कृतार्थ कर्मयोगी विसावला – डाॅ. दिलीप पुंडे

 

दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी हैद्राबाद येथे वयाच्या 95 व्या वर्षी कर्मवीर किशनरावजी राठोड यांना देवाज्ञा झाली. 23 ऑगस्टला मुखेड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एका कृतार्थ जीवनाचा अंत झाला.
वैज्ञानिक दृष्ट्या असं म्हटल्या जाते की, माणसाच्या ह्रदयाचा आकार हा त्याच्या डाव्या हाताच्या मुठी एवढा असतो. पण सामाजिक दृष्ट्या हृदयाचा आकार हा त्या माणसाच्या अंत्ययात्रेला येणाऱ्या लोकांवर ठरतो. हजारो लोकांची उपस्थिती म्हणजे कर्मवीर किशनरावजी राठोड साहेब यांच्यावर प्रेम करणारी माणसं. त्यांनी जोडलेली माणसं आणि ते त्यांच्या कार्यकर्तृत्वाचं प्रतिक होतं…
मी 17 फेब्रुवारी 1988 रोजी मुखेडच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झालो. त्यावेळी नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात येणारा पहिला एम. डी. डॉक्टर मी होतो. त्यावेळी किशनराव राठोड हे विधान परिषद सदस्य होते. किशनरावजी राठोड, माजी मंत्री कै.मधुकररावजी घाटे, कै.माधवराव पाटील बेटमोगरेकर, कै. गोविंदरावजी राठोड, कै भाई श्रीराम गरुडकर, श्री किशनराव पाटील, श्री बाबु सावकार देबडवार यांच्याशी माझा संबंध आला. मी अत्यंत प्रामाणिकपणे रूग्णांना सेवा देत असल्याने कळत न कळत ही कुटुंबं माझ्यावर प्रेम करायला लागली. तसं माझ्यावर पुत्रवत प्रेम केले ते कै. केशवराव धोंडगे, कै. किशनरावजी राठोड व कै. गोविंदरावजी राठोड यांनी… ग्रामीण भागात एक एम. डी. डॉक्टर आलाय, तो जाऊ नये – मुखेडलाच राहावा म्हणून वरील सर्व मंडळींनी प्रयत्न केले…एक एम डी डॉक्टर या भागात राहावा म्हणून त्यांची जी तळमळ होती ती खरोखरच वाखाणण्याजोगी होती आणि मग मी या मातीचाच झालो.
कै.किशनराव राठोड यांच्या विमुक्त जाती सेवा समितीमधील कार्यक्रमात मी नेहमीचा प्रमुख पाहुणा असे. 1996 साली विमुक्त जाती व भटक्या जमातीतील विद्यार्थ्यांसाठी सुरू झालेले महाराष्ट्रातील एकमेव असे विद्यानिकेतन ज्यात मसणजोगी, फासेपारधी, घिसडी अशा दलित, वंचित, शोषित मुलांच्या शिक्षणाची सोय झाली. या विद्यानिकेतनचे उद्घाटन सुप्रसिद्ध विचारवंत कै. डॉ ना. य. डोळे सरांच्या हस्ते झाले… त्या कार्यक्रमाला मी प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होतो. आज त्या विद्यानिकेतन मध्ये शिक्षण घेवून शेकडो विद्यार्थी उच्चपदस्थ झाले आहेत. खऱ्या अर्थाने शिक्षण म्हणजे शेवटच्या माणसाचे अश्रू पुसणे, शिक्षण म्हणजे तळागाळातल्या माणसाला न्याय देणे आणि शिक्षण म्हणजे विकासाचा रथ व शिक्षक हा त्या रथाचा सारथी… ही उक्ती कमळेवाडी सारख्या डोंगराळ भागात खरी करून दाखवली. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान खर्‍या अर्थाने कै. गोविंदराव राठोड व कै. किशनराव राठोड यांनी राबविले. त्यांची वंचितांबद्दलच्या शिक्षणाची तळमळ, मुली शिकल्या पाहिजेत याबाबतची धडपड सदैव वाखाणण्याजोगी होती. भारतीय संविधान दुसरं काही नसून भारतातील बहुजनांच्या कल्याणाचा जाहिरनामाच होय.
*’शिक्षण म्हणजे देव’* हे वाक्य ते प्रत्येक भाषणात म्हणायचे; हे वाक्य माझ्या ह्रदयात वेरूळच्या कैलास लेण्याप्रमाणे कायमस्वरूपी कोरल्या गेलंय. अत्यंत अल्पशिक्षित असूनही ते शिक्षण महर्षी झाले. अनेक शाळा त्यांनी काढल्या. कदाचित त्यांनी पुस्तकं जरी कमी वाचली असली तरी मानवी मनं वाचण्यात ते तरबेज होते. दोन्ही भावांची तळमळ व त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य म्हणजे या भागातील विकासाचा मोठा टप्पा होता. 1956 साली सुरू झालेली त्यांची संस्था जवळपास 70 वर्षाची झाली आहे. शुन्यातून निर्माण झालेल्या संस्थेचे आज वटवृक्षात रुपांतर झालेलं आहे. ॥ सा विद्या या विमुक्तये ॥ हे त्यांच्या विमुक्त जाती सेवा समितीचं ब्रीदवाक्य. तळागाळातला वंचित, शोषित माणूस हा सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होऊन त्यांच्यासाठी प्रगतीची दारं खुली झाली पाहिजेत. यासाठी प्रयत्न करणारे राठोड बंधू… कर्मकांडावर सतत प्रहार करणारे, शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे सांगणारे आणि यासाठी विविध उपक्रम, साहित्य संमेलन, व्याख्यानमाला राबवणारे हे राठोड बंधू… शतकातच एखादा किशन राठोड किंवा गोविंद राठोड सारखा माणूस तयार होतो.
किशनराव राठोड यांच्या वैयक्तिक जीवनात अनेक दुःखं आली. घरातील – कुटुंबातील 10 माणसे गेली. दोन बंधू, दोन मुले, दोन नातू, पत्नी, सून अशा अनेक माणसांच्या जाण्याचं दुःख या माणसानं पचवलं. ते खर्‍या अर्थाने युधिष्ठिरच. कुटुंबातील एवढी दुःखं पचवणे म्हणजे एक युद्धच होतं आणि त्या युद्धातही स्थिर असलेला माणूस म्हणजे युद्धीष्ठिरच…
*भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले*
*एवढे मी भोगिले की मज हसावे लागले*
*ठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडे*
*पण दुजांच्या आसवांनी मज भिजावे लागले…*
या सुरेश भटांच्या कवितेप्रमाणे खर्‍या अर्थाने किशनराव राठोड हे इतरांचे अश्रू पुसण्यासाठी वटवृक्षाप्रमाणे उभे राहिले. 95 वर्षाचे प्रदीर्घ आयुष्य आणि अनेक दुःखाचे डोंगर पचवित हा माणूस कणखर होत गेला… त्यांच्या या स्थिरतेचं कधी कधी मला कौतुकही वाटायच आणि आश्चर्यही…
मी त्यांना सतत मागील 35 वर्षांपासून आरोग्यसेवा देत आलो. व्याधिग्रस्त असूनही त्यांनी अनेक संकटे पार केली. गोविंदरावजी राठोड हे नव्याने आमदार म्हणून निवडून आले आणि दुर्दैवाने त्यांचे अकाली निधन झाले. एवढं मोठं संकटही या माणसाने पचवले. खरं म्हणजे अत्यंत यशस्वी असं जीवन ते जगले. 25 जुलै 2013 रोजी मला ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. मुखेड – नांदेड आणि नंतर औरंगाबाद पर्यंत माझ्यावर उपचार करण्यात आले. मी या संकटातून सहीसलामत बाहेर पडलो. तत्कालीन परिस्थितीत अनेकांनी माझ्यासाठी मंदिरात – मशिदीत प्रार्थना केल्या. किशन राठोड व गोविंद राठोड या बंधूंनी तर माझ्यासाठी अश्रू ढाळले. माझ्यासाठी नवस केले. खरं तर जनतेचे हे प्रेम पाहून त्या काळात मला शब्द न फुटता मी निशब्द होतो. *असं म्हणतात की रक्ताचं नातं हे दाट असते पण अश्रूचं नातं हे घनदाट असते…* आणि हे राठोड व माझ्या परिवाराचं नातं हे निश्चितच घनदाट आहे. आमच्या प्रत्येक कौटुंबिक कार्यक्रमात, प्रत्येक व्याख्यानमालेत मोठे साहेब (कै. किशनरावजी राठोड साहेब) आवर्जून उपस्थित राहायचे. या वयातही त्यांचा उत्साह, त्यांची भाषणे आणि ऊर्जा पाहून मी अचंबित होत असे. त्यांचे कणखर आवाजातील भाषण आमच्या दीर्घकाळ स्मरणात राहील.
