कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणार्‍या मंदिरांतील चोर्‍या कधी थांबणार ?

 

मंदिरांतील चोर्‍या रोखण्यासाठी मंदिर व्यवस्थापनाने पुढाकार घ्यावा !
– ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची मागणी

महाराष्ट्रातील लहान मंदिरेच नव्हे, तर अनेक मोठ्या मंदिरांमध्ये वारंवार चोर्‍या होण्याच्या घटना सतत घडत आहेत. आता तर ‘सीसीटीव्ही’ लावलेल्या आणि अनेक सुरक्षा रक्षक असलेल्या मंदिरांमध्येही चोर्‍या होण्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनावर अवलंबून न रहाता आता मंदिर व्यवस्थापनाने देवनिधीचे रक्षण करण्यासाठी सक्षम सुरक्षा व्यवस्था उभी करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे मत ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी व्यक्त केले.

 

नुकतेच नगर जिल्ह्यातील (शेवगाव, अमरपूर) येथील श्री रेणुकामाता मंदिरातील देवीच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने असा मोठा ऐवज चोरीला गेला आहे. याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा आणि पाच सुरक्षा रक्षक तैनात होते. तरीही चोरी कशी झाली ? हा प्रश्न निर्माण होतो. एकूणच सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींचा अभ्यास करून चोर्‍या केल्या जात आहेत. श्री रेणुकामाता मंदिरच नव्हे, मागील महिन्यात डोंबिवलीतील श्रीराम मंदिरातही सीसीटीव्ही असतांनाही चोरी झाली. त्यामुळे मंदिर व्यवस्थापनाने केवळ सुरक्षा रक्षक वा सीसीटीव्ही कॅमेरे लावले म्हणजे आता चोर्‍या होणार नाहीत, या भ्रमात राहू नये. कधी मशीद, चर्च, गुरुद्वारा वा अन्य धर्मीय प्रार्थनास्थळांमध्ये चोर्‍या झाल्याच्या बातम्या कधी ऐकायला येत नाहीत; मग केवळ हिंदूंच्या मंदिरांमध्येच चोर्‍या का होतात ? देवनिधी सुरक्षित ठेवणे, हे मंदिर व्यवस्थापनाचे आणि भक्तांचेही कर्तव्य आहे. हिंदु समाजाने मंदिरांतील चोर्‍यांविषयी सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे. तसेच महाराष्ट्र शासनानेही मंदिरातील चोर्‍यांच्या संदर्भात एक धोरण आखून या चोर्‍यांना प्रतिबंध केला पाहिजे, असेही श्री. घनवट यांनी म्हटले आहे.

 

 

 

आपला नम्र,
*श्री. सुनील घनवट,*
राज्य समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ.
संपर्क : 70203 83264

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *