कंधार: ( विश्वंभर बसवंते )
भारतीय संस्कृतीमधील धार्मिक सण उत्सवातील ” रक्षाबंधन”हा एक महत्त्वाचा सण होय. “भारतीय सैनिक”हा आपल्या कुटुंबापासून कोसो दूर राहून दिवस-रात्र डोळ्यात तेल घालून भारत मातेसह आपल्या सर्वांचे रक्षण करत असतो. अशा या आपल्या लाडक्या रक्षण करत्या भावाला “सुंदर अक्षर कार्यशाळा कंधारच्या”माध्यमातून मन्याड खोऱ्यातील शालेय चिमुकल्या बहिणींनी ३३३३ राख्या,व ३३३३ शुभेच्छा संदेश पत्रासह एक १५ फुटी महाराखी भारतीय सीमेवर कार्यरत असलेल्या सैनिकाकडे मान्यवरांच्या उपस्थितीत रवाना करण्यात आल्या आहेत.
दि.१७ ऑगस्ट २०२३ रोजी पोलीस स्टेशन कंधार येथे शासकीय बांधकाम ठेकेदार वैजनाथ सादलापूरे यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड, कारगिल युद्धात मोलाची कामगिरी बजावणारे कॅप्टन प्रकाश कस्तुरे,कॅप्टन कपाळे, प्रजापिता ज्योती बहेनजी, प्रा.डॉ.गंगाधर तोगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत “सुंदर अक्षर कार्यशाळा कंधारचे संचालक दत्तात्रय एमेकर यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून गेल्या १० वर्षापासून राबविण्यात येणाऱ्या ३३३३ राख्या, १ महाराखी व ३३३३ शुभेच्छापत्र, भारतीय सैनिकांना पाठवणे या कार्यक्रमाचे विमोचन करण्यात आले होते.
“सुंदर अक्षर कार्यशाळेचे संचालक दत्तात्रय एमेकर यांच्या माध्यमातून गत १० वर्षापासून अविरतपणे “भारतीय सीमेवरील कार्यरत सैनिक बांधवांना” शालेय चिमुकल्या बहिणींच्या हस्तक्षरातून ३३३३ शुभेच्छापत्र व ३३३३ राख्या,पाठवणे हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे. पाठविण्यात आलेल्या राख्या या “राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला” भारतीय सीमेवरील सैनिक बांधवांपर्यंत पोहोचत असतात.आणि या राख्यांचा भारतीय सैनिक मोठ्या उत्साहाने स्वीकार करून, आपल्या चिमुकल्या बहिणीकडून पाठविण्यात आलेल्या शुभेच्छा पत्रावरील लिहिलेल्या भ्रमणध्वनीवर प्रत्यक्ष फोन करून, राखी पोहोचण्याचा आनंद व्यक्त करत आपल्या चिमुकल्या बहिणीला शुभेच्छा देत असतात. ही एक कौतुकास्पद बाब आहे.
भारतीय सैनिकांना ३३३३+ राख्या, ३३३३ छापील शुभेच्छा संदेश पत्र व एक १५ फूट लांबीची महाराखी पाठवण्यासाठी लागणारा खर्च डॉ. सौ. अर्चना जाधव,डॉ. सौ.वसुधा आंबेकर, प्रा.संजीव मेहेत्रे, वैजनाथ सादलापुरे यांच्या आर्थिक सहकार्यातून केला जातो, असे दिव्यांग असणारे हरहुन्नरी कलावंत, सुंदर अक्षर शाळेचे संचालक दत्तात्रय एमेकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून व्यक्त केले. सदर कार्यक्रमासाठी पोलीस उपनिरीक्षक मुखेडकर, माजी सैनिक संघटनेचे अर्जुन कांबळे, पंदीलवाड,नवघरे, सामाजिक कार्यकर्ते अड, गंगाप्रसाद यन्नावार,मुख्याध्यापक हरिभाऊ चिवडे, संजय वाघलगावे, राजहंस शहापुरे, ज्येष्ठ नागरिक नारायणराव पटणे, अड.सागर डोंग्रजकर,पत्रकार माधव भालेराव, राजेश्वर कांबळे, मोहम्मद सिकंदर, विश्वंभर बसवंते, मुनीर शेख, शंकर ढगे, यांच्यासह कंधार पोलीस ठाण्यातील कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.गंगाधर तोगरे यांनी केले.तर सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार पत्रकार दिगंबर वाघमारे यांनी मानले.