रक्षाबंधन म्हणजे जबाबदारीचे बंधन

 

रक्षाबंधन म्हणजे जबाबदारीची जाणीव करून देणे होय,
रक्षाबंधन हा उत्सव आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे आणि प्रत्येक भारतीयाला या सणाचा अभिमान आहे. ही अतिशय लज्जास्पद गोष्ट आहे की ज्या देशात स्त्रीला देवीसमान मानले जाते तेथे स्त्री-भ्रूणहत्येची प्रकरणे होतात. अत्याचार होतात,विनयभंग होतात. हा सण आपल्याला बहिणींचे आपल्या जीवनात किती महत्त्व आहे याची जाणीव करून देतो. म्हणूनच या उदात्त आणि पवित्र सणाचे रक्षण करून नैतिक भावनेने आपण त्याला आनंदात साजरा केला पाहिजे.
रक्षाबंधांचा सण श्रावण पौर्णिमेला म्हणजेच इंग्रजी दिनदर्शकेप्रमाणे ऑगस्ट महिन्यात साजरा केला जातो, समाजामध्ये लहानापासून ते मोठ्यांपर्यंत रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो.रक्षाबंधन च्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि त्याचे ओक्षण करते,भाऊ बाह्य शत्रूपासून व अंतविकारापासून सुरक्षित राहो आणि त्याला दीर्घ आयुष्य लाभो अशी प्रार्थना बहीण या दिवशी करते. समाजात आपली बहीण ताठ मानेने वागावी म्हणून तिच्या संरक्षणाची जबादारी भाऊ घेतो. या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग होय.जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असते. भारतीय संस्कृतीतील पूर्वजांनी या नात्यातील निस्पृहता आणि पवित्रतेचा महिमा गायला आहे. भारतीय संस्कृती मानव जीवनाच्या महानतेचे दर्शन घडविणारी संस्कृती आहे. स्त्रीला भोगवस्तू न समजता तिची पूजा करणारी आपली भारतीय संस्कृती आहे.
स्त्री समानतेची पोकळ भाषा बोलणार्‍या सुधारकांना किंवा पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करणार्‍यांना नम्रतापूर्वक सांगितले पाहिजे, की भारतीय संस्कृतीने स्त्रीची पूजा केली आहे.
जिथे स्त्रियांची पूजा, तिचा सम्मान केला जातो तिथे पावित्र्याचा वास असतो. स्त्रीकडे आई-बहिणीच्या भावनेतून पाहण्याचा संदेश देणारा हा सण आहे.
मात्र आज तिची मस्करी करणार्‍या आणि जनावरांप्रमाणे वागणूक देणार्‍या भावांना समजावून सांगण्याची गरज आहे.
बहिण भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. त्याचे विचार आणि बुद्धीवरील विश्वासाचे दर्शन आहे. भावाच्या कपाळावर टिळा लावताना सामान्य वाटणार्‍या या क्रियेत दृष्टी परिवर्तनाच्या महान प्रक्रियेचा समावेश आहे. सामान्य दृष्टीने जगाकडे पाहणार्‍या नजरेशिवाय भावनात्मक दृष्टीने जगाकडे पाहण्यासाठी एक पवित्र तिसरा डोळा बहिणी आपल्या भावाला देऊन त्रिलोचन बनविते, असा संकेत या क्रियेमध्ये दिसून येतो.
भगवान शंकराने तिसरा डोळा उघडून मदनाला भस्म केले होते. त्याप्रमाणे तिसर्‍या डोळ्याच्या रूपात बहिण भावाला आजार, वासना इत्यादी भस्म करण्याची सूचना करते.
बहिण भावाच्या हातावर राखी बांधून केवळ आपले संरक्षण मागत नाही, तर सर्व स्त्री जातीच्या संरक्षणाची मनोकामना ठेवते, तसेच बाह्य शत्रूपासून आणि अंतर्विकारांपासून आपला भाऊ विजय प्राप्त करो किंवा सुरक्षित राहो ही भावना पण त्यात असते.
रक्षाबंधन हे सुरक्षिततेचे स्मारक आहे. राखी बांधल्याने एक बंधन आपल्यावर असते. हे बंधन असते ध्येयच्युत न होण्याचे. या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्याची आठवण राखी देते. राखी बांधताना बहिण भावाचे बंधन किंवा ध्येयाचे रक्षण करण्याची सूचना करते.
असा महान संदेश देणार्‍या या भारतीय संस्कृतीच्या सर्वश्रेष्ठ सणाला आपण कुटुंबापुरतेच मर्यादित ठेवले आहे. समाजात स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची आवश्यकता आहे.
बहिणीने भावाला राखी बांधल्यास त्यामध्ये शील रक्षणाची जबाबदारी येते. रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या शुद्ध प्रेमाचा वाहता निर्झर! भाऊ आणि बहिण परस्पर प्रेरक, पोषक आणि पूरक आहेत हा संदेश देणारा हा उत्सव भारतीय संस्कृतीची अमूल्य देन आहे.

सौ.रूचिरा बेटकर, नांदेड.
9970774211

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *