शेतकरी आणि साहित्यिक दोघंही व्यवस्थेचे शिकार……. भारत सातपुते

अहमदपूर ( प्रतिनिधी )

भारतीय शेतकरी आणि इथला साहित्यिक हे दोघेंही येथील व्यवस्थेचे शिकार होत असून शेतकऱ्यांना व्यापारी लुटतात आणि साहित्यिकांना प्रकाशक लुटतात. दोघंहीही इथल्या व्यवस्थेचे शिकार झालेले आहेत .असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक ,वात्रटिकाकार आणि सुप्रसिद्ध कवी भारत सातपुते यांनी अहमदपूर येथे घेण्यात आलेल्या गारपीट आणि कविता पावसाच्या या काव्यसंग्रहाच्या संयुक्त प्रकाशन सोहळ्या प्रसंगी काढले.
त्यांनी पुढे सांगितले की इथला शेतकरी हा निसर्गाच्या लहरीपणाच्या दुष्टचक्रात अडकलेला आहे. पाऊस पडला नाही तर तो कोरड्या दुष्काळात भाजून निघतो आणि अतिवृष्टी झाली तर तो ओल्या दुष्काळात कुजून निघतो . या दोन्ही प्रसंगी शेतकरी हा संकटात सापडतो.
एवढं संकट झेलूनही थोडं फार जर शेतात पिकलं तर व्यापारी मात्र त्याचं धान्य बेभाव किंमतीत खरेदी करतात. अशा परिस्थितीमध्ये तो कायमचा कर्जाच्या ओझ्यात राहतो.
आपल्या पाल्याला चांगले शिक्षण देण्याचं आणि आपल्या घरामध्ये चांगल्या सुख – सुविधा निर्माण करण्याचं त्याचं स्वप्न कधीच पूर्ण होत नाही. नेमकी अशीच परिस्थिती साहित्यिकांबाबत सुद्धा आहे. लेखक आणि कवी आपले पुस्तक लिहितात आणि ते घेऊन प्रकाशकाकडे जातात आणि प्रकाशक मात्र छपाई मूल्य म्हणून त्या कवी आणि लेखकाकडून चौपट किंमत वसूल करतात आणि त्या साहित्यिकाची उमेद तिथेच संपवितात .असे दुःख त्यांनी व्यक्त केले.
भारताचे महान राजे अशोक यांच्या 23 व्या जन्मशताब्दी समारोह वर्षाच्या प्रसंगी सामाजिक मती समृद्धता आंदोलन अंतर्गत पुरोगामी साहित्य परिषद आणि पे बॅक टू सोसायटी प्रोग्राम महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यसंग्रहाचे प्रकाशन आणि कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले होते. या प्रकाशन समारंभाचे आणि कवी संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा ज्ञानेश्वर गायकवाड हे होते आणि प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ विद्रोही साहित्यिक अंकुश सिंदगीकर ज्येष्ठ साहित्यिक वाय डी वाघमारे, प्रा डॉ मारोती कसाब, जाणकार समिक्षक सुनील खंडाळीकर, पत्रकार बाबासाहेब वाघमारे हे होते.
पुस्तक प्रकाशन आणि कवी संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी भारत सातपुते यांनी सांगितले की खऱ्या साहित्यिकांची अवहेलना होत असून नकली साहित्यिकांचा सरकार दरबारी सुळसुळाट झालेला आहे. तरी पण समाजाला योग्य दिशा दाखवण्याचं कार्य हा साहित्यिकच करत असतो. आणि साहित्यामुळेच देशाची आणि समाजाची प्रगती होत असते. म्हणून साहित्यिकांनी खचून न जाता जोमाने आपले लिखाण कार्य चालू ठेवावे. याप्रसंगी विद्रोही साहित्यिक अंकुश सिंदगीकर, वाय डी वाघमारे, सुनील खंडाळीकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
प्रकाशन समारंभा नंतर प्रा भगवान आमलापुरे लिखित कवितासंग्रह “गारपीट ” आणि कवी विजय पवार संपादित कवितासंग्रह ” कविता पावसाच्या ” या काव्यसंग्रहातील कविता आणि इतरही कवितांचे बहारदार कवी संमेलन झाले. त्या कवी संमेलनामध्ये बालासाहेब पांचाळ ,वसमत ; मदन अंभोरे, वसमत ; सय्यद चांद तरोडकर, परभणी ; लक्ष्मणसुत, मालेगाव – नांदेड; वैजनाथ कांबळे, हाडोळती ; प्रा डॉ रमाकांत गजलवार, अहमदपूर ;प्रा शिवा कराड ,अहमदपूर ; कवयित्री रंजना गायकवाड ,अहमदपूर; प्रा भगवान अमलापुरे, कंधार ; गणेश चव्हाण, सांगवी ; विजय पवार, लोहा ; मुरहारी कराड ,अहमदपूर ; वर्षा माळी ,अहमदपूर ; शिवकांता शिंदे, लातूर ; प्रा संजीवकुमार भोसले ,चाकूर ; प्रा परमेश्वर वाकडे, अंबाजोगाई ; पत्रकार बाबासाहेब वाघमारे, अहमदपूर ; शिवाजीराव स्वामी, उदगीर,पत्रकार त्रिशरण मोहगावकर, अहमदपूर ; यांनी आपल्या बहारदार कविता सादर करून श्रोत्यांची मने जिंकली.
प्रारंभी पुरोगामी साहित्य परिषदेचे सचिव आणि पे बॅक टू सोसायटी प्रोग्रामचे राज्य कन्वेनर एन डी राठोड यांनी पुस्तक प्रकाशन आणि कवी संमेलन याची प्रस्तावना सादर केली. तर
या दोन्ही कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध नवकवी प्रा डॉ आर के गजलवार यांनी केले. या दोन्ही कार्यक्रमाचे आभार कवी मुरहरी पारकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *