जिवंतपणी विधवांना मरण यातना …! (विचारपीठ )

आजही आधुनिक युगात म्हणजेच 21 व्या शतकात विधवा झालेल्या महिलांना इतर महिलांपेक्षा वेगळी वागणूक दिली जाते; सर्वजणच त्या महिलेकडे संशयवृत्तीने पाहताना दिसतात. विवाह होऊन काही वर्षातच पती अपघातामुळे, जर्जर रोगामुळे, अकस्मात कारणामुळे स्वतःच्या चुकीमुळे मरण पावतात. त्याचा सर्व दोष पत्नीवर येऊन पडतो. तेव्हा सासरी त्या महिलेला जगणे अवघड होऊन बसते. कारण जीवाचा सखा निघून गेल्यावर त्यांच्या नातेवाईका कडून बऱ्याच ठिकाणी आपुलकी दाखविली जात नाही, असे का होते? चूक कोणाची झाली; यावर समाज विचार करत नाही? समस्येच्या मुळाशी जात नाही? तिच्यावर अनेक बंधने लादल्याने तिला मरण यातना सोसाव्या लागतात. त्यातून ती मुक्त व्हावी त्यासाठीच हा लेखन प्रपंच……….. पद्मश्री, दलितमित्र यासारखे पुरस्कार मिळालेल्या थोर समाजसेविका अनुताई वाघ यांचा विवाह झाल्यानंतर त्यांच्या पतीचे अवघ्या सहा महिन्यातच निधन झाले, नियतीने कुंकू पुसून टाकलं, भातुकळीचा खेळ मोडला.
अनुताई वाघ विधवा झाल्या असल्या तरीही त्या फार जिद्दीने उभ्या राहिल्या, बाहेरून अभ्यास करून पदवी मिळवली, आदिवासींच्या घरोघरी ज्ञानगंगा नेण्याचे व्रत्त स्वीकारलं
रानावनात भटकणाऱ्या आदिवासींना व्यवहारिक शिक्षण दिलं.तसेच महाराणी ताराबाई यांनी छत्रपती राजाराम महाराज मरण पावल्यानंतर औरंगजेबाला सळो की पळो करून सोडले .शेवटपर्यंत त्यांच्या हाती त्या लागल्या नाहीत ? मी विधवा आहे म्हणून त्यांनी कोणतेही कारण दाखवलं नाही. स्वराज्यात त्यांनी स्वतः च्या हिमतीने, कर्तुत्वाने आपलं नाव इतिहासात झळकावलं. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे पती खंडेराय मरण पावल्यानंतर सुद्धा त्यांनी सासरे मल्हारराव यांच्याकडून लढाईचे शिक्षण शिकले ,आणि त्यात तरबेज झाल्या, पुढे राजमाता होण्याचं भाग्य त्यांना मिळालं; शेकडो मंदिरांचे जिर्णोद्धार केले, घाट बांधले,
लोकोपयोगी कामे केली, त्या ही विधवा होत्या, म्हणून विधवांना कमकुवत समजू नका त्या कोमल असल्या तरी भर भक्कम आहेत,
हे सर्वांनी लक्षात ठेवावं,
विधवांनी हळद कुंकू लावू नये, गजरा माळू नये, गळ्यात मंगळसूत्र घालू नये, हातात बांगड्या भरू नये, पायात जोडवे घालू नये,मंगल प्रसंगी कोणत्याही वस्तूला स्पर्श करू नये, असे सतत इतर बायका त्या विधवेला सांगून तिचे मनोबल, मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा सतत प्रयत्न करतात.
आचार संहिता, जैमिनीस्मृर्ती, ऋग्वेद, अथर्ववेद, कौटिल्याचेअर्थशास्त्र, प्राचीन ग्रंथामध्ये स्त्रियांना सन्मानाने वागवावे असे सांगितले आहे, वशिष्ठ स्मृती ,ज्ञानेश्वरी ,भगवतगीता, रामायण या धार्मिक ग्रंथाबरोबरच अनेक पुस्तकात स्त्रीला चांगली वागणूक दिली आहे तरी समाज विधवांना का समजून घेत नाही ?प्रत्येक विधवा महिला ही स्वतःच्या हिमतीवर, कर्तृत्वावर संसाराचा गाडा पुढे ओढत असते. त्यामुळे तिला स्त्री म्हणून जगू द्यावे; आवडेल तेथे प्रवास करू द्यावे,शिक्षण शिकलेल्या तरुण मुलीच्या आधुनिक काळातील महिलांना संस्कृतीच्या नावाखाली जखडून ठेवू नये. पूर्वीच्या काळातही सती जाणे, केशवपण या अनिष्ट प्रथा होत्या तेव्हा महर्षी कर्वे ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्या बंद पाडल्या ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवेशी विवाह करून एक क्रांतिकारी पाऊल उचलले, अनेक तरुण मुलीचे पती मरण पावले तेव्हा त्यांचे वय 22 ते 24 वर्ष असते या काळात समाजाशी एकरूप होणे म्हणावे तेवढे सोपे नाही, आम्ही लिहितो तुम्ही वाचन करता; पण प्रत्यक्ष मरण यातना त्या विधवेला जिवंतपणी भोगाव्या लागतात, विधवांच्या जीवनामध्ये हास्य व आनंदाचा सुरेख संगम जोडून राहिलेले उर्वरित आयुष्य मुलांसोबत व नातेवाईका सोबत घालवले पाहिजे, मकर संक्रात आली की विधवा महिलांची कुचंबना होऊन अपराधी भावना मनात निर्माण होतात, आणि जास्त अवघडल्यासारखे वाटते, समाजाकडून मुद्दाम बोलवले जात नाही त्यामुळे त्या महिला दु:खी होतात. मग त्या कोणालाही बोलत नाहीत असे न करता त्यांना कार्यक्रमात बोलावून घेऊन सन्मानित करावे व त्यांच्यात मनोधैर्य ,मनोबल निर्माण करावे. आपल्यामध्ये सामावून घ्यावे, दुर्दैवाने आजही असंख्य विधवा स्वतःला बिचाऱ्या, परिस्थितीला शरण जाणाऱ्या दिसतात कारण त्यांना त्यांच्यामध्ये असलेली ताकद कळत नाही, ती ताकद स्वतः आपणच मिळवायचे असते, पूज्य वामनराव पै म्हणतात, *तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार* अशा महिलांनी ताकदीने उभं राहावं, कुंकू पुसून गेलं असलं तरी त्यांची ताकद फार मोठी आहे. असंख्य स्त्रिया विधवा आहेत त्या शहरी असो की ग्रामीण असो, त्यांनी सतत स्वतःचं कर्तुत्व दाखवावे वेळ प्रसंगी दुर्गेचे रूपही धारण करावे तेव्हा समाजात त्यांना स्वाभिमानाने जगता येईल
कोरोना काळात ज्या महिला विधवा झाल्या त्यांचे दुःख समाज ऐकू शकत नाही. त्या प्रत्यक्ष भोगतात त्यांची जाणीव समाजाने ठेवावी या काळात हजारो पुरुष मरण पावले, त्यांच्यावर अवलंबून असलेल्या नातेवाईकांचे अक्षरशः बेहाल झाले त्याचा गांभीर्याने विचार करावा. कपाळावरच्या कुंकामध्ये काय आहे? बाह्य वस्तूला किंमत न देता मनातल्या भावना काय सांगतात? याचा विचार करावे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. मनातून परिवर्तन झालेले कधीही चांगले असते, हतबल झालेल्या निराश्रीत महिलांना समाजाने मायेची ऊब द्यावी, आपल्या समाजात अविवाहित, विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परितक्त्या महिला ,जीवन जगत असतात,पण समाज विधवा महिलांच्याच वाट्याला जात असतो त्यांना छळत असतो, त्यांचा पाठलाग करतो तसेच त्यांच्यासोबत गैरवर्तन करून त्यांच्यावर दबाव आणतो, असे प्रकार समाजाकडून होऊ नये. गावाला गेलेले (पती) मरण पावल्यानंतर घरी राहणाऱ्या महिलेचा काय दोष आहे? पांढ-या पायाची म्हणून हिणवले जाते, हे किती सत्य व योग्य आहे? आपण सर्वांनी ओळखून घ्यावे, त्यासाठी या विधवा महिलांच्या हाताने शुभ कार्य केले जावे,झेंडावंदन
वृक्षारोपण,बक्षीस वितरण भूमिपूजन, तसेच त्या सबला आहेत अबला नाहीत याची जाणीव करून द्यावी, महिला सामाजिक, शैक्षिणिक,राजकीय आध्यात्मिक सर्व क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महान कार्य करत आहेत, इस्त्रो मध्ये संशोधन करत आहेत, त्या सर्व जबाबदारी नेटाने पार पाडीत आहेत,
म्हणून सुशिक्षित लोकांनी विधवा बद्दल वेगवेगळ्या ठिकाणी चर्चासत्र ठेवावीत, समाजाचे उद्बोधन करावे, महिलांना मंगल प्रसंगात सन्मानाचे स्थान द्यावे, तेव्हा काहीतरी बदल झाला असे आपला म्हणता येईल.

 

शब्दांकन *साहित्यिक बरसमवाड विठ्ठल गणपत* अध्यक्ष: विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता.मुखेड जि. नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *