेल ते आपल्या गावाला जाऊन जरूर करा.जिथे तुम्हाला काम मिळालं, ओळख मिळाली त्या शहराचा आणि राज्याचा मान ठेवा. आमचं प्रेम आहे आणि आम्हाला अभिमान आहे मुंबईचा!,” अशा शब्दांत भावेनं तिला खडेबोल सुनावले. स्वप्नील जोशी यानेही ट्विट करत, अप्रत्यक्षपणं कंगनाच्या विधानावर नाराजी प्रकट केली. 

कंगना आणि राउतांच्या वादात आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्ता प्रीती शर्मा मेनन यांनीही उडी घेतली आहे. त्यांनीही एक ट्विट करत, “राजकीय अजेंड्यालाही एक मर्यादा असते. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या हृदयाचा अपमान कसा करू शकता? ज्या मुंबईत स्वतःच करियर बनवलं त्या मुंबईलाच पाकिस्तान म्हणताना तुला लाज कशी नाही वाटली?”, असे म्हटले आहे. शिवसेना नेत्यानं पुन्हा एकदा निंदनीय विधान केलं आहे. महाविकास आघाडीनं मुंबई पोलिसांवर स्वतःच्या स्वार्थासाठी दबाव आणला आहे. जेणेकरून सुशांतला न्याय मिळू नये. त्यांचा उद्देशच बॉलिवूड ड्रग माफियांना संरक्षण देण्याचा आहे, असा आरोप राम कदम यांनी केला आहे. तसेच कंगना राणौत झाशीची राणी आहे. जी या धमक्यांना घाबरत नाही,’ असं देखील राम कदम यांनी सांगितले.

माजी खासदार निलेश राणे यांनी एक शहाणपणाची गोष्ट केली आहे. राणे यांनी तिला कडक शब्दात सुनावलं आहे. आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही असं निलेश राणेंनी म्हटलं आहे. याबाबत निलेश राणेंनी ट्विट करत म्हटलं आहे की, दोन तृतीयांश अधिकारी प्रेशरमध्ये आले म्हणजे संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट दोषी होत नाही. आम्हाला महाराष्ट्र पोलिसांवर अभिमान आहे. मुंबई पोलिसांवर बोलण्या इतकी राणौत कोण लागून गेली?? SSR आणि सालियान प्रकरणात खरे आरोपी पकडण्याच्या समर्थनात आम्ही आहोत पण आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. परंतु ड्रग्ज प्रकरणातून त्यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 

दंगल गर्ल बबिता फोगाट हिला आता कोणत्याही प्रकरणात नाक खुपसायची सवयच झाली आहे.  भाजपाची सदस्य बबिता फोगाटनंही या टिवटिवात उडी मारली आहे. तिनं ट्विट करून शिवसेनेवर टीका केली. तिनं लिहिलं की,”कंगना राणौत ही हिंदुस्तानची कन्या आहे, मुंबईत येण्यापासून तिला रोखण्याची कुणाची हिंम्मत नाही. संजय राऊतांनी असं बोलून शिवसेनेचा खरं रुप दाखवलं. बॉलिवूडमधील घाण साफ करण्याची गरज आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण ज्या पद्धतीने हाताळलं जात आहे, त्यावरून मुंबईने माणुसकीच गमावलीय असं वाटतं असल्याचं म्हटलं होतं. “सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा ज्या तऱ्हेने तपास सुरू आहे, त्यावरून मुंबईने माणुसकी गमावलीय असं मला वाटत आहे. निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित नाही” असं अमृता फडणवीस यांनी ट्विट करुन म्हटलं होतं.

        फेसबुक आणि ट्विटसारख्या समाजमाध्यमांवर कोणताही अभ्यास नसलेल्या आणि वाचाळ लोकांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. ते सहसा बिनडोकच असतात. काहीही बरळत राहतात. कोणत्याही मुद्यावर शहाणपणा पाजळायची कंगनाला आता सवयच झाली आहे. हे एकदिवस तिच्या अंगलट येऊ शकते. तिला आवरले पाहिजे. सोशल मीडियावरुन दंगल भडकल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे या वाचाळविरांनी स्वत:च विचार करायला हवा. ते स्वत: ट्रोल होतातच पण ते इतके निर्लज्ज असतात की, पुन्हा बरळायचे सोडत नाहीत. कोणत्याही ट्रेंड चालवला तर तो कालीक असतो. पुन्हा त्याची चर्चा पण होत नाही. जे व्हायचे ते पुन्हा पुन्हा होतच राहते. व्यवस्थेत बदल घडवून आणण्यासाठी सोशल मिडियाचा वापर जरुर करावा परंतु तो लोकचळवळीच्या दृष्टीने झाला पाहिजे. अन्यथा वाचाळपणाने सामाजिक स्वास्थ्य बिघडते आणि त्यामुळेच असामाजिक तत्वांचा वावर वाढू लागतो. माध्यमांवर व्यक्त होतांना काही बाबींचे भान असणे आवश्यक आहे.

 

Gangadhar DHAVALE
Gangadhar DHAVALE

गंगाधर ढवळे,नांदेड 

संपादकीय    / ०४.०९.२०२०.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *