झणझणीत मिरची भाजी आणि धमाल मस्ती #बोलगप्पा_दैनंदिनी लेख क्रमांक 14

 

शाळेत शालेय पोषण आहार नेहमीच असतो, पण बुलढाणा विशेषतः घाटाखालील पट्यात अतिशय प्रसिद्ध असलेली भाजी म्हणजे मिरची भाजी सहसा पोषण आहारात बनवत नाहीत. भाजी आणि ती ही मिरच्यांची? हे ऐकून कधीही ज्यांनी याची चव चाखली नाही त्यांच्या भुवया उंचावल्याशिवाय राहत नाहीत. इकडे मात्र ही भाजी खूप आवडीची आहे आणि नावाप्रमाणे वाटते तेवढी तिखट खरंच नसते.

बाहेकर सर नव्याने शाळेवर रुजू झाले आणि त्यांनी सहज एक प्रस्ताव मांडला. सर एक दिवस आपण दुपारी शालेय पोषण आहाराऐवजी मस्त मिरची भाजी बनवूया. पोळ्या मुले घरून आणतील. हवं तर साधा भात सोबतीला ठेवू. भाजी पुरुषांनी बनवायची, आणि मुलांची सुद्धा मदत घ्यायची. मग काय मुख्याध्यापक जोशी मॅडम यांनी ताबडतोब होकार दिला. जेवणानंतर वर्गात बसण्याऐवजी दुपारी दप्तरविना शाळा करूया. मी पुस्ती जोडली. बाकी सगळ्यांनी नेमकं काय करायचं यावर एकमत केलं. शाळा सुटताना नियोजन आणि जबाबदारीचे वाटप करण्यात आले.

दुसऱ्या दिवशी सुरुवात अडचणींनी झाली. नेमका गॅस सिलेंडर संपला होता. कुकर चुलीवर कसा लावायचा? पण एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं. पाणी गरम करून डाळ कुकर मध्ये शिजवून स्वयंपाकी ताईंनी घरून शिजवून आणण्याचं ठरलं. फोडणी मात्र चुलीवर द्यायची आणि भाजीही चुलीवर करायची ठरली. भाजी साठी रुंद प्लेट लागते, कारण ही भाजी चुरून आणि भुरका मारून खायची भाजी आहे. मुलांनी आदल्या दिवशी दिलेल्या सूचनेनुसार प्लेट आणल्या. सर्वांनी ठरल्या प्रमाणे पोळ्या शिल्लक आणलेल्या होत्या.

काकड्या, टमाटे, कांदे छान चिरून वाढायला आणि फोडणी द्यायला कांदा लसूण पेस्ट मुली मुले यांच्या मदतीने आणि शिक्षिकेच्या निरीक्षणात करून घेतले. टोमॅटो प्युरी, वर्हाडी मसाला, मिरच्या आणि मसाले इत्यादी यांचे प्रमाण अंदाजे घेत तयारी पूर्ण केली. बाहेकर सरांनी जोरदार फोडणी दिली. शिजलेली डाळ आणि योग्य प्रमाणात पाणी टाकून भाजीला मस्त उकळी येऊ दिली.

तोपर्यंत सगळ्यांनी रांगा करून कागदी पत्रावळी, प्लेट, भात, सलाद आणि इतर सगळं वाढून ठेवलं. मुलांनी आणि आम्हीही वाढलं. गप्पा मारत आणि आणलेल्या सगळ्या पोळ्या, भात अगदी तीन तीन वेळा भाजी घेऊन अगदी तृप्त होत जेवण सगळ्यांनी केलं. नंतर आम्हीही जेवलो. पुरुषाच्या हाताची वेगळी चव स्त्री शिक्षिकांना चाखायला मिळाली. जेवणानंतर सगळी आवराआवर करून मुलांना गप्पा मारायला पटांगणात बसवले. बैठे मजेदार खेळ, तोंडी गणित, आणि शेवटी स्वच्छता करून एक अविस्मरणीय दिवस साजरा करून सगळी घरी गेली.

शाळा उपक्रमशील असणे ही केवळ विद्यार्थ्यांची गरज नसून ती एक शिक्षक म्हणून आपली सर्वांची मानसिक गरजही आहे हे आवर्जून जाणवले. शाळेतील वातावरणात चेतक बदल करण्याचं आणि चैतन्य निर्माण करण्याचं सामर्थ्य उपक्रमात आणि कृतीत असतं. शिक्षणाचे अनौपचारिक मार्ग बरेचदा वर्ग खोलीच्या बाहेर असतात. शिक्षक विद्यार्थी बंध घट्ट होण्याचे ते एक साधनच आहे. फक्त जाणीवपूर्वक त्यातून अध्ययन अनुभव कसे साधता येतील याची दृष्टी शिक्षक म्हणून कायम डोक्यात असली पाहिजे.

 

 

शब्दांकन – संदीप विष्णू राऊत
[email protected]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *