नांदेड : मराठवाडा मुक्ती संग्रामाचे हे चालू वर्ष अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. तर येत्या 17 सप्टेंबरला या वर्षाची समाप्ती होत असतांना जिल्हयातील हुतात्मा स्मारके यांची दुरुस्ती किंवा सुशोभीकरण अद्याप करण्यात आलेले नाही. तर मराठवाडा मुक्ती संग्राम लढयातील पहिले हुतात्मा गोविंदरावजी पानसरे यांच्या समाधी स्मारकाच्या ठिकाणी देखील अद्याप कुठलेही काम झाले नाही. ते चारही बाजूने मोकळे, गेट नाही, लाईट नाही, स्वच्छता नाही, पाणी साचून घाण निर्माण झाली आहे, यासह जिल्हयातील सर्वच स्मारकांची दुरुस्ती झालेली नाही, सर्वच स्मारकांची तातडीने 17 सप्टेंबर पुर्वी दुरुस्तीसह, रंगरंगोटी करुन जिल्हयात स्वतंत्र सैनिकांच्या सन्मानार्थ कार्यक्रम घेऊन हे वर्ष साजरे करण्यात यावे अशी मागणी स्वातंत्र्य सैनिक शेषेराव पाटील सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी केदार पाटील साळुंके यांनी शासनासह निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केलेले आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील मराठवाडा हा निझाम सरकारच्या ताब्यात होता. त्यांच्या ताब्यातून मुक्त होण्यासाठी मराठवाडयात अनेक चळवळी, लढे लढले गेले आणि 17 सप्टेंबर 1948 ला मराठवाडा निझामाच्या तावडीतून मुक्त झाला. तो लढा मराठवाडा मुक्ती संग्राम लढा म्हणून समजला जातो. तो या वर्षी अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरा करण्यासाठी शासनाने विविध उपक्रम राबविण्यासाठी निधीही उपलब्ध करुन दिलेला आहे. मात्र प्रत्यक्षात 17 सप्टेंबरला काही दिवसच उरलेले असतांना जिल्ह्यात 16 हुतात्मा स्मारके असून अनेक ठिकाणी लढे लढले गेले तर जिल्हयात अनेक गांवात लढयात सहभागी स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले. अशा हुतात्मा झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारके स्वातंत्र्य सैनिकांची गावे या ठिकाणी दुरुस्ती, रंगरंगोटीसह, स्वच्छता कार्यक्रम राबवणे आवश्यक असतांना अद्याप कुठेही राबविलेले दिसून येत नाही. तर लढयातील पहिले हुतात्मा गोविंदरावजी पानसरे यांचे समाधीस्थळ स्मारक हे देखिल मोकळेच आहे. यासह जिल्हयातील सर्वच स्मारकांचा विकास तातडीने 17 सप्टेंबर पुर्वी करुन स्वतंत्र सैनिकांच्या गावात देखील रंगरंगोटी, वृक्षारोपन, स्वच्छता करण्यात यावी. तर स्वातंत्र्य सैनिकांच्या गावात शासनाने स्वातंत्र्य सैनिकांच्या नावाचे स्मरण फलक उभारावेत. तर स्वातंत्र्य सैनिक पाल्य यांचा जिल्हास्तरावर सन्मान करण्यात यावा. यासह अन्य विकास कामे राबवून मराठवाडा अमृत महोत्सवी वर्ष साजरे करुन लढयातील स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाव्दारे शासनास व निवासी जिल्हाधिकारी यांना केदार पाटील साळुंके यांनी केलेले आहे.