नांदेड ;
आमचा जवळचा मित्र आणि मराठवाड्यातील सामाजिक चळवळीतील कार्यकर्ता प्रा.श्याम आगळे याचं काल रात्री निधन झाल्याचं कळलं आणि धक्का बसला.श्यामराव हा अहमदपूरच्या महात्मा गांधी महाविद्यालयात हिंदीचा प्राध्यापक होता.खरे तर तो हाडाचा शिक्षक होता.त्याच महाविद्यालयात निशिकांत देशपांडे,ललिता गादगे हे आमचे स्नेही होते.नांदेडहून लातूरला जाताना या सगळ्यांना भेटल्याशिवाय पुढे जाणे शक्य नसे.त्यात श्यामरावचा स्वभाव बोलका आणि प्रेमळ.आम्ही त्याला मराठवाड्याचा साने गुरुजी म्हणायचो.साने गुरुजी कथामालेच्या माध्यमातून हा श्याम खेड्यापाड्यातील शाळा-महाविद्यालयांत पोचला होता.आईची महती सांगताना श्याम तल्लीन होऊन जायचा.त्याच्यातील आईचं अंत:करण अश्रुचिंब व्हायचं.डोळ्यातून ओघळणारे अश्रू थांबविणं त्याला जड जायचं .
श्यामरावची आणि आमची भेट झाली ती लातूरला आ.वसंतराव काळे यांच्याकडे.वसंतराव आमचे मित्र.त्यांनी मराठवाड्यात शेकडो तरुणांचं जाळं विणलं होतं.अडीनडीला मदतीला धाऊन जाणारा कार्यकर्ता म्हणून तरुणाईचा त्यांच्यावर जीव होता.श्यामराव सारखे निस्वार्थी मावळे त्यांच्या सोबत होते.श्यामरावचं मैत्र इथूनच जोडलं गेलं.पुढं वळसंगीचे शरद आणि भरत देशमुख या मित्रांच्या माध्यमातून ते अधिक घट्ट झालं.नांदेडच्या शारदा भवन हायस्कूलचे डी.व्ही.देशमुख सर हा सुद्धा या मैत्रीचा महत्त्वाचा दुवा.डॉ.सूर्यनारायण रणसुभे सरांचा तो विशेष लाडका.सर कार्यक्रमाच्या निमित्ताने कुठे बाहेरगावी निघाले की श्यामराव हमखास त्यांच्या सोबत असायचा.
श्यामरावची भटकंती खूप असायची.बालभारतीवर होता तेव्हा पुण्याला सारख्या चकरा असायच्या.महावीर जोंधळे, इंदुमती जोंधळे हे त्याचं पुण्यातलं गणगोत.अत्यंत साधी राहणी असलेला खादीचे कपडे वापरणारा श्यामराव हे सामाजिक कळवळ्याचं नाव होतं.श्यामरावला बाकी कसलंही व्यसन नव्हतं.हातावर तंबाखू मळताना एकदा पाहिल्याचं स्मरतं.ज्वारीची भाकरी आणि पिठलं यावर गडी खूष असायचा.लातूरला त्याच्याकडे गेलो म्हणजे ज्वारीची भाकरी आणि पिठल्याचा बेत तो आखायचा. तब्येतीकडे त्याचे लक्ष असायचे.पाठीच्या मणक्याच्या काही तक्रारी होत्या.तिकडे तो दुर्लक्ष करायचा.कुठूनही निमंत्रण आलं की जायचा.साने गुरुजी,शिवाजी महाराज, सावित्रीबाई, डॉ.बाबासाहेब आंबेडकरअशा विषयांवर अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद बोलायचा.
श्यामराव सेवानिवृत्तीनंतर लातूरला स्थायिक झाला.पूर्वी छात्रभारती,युक्रांद,विकास आंदोलन,राष्ट्र सेवा दलात काम करणारा हा कार्यकर्ता लोहियांच्या विचारांशी जोडलेला होता.भारत जोडो मोहिमेत ही तो अग्रभागी होता.एसेम,यदुनाथ थत्ते,बाबा आढाव,ना.य.डोळे,बापुसाहेब काळदाते,प्रधान मास्तर यांच्या सहवासात समाजवादी विचारांनी प्रेरित होऊन काम करीत होता.त्यांचा तो खूप लाडका होता.सामाजिक चळवळीइतकाच तो साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळीत रमायचा.कौतिकराव ठाले पाटील,कुंडलीक अतकरे,
जनार्दन वाघमारे,शैला लोहिया,ललिता गादगे अशा अनेकांशी त्याचे जिव्हाळ्याचे संबंध होते.
गेल्या काही दिवसांपासून श्यामराव आजारी होता.कर्करोगाने त्याला जखडून टाकले होते.तरी तो आशावादी होता.जगण्याची विलक्षण ऊर्मी त्याच्याकडे होती.तो फोनवरून या संदर्भात बोलायचा.उस्मानाबादच्या साहित्य संमेलनात त्याची आणि आमची भेट थोडक्यात हुकली.आम्ही संमेलनाच्या शेवटच्या दिवशी नांदेडला निघालो आणि श्यामराव लातूरहून उस्मानाबादला.
श्यामराव या आजारावर मात करून जगला असता;परंतु कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात त्याचा शिरूर घोडनदी येथे प्रॅक्टिस करणारा सचिन नावाचा तरूण डॉक्टर मुलगा अचानक गेला.खरे तर तो कोरोनाचा बळी ठरला.याचा प्रचंड धक्का श्यामरावला बसला.या धक्क्यातून तो सावरलाच नाही.आम्ही मोबाईल वर बोलण्याचा प्रयत्न केला.पण तो हिंमत खचल्यासारखा तुटक तुटक चार दोन शब्द बोलायचा.लातूरला असलेल्या मुलाकडून श्यामरावच्या प्रकृतीची अधूनमधून विचारपूस करीत होतो.इच्छा असूनही लातूरला जाणे शक्य होत नव्हते.मधुकरराव गायकवाड,शेषराव मोहिते,भरत देशमुख,जयद्रथ जाधव, राजाभाऊ सोमवंशी या मित्रांकडून आम्ही श्यामरावच्या प्रकृतीची चौकशी करीत होतो.परवाच तो बीडला मुलीकडे गेल्याचं कळलं.
आणि आज
श्यामराव गेल्याची बातमी दगडू लोमटे या अंबाजोगाईच्या मित्राकडून कळली आणि सारा भूतकाळ उलगडत गेला.
भावपूर्ण श्रद्धांजली!
प्रा.जगदीश कदम,नांदेड