मुखेड – आज आपण विज्ञानाद्वारे खूप प्रगती केली आहे व करतही आहोत. पण आरोग्याच्या समस्या काही संपत नाहीत उलट वाढताना दिसत आहेत. खरे तर ईश्वराने प्रत्येक रोगाशी फाईट करण्याची ताकद आपल्या शरीरातच निर्माण करून ठेवली आहे पण निसर्गाने दिलेले नियम आपण पाळले पाहिजेत. झोपेच्या वेळा पाळल्या पाहिजेत. आपले जीन ट्रेंड करण्यासाठी सात मार्ग सांगितले आहेत त्यात आपले विचार,अन्नधान्याचे सेवन, पर्यावरणाचा परिणाम,आपली जीवन पद्धती याचा परिणाम होतो. मला वाटेल तसे वागेन असे वागून चालणार नाही. निसर्ग नियम पाळावे लागतील. आपले वागणे असे असावे की त्यापासून इतरांना आनंद प्राप्त व्हावा, अहंकार वाढला आहे त्याला बाजूला ठेवा व मी ऐवजी आम्हीचा स्वीकार करा.आपली संगत आपल्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम करते. आपले भविष्य आपल्या हातात आहे.जीभेने गोड कमी खा पण गोड बोलण्यासाठी त्याचा वापर करा. आपल्याकडे असलेले अवगुण काढून टाकले पाहिजेत. आपल्याकडे सुप्रीम काॅन्सेसनेस,सकारात्मक दृष्टी, अंतकरण पूर्वक कार्य करणे, नैतिक विचार,आत्मनिरीक्षणाची वृत्ती या व यासारख्या गोष्टी जाणीवपूर्वक रूजविल्या तर निश्चितपणे त्याचा फायदा होतो आपण जसे विचार करतो तसा परिणाम आपल्या शरीरावर होतो असे प्रतिपादन चन्ना बसवेश्वर फार्मसी महाविद्यालय लातूर येथील प्रोफे. ओमप्रकाश भुसनुरे यांनी ग्रामीण ( कला,वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय वसंतनगर ता.मुखेड येथिल रसायनशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रम प्रसंगी ‘एपीजेनेटिक घटकांद्वारे पिढ्यान पिढ्यापर्यंत जीवनमानाच्या गुणवत्तेसाठी जनुक प्रशिक्षित करा’या विषयावर बोलताना केले.
अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिदास राठोड म्हणाले की आज रसायनशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन झाले आहे. त्याद्वारे या मंडळाने विविध उपक्रम घ्यावेत. तसेच चन्ना बसवेश्वर येथे उत्कृष्ट लॅब आहे तिला भेट देण्यासाठी सहल काढावी.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक या विभागात कार्यरत प्रा.डाॅ. संजीव रेड्डी यांनी करून कार्यक्रम आयोजना पाठीमागची भूमिका विशद केली.
सूत्रसंचलन प्रा.डाॅ.व्यंकट चव्हाण यांनी केले तर आभार या विभागाच्या प्रमुख प्रा.सौ.अरूणा ईटकापल्ले यांनी मानले.
सुरुवातीला या अभ्यास मंडळाच्या फलकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या अभ्यास मंडळात अध्यक्ष म्हणून श्रीरामे राजू,सचिव चव्हाण वसंत, उपाध्यक्ष कु.चाबरे शालिनी,कोषाध्यक्ष मस्कले दीपक, सदस्य डोंगरे गुंडेराव,कु.गाढवे शुभांगी, जायभाये ऋषिकेश, राठोड अमोल, कु.केंद्रे कांचन, कुद्रे पवन, हे कार्य करणार आहेत. त्यांचा पुष्पहार देऊन सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमास उपप्राचार्य अरूणकुमार थोरवे,माजी प्राचार्य डॉ.देविदास केंद्रे, डॉ. रामकृष्ण बदने,प्रा.डी.सी.पवार सर्व प्राध्यापक व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.