आम्ही कोकणी आणि डाएट ??..

आम्ही कोकणी आणि डाएट ??..
आम्ही ६ ते ६ .३० मधे डिनर करतो.. ही अगदी लहानपणापासूनच लागलेली सवय.. पुढे त्या सवयीचा वजन कंट्रोल साठी नक्कीच उपयोग झाला.. आम्ही कोकणी भात खातनाही तर ओरपतो म्हणु.. कारण खीर तांदुळाची.. घावन तांदुळाचे.. भोपळ्याचे घारगे तांदुळाचे .. तवसं म्हणजेच मोठी काकडी त्यापासून बनवले जाणारे हळदीच्या पानातील पातोळे हेही तांदुळाचे.. आम्ही तांदुळाची पिठी म्हणतच नाही.. जर नाचणीचं पीठ , ज्वारीचं पीठ तर मग तांदुळाचंही पीठच असायला हवं ना मग पिठी हा शब्द कुठुन आला माहीत नाही..
काल संध्याकाळी सहा वाजता वरणभात , तुप लिंबु आणि लिंबाचं गोड लोणचं असं ताटात घेउन अंगणात झुल्यावर जेवत होते तितक्यात सोसायटीतल्या एक काकु आल्या. माझ्या ताटात भात पाहुन म्हणाल्या , तु भात खातेस ??इतकी बारीक आहेस त्यामुळे मला वाटलं तु भात खात नसावीस.. मी हसतच म्हटलं, मी रोज भात खाते पण संध्याकाळी ६ वाजता.. रात्री ९ वाजता नाहीत्यावर त्या म्हणाल्या , खरच की गं , हे माझ्या लक्षातच आलं नाही.. आम्ही रोज ८ . ३० ला जेवतो .. पुढे मी म्हणाले , काकु मी कोकणातली आहे ना त्यामुळे भाताशिवाय माझं जमत नाही..
बाहेरही मैद्याच्या रोटीपेक्षा मी भात प्रिफर करते.. किवा बाहेरचं खाणं जितकं टाळता येइल तितकं टाळते..
कुळथाचं पिठलं भात म्हणजे आमचा प्राणप्रिय मेनु.. मउ भात सकाळी अधूनमधून नास्ट्याला हवाच.. मी डाएट आणि व्यायाम याची निश्चित भोक्ती आहे .. मी कितीतरी गोष्टी खात नाहीम्हणजेच साखर मैदा इत्यादी.. . हे मी त्या काकुशी बोलत होते… काकु म्हणाल्या मी पुण्यातलीच त्यामुळे पोळीशिवाय आमचं जमत नाही त्यावर मी म्हटलं , चपाती म्हटलं की आम्हाला बरं वाटतं.. नाचणीची भाकरी खाल्ली की आम्हाला भरपुर कॅल्शीअम मिळतं कारण नाचणी कोकणात प्रत्येकाच्या बांधावर उगवते.. इथे काळपट भाकरी कोणाला आवडत नाही ( पुण्यात ) असं काकु म्हणाल्या .. इकडच्या तिकडच्या गप्पा मारुन काकु निघुन गेल्या… मी मात्र वरणभातात रमले कारण तेच माझं मुळ आहे.. डाएट करताना हेच लक्षात ठेवायचय मी लहानपणापासून काय खाल्लय आणि आता जिथे रहातो तिथल्या हवेला कशाची गरज आहे आणि व्यायाम किती करतो .. कारण डाएट वर अनेक शंकाकुशंका आहेत.. आज दसरा आहे.. आजही मी गोड म्हणजेच साखरेचं खाणार नाही आणि दिवाळी येतेय.. अनेक गुळाचे पदार्थ आहेत जे आपण खाउच शकतो.. सतत वजन काट्यावर उभं राहुन टेंशन घेत बसण्यापेक्षा काय कधी आणि किती खावं याचा अभ्यास असेल आणि रोज न चुकता अगदी सण असला तरीही व्यायाम असेल तर कोकणी माणसासारखे सडसडीत रहाता येइल.. संध्याकाळी लवकर जेवणाचे अनेक फायदे आहेत.. ज्यांना शक्य आहे त्यांनी जरुर काही महिने करुन पहा..
सगळ्याना दसऱ्याच्या डाएटमय शुभेच्छा..

 

सोनल गोडबोले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *