कंधार: ( विश्वंभर बसवंते )
कंधार तालुक्यातील नंदनवन या छोट्याशा गावी लहान भावाला किडनीचा आजार जडल्यामुळे मोठ्या भावाने कुठलाही विचार न करता स्वतःची किडनी दान करून आपल्या भावाला जीवदान दिले. त्यामुळे या भावंडाचे बंधुप्रेम पाहून सर्वत्र कौतुक होत आहे.
दोन्ही किडन्या निकामी झाल्याने दुःख वेदना अंगावर घेत मरण यातना भोगत असलेला आपला लहान भाऊ हा मृत्यूच्या दाढेतून सही सलामत बाहेर काढण्यासाठी मोठ्या भावाच्या पुढाकाराने स्वतःची किडनी दान करीत लहानाच्या आयुष्यात जगण्याचा नवांकुर पेरला.
त्यामुळे मोठ्या भावाच्या मोठ्या मनाने राम लक्ष्मणाचं नातं आणखीन मजबूत झालेलं या भावाच्या बंधुप्रेमातून दिसून येत आहे.
भावा भावाचे नाते राम लक्ष्मणासारखे असते, ते जीवनभर एकमेकांना साथ देत सोबत राहायचे असते. कारण दोघांपैकी एकावर जरी संकट आले तरी एकमेकांच्या मदतीला धावून जायचे असते. अशाच दोन भावातील बंधू प्रेमाचा घट्ट धागा कंधार तालुक्यातील नंदनवन या गावात दिसून आला आहे. आपल्या भावावर “किडनी” आजार जडल्याने “किडनी” प्रत्यारोपणाची आवश्यकता निर्माण झाली. आणि कुठलाही विचार न करता मोठा असलेला भाऊ आपल्या लहान भावासाठी किडनी दान केली.
नंदनवन येथील गरीब कुटुंबात राहणाऱ्या विलास हुंबाड या ३७ वर्षीय तरुणाला आजाराने ग्रासले. मात्र काही दिवसातच आजाराने गंभीर रूप धारण केले. विलासला उपचारासाठी नांदेड येथील क्लोबल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. संबंधित डॉक्टरांनी एकत्रित “किडनी” निकामी झाल्याचे सांगून तात्काळ “किडनी”प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे, त्यासाठी साधारण १५ ते २० लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले.
वास्तविक पाहता विलास च्या घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे एवढा खर्च त्यांना परवडणारा नव्हता. मग एवढी रक्कम आणायची कुठून असा मोठा प्रश्न त्यांच्या कुटुंबासमोर उभा राहिला. विलास पेक्षा मोठा असलेला भाऊ कुठलाही क्षणाचा विचार न करता मी माझ्या भावाला वाचविण्यासाठी एक किडनी देणार असल्याचे ठरवले आणि नांदेड येथील नामांकित ग्लोबल हॉस्पिटल मध्ये किडनी प्रत्यारोपण करण्याचे ठरवले. डॉक्टरांनी सर्व आवश्यक त्या तपासण्या करून “किडनी” प्रत्यारोपणास सुरुवात केली. आणि प्रत्यारोपण यशस्वी झाले. सदरचे “किडनी”प्रत्यारोपण डॉ. विजय मैदपवाड व डाँ. राजीव राठोड त्यांच्या टीमने यशस्वीरित्या पूर्ण केले. आता दोन्ही भावांची प्रकृती चांगली आहे. भावाने भावाला “किडनी”दान देऊन भावाला पुनर्जीवन दिल्यामुळे अशा या बंधु प्रेमाचं सर्व स्तरातून कौतुक होत असल्याचे ऐकावयास मिळत आहे.
————
प्रतिक्रिया
जन्माला आलेला प्रत्येक माणूस एक ना एक दिवस मरणारच आहे. त्यामुळे त्याचा फार काय विचार करू नका. माणसाने नाती जपली पाहिजेत शेवटपर्यंत नातीच कामाला येतात. माझ्या भावाला मी किडनी देऊन जीवदान दिले हे माझं कर्तव्य आहे, असं मी समजतो प्रत्येक भावानेही भाऊबंधकीचं नातं जपलं पाहिजे.
कैलास पा. हुंबाड अवयव दाते
नंदनवन
————-