कंधार: ( विश्वंभर बसवंते )
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता समारोह व मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव निमित्त कंधार तालुक्यातील कल्हाळी गावातील ऐतिहासिक मुक्ती लढ्यातील ३५ हुतात्म्यांना त्यांचे मायभूमीत अभिवादन करण्यासाठी कल्हाळी गावासह पंचक्रोशीतील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून, “अभिवादन सोहळा कार्यक्रमाची” शोभा वाढवावी, असे आवाहन ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
आज दि. १५ सप्टेंबर २०२३ रोज शुक्रवारी दुपारी ठीक ४:०० वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कल्लाळी येथे “हुतात्म्यांना अभिवादन” सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी पारंपारिक वेशभूषित कल्हाली गावचे भूषण वीर आप्पासाहेब नाईक यांची व्यक्तिरेखा, त्याचबरोबर स्वातंत्र्य लढ्यातील महापुरुषांची व्यक्तिरेखा सादर करून, हाती लेझीम घेऊन वाजंत्री च्या गजरात गावातील मुख्य रस्त्याने भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
त्याचबरोबर या कार्यक्रमानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकास उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण करण्यात येऊन,उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांच्या वतीने त्या ३५ हुतात्म्यांना अभिवादन करून,तदनंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार आणि कल्हाळी गावचा इतिहास आणि त्या ३५ हुतात्मे यांच्या कार्याला उजाळा देणारे भाषणे होतील.
या आयोजित अभिवादन सोहळा कार्यक्रमासाठी कंधार तालुक्यासह परिसरातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून, कार्यक्रमाची शोभा वाढवावी. असे आवाहन ग्रामपंचायत कार्यालय कल्हाली व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.