कंधार ; प्रतिनिधी
मन्याडखोऱ्यातील दलित-पददलित, उपेक्षित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी दिवंगत डॉ. भाई केशवराव धोंडगे यांनी आपले संपूर्ण आयुष्य झिजविले. याची उत्तराई म्हणून वैदू समाजातील तरुणाने आपल्या नवीन घराला भाईंचे नाव देऊन भाईंप्रति असलेल्या प्रेमाची प्रचिती आणून दिली.
डॉ. भाई केशवरावजी धोंडगे हे विधानसभेतील गोर-गरिबांचा आवाज होते. नाहिरेवाल्यांच्या हक्कासाठी त्यांनी लढून न्याय मिळवून दिला. कंधारमधील पालीत राहणाऱ्या वैदू समाजासाठी त्यांनी विधानसभेमध्ये भांडून महाराष्ट्रातील एकमेव वैदू समाजासाठी स्वतंत्र कॉलनी निर्माण करण्याचे काम केले. खऱ्या अर्थाने पालवाले, गुराखी राजे, कुणबी राजे यांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी लढा दिला. कंधारमधील वैदू कॉलनी त्याचे मूर्तीमंत उदाहरण होय.
त्याच समाजाच्या तरुणाने आपल्या घराला डॉ. भाई केशवराव धोंडगे यांचे नाव देण्याचे काम केले म्हणजे त्यांनी केलेल्या कामाची पावती कशी असते, सामान्य, नाहीरेवाला पालवाला उपकाराची कशी जाण ठेवतो यांचे मूर्तिमंत आणि जिवंत उदाहरण म्हणजे येथील वैदू समाजातील राजू देशमुख यांनी त्यांच्या घराला दिलेले भाईंचे नाव होय. दि. १८ रोजी या घराची पूजा करण्यात आली. यावेळी प्रा. डॉ. सौ. मनीषाताई पुरुषोत्तम धोंडगे, सौ. भगीरथीताई आहेर, सौ.जयक्रांतीताई गवते, विक्रमादित्य पुरुषोत्तम धोंडगे, नक्षत्रा पुरुषोत्तम धोंडगे, कु. कदम, कु. गुडिया दापके, आदी माता भगिनी उपस्थित होते.