शेवटच्या टप्प्यात त्यांचा आजार बळावला आणि 29 जुलै 2023 रोजी मी त्यांना पहायला गेलो… त्यावेळी ते म्हणाले की, “पुंडे साहेब मला वाचवा… मला अजून जगायचंय आणि खुप काही करायचंय…” पण नियतीला हे मान्य नव्हते.माणसाला जे हवे असते ते नियती देईलच असे नाही आणि नियती जे पुढ्यात ठेवते ते माणसाला स्वीकारावेच लागते आणि यालाच जीवन ऐसे नाव. त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती पाहून मी स्तंभित झालो. पिकलं पान गळणारंच – हा निसर्गाचा नियम आहे पण उच्च ध्येयासक्ती, जगण्याची दुर्दम्य इच्छा, बलदंड शरीरयष्टी आणि संकटाला सामोरे जाण्याची तयारी… यामुळेच या माणसाला प्रदीर्घ आयुष्य मिळालं…
*असे जगावे दुनियेमध्ये*
*आव्हानाचे लावून अत्तर |*
*नजर रोखूनी नजरेमध्ये*
*आयुष्याला द्यावे उत्तर ||*
*असे दांडगी इच्छा जयांची*
*मार्ग तयांना मिळतील सत्तर |*
*संकटासही ठणकावून सांगावे*
*खुशाल ये तू आता बेहत्तर ||*
या गुरू ठाकूर यांच्या काही पंक्ती कर्मवीर किशनराव राठोड यांना तंतोतंत लागू होतात. त्यांचं जीवन म्हणजे एक संघर्ष… एक मोठी संघर्ष कथा. या माणसाने एक वेगळं विश्व निर्माण केलं. कित्येक वंचितांच्या मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या संस्थेतील गुरुजनांनी – कर्मचार्‍यांनी मिळून या विद्यार्थ्यांना स्वप्नं बघायला शिकवलं, त्या स्वप्नांना पंख लावले आणि त्यांना उडण्याचं बळ दिलं. परिवर्तन म्हणजे दुसरं काय असतं… ही अशी उभारणी करणे हेच परिवर्तन आणि हे राठोड बंधुंचे जीवित कार्य झाले. दलित, शोषित, वंचितांसाठी केलेलं हे काम खरंच महान कार्य आहे. इतिहास हे कधीच विसरू शकणार नाही. समाज परिवर्तनात अनेक संकटे येतात आणि संकटं पार करता करता हा माणूस कधीच थकला नाही.
उत्सवप्रिय जगण्याची त्यांची हौस असे. कोणताही कार्यक्रम झाला की त्यांच्यात उत्साह आणि ऊर्जा येत असे. उत्साह, ऊर्जा, उपासना आणि उपक्रमशीलता हा त्यांचा स्थायीभाव होता. विमुक्त जाती सेवा समितीच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी-विद्यार्थीनी त्यांनी घडवले आणि खर्‍या अर्थाने त्यांच्यामुळे ज्ञानाचा दिवा अनेक कुटुंबात लागला. राष्ट्रसेवेचं हे महान कार्य राठोड कुटुंबाकडून घडत आलेलं आहे.
राजकारणातही ते सक्रिय होते. राठोड घराण्याला नगरपालिका, विधानसभा, विधान परिषद अशी राजकीय परंपरा लाभली आहे. या मतदारसंघातील गावांचा, लाखो लोकांचा विकास करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. त्यांच्या पुढच्या पिढीतील मा. आमदार डॉ तुषार राठोड, गंगाधर राठोड व त्यांचे नातू संतोष राठोड हे त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे निश्चितच चालवतील. लौकिक दृष्ट्या नसले तरी अलौकिक दृष्ट्या विचाराने हे दोन्ही राठोड बंधू जनतेच्या सदैव स्मरणात राहतील. या माणसांचे जीवन पाहता निश्चितच कवीवर्य बा. भ. बोरकरांच्या काही ओळी त्यांना तंतोतंत लागू पडतात…
*’देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे*
*गोरटे वा सावळे या मोल नाही फारसे*
*तेच डोळे देखणे जे कोंडिते सार्‍या नभा*
*वोळती दुःख जगाच्या सांडिती चंद्रप्रभा*
*हात तेचि देखणे जया निर्मितीचे डोहळे*
*मंगलाने गंधलेल्या सुंदराचे सोहळे*
*पाय तेचि देखणे जी ध्यासपंथे चालती*
*वाळवंटातही स्वस्ति पद्मे रेखिती*
*देखणा तो देहांत सागरा सूर्यास्त समा*
*पेरुनी जाईल रात्र गर्भिचा वारसा…’*
विचारांचा वारसा त्यांनी पेरलेलाच आहे पण खर्‍या अर्थाने ते कर्मयोगी होते. त्यांनी केलेलं कार्य प्रदीर्घ काळ जनतेच्या लक्षात राहील. त्यांचं श्वासाचं आयुष्य संपलं आहे पण ध्यासाचं आयुष्य चिरकाल असेल. गोरगरीब समाज पुढे यावा म्हणून शिक्षणाला देव मानणारा हा माणूस व राठोड कुटुंबीय गोरगरीबांच्या शिक्षणासाठी समर्पित आहे. ‘हे कंकण करि बांधियले जनसेवे जीवन दिधले’ – या उक्तीप्रमाणे राठोड कुटुंबाचे योगदान या तालुक्याला व परिसराला लाभले आहे.
राठोड बंधुंनी सदैव माझ्यावर पुत्रवत प्रेम केले. प्रत्येक सुख-दुःखात ते माझ्यासोबत असायचेच. किशनराव राठोड तर माझ्यावर जीवापाड प्रेम करायचे. त्यांच्या जाण्यानं मला तर अतिव दुःख झाले आहे. खरं म्हणजे त्यांचं जाणं बघून मी निशब्द होतो… भावना काय व्यक्त करायच्या हे समजत नव्हते पण हा जो कर्मयोगी गेला तो एक कृतार्थ जीवनाचा अंत आहे. असं म्हटल्या जातं की, ”कृतार्थ जीवनाच्या मृत्यूचेही सोहळे होतात.’ त्यांच्याही जगण्याचा अन् मरण्याचा सोहळा झाला.

काळोखाच्या दारावरती नक्षत्रांची लेणी कोरुन हा कृतार्थ कर्मयोगी अनंतात विलीन झाला. कृतज्ञता व्यक्त करायला आलेली हजारोंची मंडळी आणि कृतार्थ जीवन जगून अनंताच्या प्रवासाला निघून गेलेले किशनराव राठोड…
अखेरचे तो बोले
आलो होतो रिकामा
सप्रेम निरोप द्यावा
बहरून जात आहे…

95 वर्षाचं हे आयुष्य… रिकामं आलेला हा कर्मयोगी, त्यांनी केलेल्या महान कार्यामुळं मनामनात ठसा उमटवून बहरून पंचतत्वात विलीन झाला. कर्मवीर किशनरावजी राठोड या पितृतुल्य व्यक्तिमत्वास माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *