फुलवळ येथील राष्ट्रीय महामार्गावर अपघात , एकजण गंभीर जखमी तर एकाला किरकोळ मार.. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक चबूतऱ्याला धडक दिल्याने चबुतरा चकनाचूर , सुदैवाने जीवित हानी टळली..

 

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे व ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या मनमाणीमुळे रखडले सर्व्हिस रोड व नालीचे बांधकाम..

फुलवळ  (धोंडीबा बोरगावे )

कंधार तालुक्यातील फुलवळ येथून एक राष्ट्रीय महामार्ग आणि एक राज्य महामार्ग जात असून येथील बसस्थानक शेजारी नियमाने मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सर्व्हिस रोड व नाली बांधकाम मंजूर असतांना ही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे व ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे एका बाजूचा रस्ता तब्बल दोन ते अडीच वर्षांपासून रखडला असल्याने निर्माण झालेल्या धोकादायक वळणावर अधूनमधून छोटे मोठे अपघात होतच आहेत परंतु ता.१ नोव्हेंबर रोजी रात्री ११:५० वाजता एमच ११ टी ८९४६ या क्रमांकाच्या टँकरने येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी उभारलेल्या चाबूतऱ्याला जोराची धडक देऊन चकनाचूर करत येथील श्रेया हॉटेल समोर धडकला असून त्यात धोंडीबा बीजले व वैजनाथ बीजले हे दोघे बापलोक होते त्यात वैजनाथ बीजले हे जबर जखमी झाले असून मुलगा धोंडीबा बीजले यांना किरकोळ मार लागला असून अपघाताची रात्रीची वेळ असल्याने सुदैवाने त्यावेळी सदर रस्त्यावर लोकांची वर्दळ नव्हती म्हणून जीवितहानी टळली.

 

सदर क्रमांकाचे टँकर हे कंधार येथील नगर परिषद चे शौचालयची साफसफाई करून कंधार वरून उदगीर कडे जात असताना रात्री उशिरा फुलवळ येथे हा अपघात झाला . नांदेड ते उस्मानागर , फुलवळ मार्गे उदगीर जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५० चे काम गेली दोन ते अडीच वर्षांपासून चालू असून अद्यापही तो रस्ता पूर्णत्वास आला नसल्याने अनेक ठिकाणी काम अर्धवटच आहे. सदर रस्त्याचे काम करणारी के.सी.एल. कंपनी होती. ठिकठिकाणी अर्धवट कामे सोडून फुलवळ च्या शेजारी टाकलेला प्लान्ट बंद करून त्या कंपनीने पळ काढला आहे.

प्रशासनाच्या बाजूने सदर रस्त्याचे काम पाहण्यासाठी किंवा ज्यांच्या अधिपत्याखाली हे काम चालू होते व आहे त्या अधिकाऱ्यांना ,संबंधित ठेकेदाराला व राष्ट्रीय महामार्ग च्या कार्यालयाला तसेच या भागातील लोकप्रतिनिधींना अनेक वेळा वारंवार सदर अर्धवट कामाबद्दल व फुलवळ येथील सोडून दिलेल्या एक बाजूच्या सर्व्हिस रोड व नाली बांधकाम बद्दल कल्पना देऊनही ते अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी फुलवळ ग्राम पंचायत व ग्रामस्थांनी लेखी , तोंडी विनंती ही केली. परंतु ” मींया बीबी राजी तो क्या करेगा काजी ” या उक्ती प्रमाणे संबंधित ठेकेदाराला हाताशी धरून त्या अधिकाऱ्यांनी ” आओ चोरो बांधो भारा आधा तुम्हरा आधा हमारा ” असे करत आपापली पोळी भाजून घेतली आणि आपल्या मुजोरपणात मनमानी करत येथील सदर काम आहे तसेच अर्धवटच सोडून दिले.

 

फुलवळ ची जनता तशी जागरूक आहे प्रत्येकाने जमेल तशा पध्दतीने सदर अर्धवट काम पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न केले , एवढेच नाही तर विविध वर्तमानपत्रातून वारंवार यासंदर्भात बातम्याही छापून आल्या. परंतु मुजोरीचा कळस गाठलेल्या अधिकारी व ठेकेदाराला याचा कसलाच प्रभाव पडला नसून अशा कितीही बातम्या छापून आल्या तरीही आम्ही आमचाच मनमानी कारभार करणार याची प्रचिती दिली. परंतु या गंभीर बाबीकडे ना कोणते वरिष्ठ लक्ष घालतात ना ही या भागातील लोकप्रतिनिधी यासंदर्भात कोणाला जाब विचारतात.

 

नुकतीच फुलवळ येथे घडलेल्या घटनेतील जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने हलवण्यात आले असून अशा भयानक घटना पाहता सर्वांच्याच मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुदैवाने या घटनेच्या वेळी येथे रस्त्यावर माणसांची वर्दळ नव्हती म्हणून जीवितहानी टळली पण भविष्यात कधीही अशी भयानक घडू शकते आणि जीवितहानी होऊ शकते तेंव्हा प्रशासनाने वेळीच जागे होऊन सदर रस्त्याचे अर्धवट राहिलेले आणि फुलवळ येथील एका बाजूने राहिलेल्या सर्व्हिस रस्त्याचे व नाली बांधकाम तात्काळ पूर्ण करावे अशी मागणी गावकऱ्यांतुन होत आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *