26 नोव्हेंबर संविधान दिन. 26 नोव्हेंबर 1949 रोजी सभेचे अध्यक्ष भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहून भारतीय संसदेस सादर केली. त्यांना भारतीय राज्यघटना लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस लागले.
डॉ. माईसाहेब आंबेडकर म्हणतात की,”स्वतंत्र भारताची राज्यघटना म्हणजे सर्व काही डॉक्टर आंबेडकरच होते .त्यासाठी ते रोज 16 ते 18 तास कार्यरत असत. ते म्हणायचे मी या मातीतल्या माणसाचे ऋण फेडतोय.”
संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 ला झाली. तसेच संविधान सभेचे एकूण 11 अधिवेशने झाली. 25 डिसेंबर 1947 रोजीच्या संविधान समिती शेवटच्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर बी. एन .राव मसुदकार श्री. एस. एन. मुखर्जी तसेच तत्कालीन काँग्रेस पक्ष यांनाही राज्यघटना निर्मितीत श्रेय दिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात देशातील सर्व नागरिकास समान सामाजिक ,आर्थिक आणि राजकीय न्याय मिळवून दिला खरा. पण ते शेवटच्या भाषणातही त्यांच्या मनातली चिंता व्यक्त करत म्हणतात की,”देशाच्या भवितव्याबद्दल त्यांचे मन चिंताग्रस्त आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारत हा स्वतंत्र देश होईल. त्याच्या स्वातंत्र्याचे काय होईल? तो त्याचे स्वातंत्र्य अबाधित राखेल की तो त्याला परत गमावेल?” हा असा पहिला विचार डॉ. बाबासाहेबांच्या मनात आला. पुढे ते म्हणतात की,” भारत हा कधीच एक स्वतंत्र देश नव्हता असे काही नाही. त्याला असलेले स्वातंत्र्य त्यांनी एकदा गमावले, दुसऱ्या वेळीही तो गमावेल का? हा विचार देशाच्या भवितव्याबद्दल मला चिंतातूर करतो.” यावरूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संवेदनशील मन व अफाट देशप्रेम दिसते.
प्रत्येक भारतीयांनी त्यांना नतमस्तक व्हावे.असेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आहे.
भारताचे स्वातंत्र्य कसे धोक्यात येईल.याचे ही सुचक डॉ. बाबासाहेबांनी त्यांचया शेवटच्या भाषणात सांगितले आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होईल काय? या विचाराने ते सतत चिंताग्रस्त होते.ते म्हणतात की,” जर पक्षाने देशापेक्षा संप्रदायाला अधिक महत्व दिले.तर आमच्या स्वातंत्र्याला पुन्हा एकदा धोका निर्माण होईल आणि कदाचित ते कायमचे गमावल्या जाईल या संभाव्य घटनेबद्दल आम्ही सर्वजण खंबीरपणे दक्ष असले पाहिजे आमच्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आम्ही आमच्या स्वातंत्र्याची रक्षण करण्याचा निश्चय केला पाहिजे.”
आज ही वस्तुस्थिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सूचक संभावतेचा सर्वांनी विचार करून विचार संविधान विचारसरणीचे अनुसरण केले तरच लोकशाही जिवंत राहील .हे लक्षात ठेवले पाहिजे.
कारण संविधान हे संपूर्ण भारतीयांसाठी आहे.म्हणून हा उत्सव संपूर्ण भारतीयांनी उत्साहाने साजरा करायला पाहिजे. हा दिवस फक्त बौद्धांनी का साजरा करावा. डॉ.आंबेडकर हे बौद्ध असल्यामुळे काही लोकांनी हा एका जातीचा कार्यक्रम असल्याचा प्रचार करू नये. डॉ .बाबासाहेब एका जातीपुरते मर्यादित नव्हते. मग तसा विचार मोठया प्रमाणात का पसरवला जातोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निर्दोष विचारशक्ती होती . त्यांनी जात, धर्माच्या, वर्गाच्या पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून समाजाच्या शेवटच्या स्तरावरील माणसाचा विचार केला.त्यांच्यावर झालेल्या किंवा सध्या परिस्थिती बदलली गेली नाही तर भविष्यातही होणाऱ्या सामाजिक ,भावनिक, आर्थिक अत्याचारांचे अभ्यासपूर्व चिंतन करून त्यांच्या भौतिक जीवनाचा हिताचा विचार करून त्या सर्वांना न्याय देण्यासाठीच अत्यंत स्पष्टपणे भारतीय संविधानात काही समाजास आरक्षण दिले आहे. आणि हा समाज फक्त बौद्ध समाज नाही. सर्व बहुजन बांधवांना आरक्षण दिले आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा ज्या लोकांना पटत नाही किंवा दुसऱ्या शब्दात सरळ सरळ बोचते ,खुपते ते लोक जाणीवपूर्वक आरक्षणाला किंवा मनुष्य हितकारक विचारांना बोथट करण्याचा प्रयत्न करतात.
काही लोक मात्र संविधानानुसार मिळालेले फायदे, आरक्षण उपभोगतात मात्र ती आजही बाबासाहेबांना स्वीकारतांना दिसत नाहीत. यामध्ये आज माझा बहुजन वर्ग ही सामील आहे हे पाहून मनास खंत वाटते. खरंतर बहुजनांनी इतरांचे म्हणणे ऐकून मूग गिळून गप्प बसू नये .चांगले काय वाईट ,काय जसे आपण इतर दैनंदिन व्यवहारात विचार पूर्वक ठरवत असतो. अगदी तसेच संविधान आणि मी! संविधानात मला दिले गेलेले अधिकार! आणि… काल आज ,उद्या संविधानामुळे माझे व माझ्या परिवाराचे, माझ्या समाजाचे होणारे हीत याचा सकारात्मक विचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरंच हे फक्त बौद्ध धर्म यांचेच होते का? यावर आपले स्वतःचे मत निर्धारित करून ते स्वीकारले पाहिजे.ते मत नुसतेच स्वीकारून गप्प न बसता समाजातही छाती ठोकपणे वावरले पाहिजे. निव्वळ संविधान स्वीकारून चालणार नाही . त्याचे फायदे आरक्षण स्वातंत्र्य हवे पण संविधान निर्माता नकोय हा खूप विचार तुम्हाला पुन्हा वैदिक काळात नेल्याशिवाय राहणार नाही. हे सत्य आहे.
प.पू. बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वोत्कृष्ट राज्यघटना लिहिली.संविधानात सर्व जाती धर्माचे, पंथाचे, स्त्री पुरुष भेदभाव न करता, सर्वसामान्य लोकांना अधिकार दिले.नागरिकांना मुलभूत हक्क ,कर्तव्ये दिली.हे आपण समजून घेतले पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे संविधान हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले असले तरी ते एकाच जातीचे नसून भारतातील सर्व लोकांसाठी आहे .हे आपण मान्य पाहिजे. कारण आपण सर्व भारतीय नागरिक आहोत. भारतीय नागरिकांसाठी भारतीय संविधान अतिशय महत्त्वाचे आहे. यासाठी संविधान दिनानिमित्त आपण एकत्रितपणे येवून कार्य केले पाहिजे .तरच खऱ्या अर्थाने संविधान दिन~उत्सव स्वातंत्र्याचा साजरा करण्याचे समाधान लाभेल.
लेखिका
@अंजुमन
सौ.अंजली मनोज मुनेश्वर.
नांदेड.
मो.नं.9637116553