नांदेड-दि.२९ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत देशाबरोबर महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करून पदकांची लयलूट करणारी नांदेडची भुमिकन्या, महाराष्ट्र भूषण भाग्यश्री माधवराव जाधव हिने नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया-2023 पॅरा गेम्स मध्ये दोन सुवर्ण पदकांवर महाराष्ट्राचे नाव कोरले आहे.
सध्या दि.१० डिसेंबर ते दि.१७ डिसेंबर २०२३ या कालावधीत नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडीयममध्ये खेलो इंडिया-२०२३ या पॅरा क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत देशातील ३२ राज्यांमधील १४५० खेळाडू सहभागी झाले आहेत.
दिव्यांग खेळाडूंसाठी इतिहासात पहिल्यांदाच सुरु असलेल्या या स्पर्धेत गोळाफेक व भालाफेक या दोन क्रीडा प्रकारात भाग्यश्री जाधव हिने प्रथम क्रमांक पटकाऊन दोन सुवर्ण पदकांची मानकरी ठरली आहे.
नांदेड जिल्हयातील मुखेड तालुक्यातील होनवडज येथील रहिवासी असलेली भाग्यश्री जाधव हिने दिव्यांगांच्या जिल्हा राज्य व राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कास्य पदकांची लयलूट केली आहे.
दुबई येथे झालेल्या फाजा व चीन येथे झालेल्या ओपन चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.त्यानंतर गतवर्षी टोकियो येथे झालेल्या पॅरा ऑलिंम्पिक क्रीडा स्पर्धेत भारतीय संघात भाग्यश्री जाधव हिची निवड झाली होती. या स्पर्धेत सहभागी होणारी ती महाराष्ट्रातील एकमेव महिला खेळाडू होती. तिने या स्पर्धेत जागतिक पातळीवर सातवे स्थान प्राप्त केले आहे.
बंगळूरू येथे ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या चौथ्या इंडियन नॅशनल ओपन पॅरा स्पर्धेत गोळाफेक या क्रीडा प्रकारात तिने प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदकावर नाव कोरले होते.
नोव्हेंबर 2022 मध्ये पोर्तुगाल येथे जागतिकस्तरावर झालेल्या आयवॉज २०२२ या जागतिक दिव्यांग क्रीडा स्पर्धेत गोळाफेक व भालाफेक क्रीडा प्रकारात रौप्य व कास्य पदक मिळवून भारताबरोबरच महाराष्ट्राचा नावलौकिक केला.
मार्च 2023 मध्ये उत्तर आफ्रिकेतील मोरक्को या देशात वर्ल्ड पॅरा अथेलिटिक्स ग्रॅन्ड प्रिक्स २०२३ या स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधीत्व करीत कास्य पदक पटकावले आहे.
बंगळूरु येथे दि.४ ते ८ मे या कालावधीत झालेल्या पाचव्या भारतीय ओपन पॅरा अथेलिटिक्स इंटर नॅशनल चॅम्पिअनशीप-2023 या स्पर्धेत भाग्यश्री जाधव यांनी गोळाफेक या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे.
पॅरिस येथे झालेल्या वर्ल्ड पॅरा अथेलिटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत तीने गोळाफेक क्रीडा प्रकारात चौथा क्रमांक पटकाविला आहे. त्याच बरोबर सन २०२४ मध्ये होणाऱ्या पॅरालिंम्पिक क्रीडा स्पर्धेत भारतासाठी एक जागा राखीव ठेवण्याचा बहुमान मिळविला आहे.
नोव्हेंबर-२०२३ मध्ये चीन येथे झालेल्या एशियन पॅरा गेम्स-२०२३ या जागतिक पातळीवरील क्रीडा स्पर्धेत गोळाफेक या क्रीडा प्रकारात दुसरा क्रमांक पटकाऊन रौप्य पदकावर भारताचे नाव कोरले होते.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर दिव्यांग खेळाडूंच्या होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भाग्यश्री जाधव यांनी नेहमीच महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करून महाराष्ट्राची शान कायम राखली आहे. राज्य शासनाने तिच्या या दैदिप्यमान कामगिरीची दखल घेत तिला भेट शिवछत्रपती पुरस्कार प्रदान करून तिचा गौरव केला आहे.
अवघ्या सहा वर्षाच्या क्रीडा प्रवासात भाग्यश्री जाधव यांनी प्रचंड मेहनत व जिद्दीच्या जोरावर मुख्य प्रशिक्षक सत्यनारायण (बंगळूरु), सहाय्यक प्रशिक्षक श्रीमती पुष्पा (बंगळूरु) विशेष प्रशिक्षक मयूर रसाळ,रविंदर सर, पुणे येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. आशिष बाभूळकर, डॉ. प्रमोद पाटील व गुरुबंधु पालक पत्रकार प्रकाश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला दबदबा कायम ठेवला आहे.
माझ्या या यशात मला वेळोवेळी सहकार्य करणारे समाजातील प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक व सेवाभावी संस्था, माझ्यावर नियमित मोफत वैद्यकीय उपचार करणारे नांदेडमधील सर्व डॉक्टर मंडळी आणि माध्यम जगतातील सर्व हितचिंतक बांधव यांना सिंहाचा वाटा आहे. अशी प्रतिक्रिया भागश्री जाधव हिने व्यक्त केली.