हा तर मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचा डाव!: अशोकराव चव्हाण

 

नांदेड, दि. २४ नोव्हेंबर २०२३:

मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनामुळे तूर्तास जायकवाडीत पाणी सोडू नये, अशी सूचना करणारे पत्र म्हणजे मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचा डाव असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी म्हटले आहे.

पाणी न सोडण्याबाबत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जलसंपदा विभागाला लिहिलेले पत्र समाजमाध्यमांवर पोस्ट करून त्यांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला. आपल्या त्यांनी नमूद केले आहे की, मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यामध्ये सुरु आंदोलनामुळे तूर्तास जायकवाडीत पाणी न सोडण्याबाबत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जलसंपदा विभागाला पत्र लिहिल्याची बातमी धक्कादायक आहे. हा मराठा आरक्षण आंदोलनाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा डाव आहे, पाण्याची प्रतीक्षा करणाऱ्या मराठवाड्यातील नागरिकांना मूर्ख बनविण्याचा प्रयत्न आहे. उर्ध्व भागातून जायकवाडीत पाणी सोडण्याचा आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा काय संबंध आहे? उगाच मराठा आंदोलनाला बदनाम करू नका अन् पाणी सोडण्याचे टाळू नका, असे सांगून त्यांनी सदरहू पत्र कोणत्या कारणांमुळे लिहिले गेले, याचा राज्य सरकारने तातडीने खुलासा करावा अशीही मागणी केली आहे.

उत्तर महाराष्ट्राच्या धरणांमधून जायकवाडीत ८.६ टीएमसी पाणी सोडण्याच्या ३० ऑक्टोबर २०२३ रोजीच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या निर्णयाला मा. सर्वोच्च न्यायालयाने कोणतीही स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे मराठवाड्यातील तीव्र पाणी टंचाई व शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता राज्य सरकारने राजकीय दबावाला बळी न पडता मराठवाड्याच्या हक्काचे पाणी विनाविलंब सोडावे, अशी मागणी देखील अशोकराव चव्हाण यांनी आपल्या प्रतिक्रियेत केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *